12 July 2020

News Flash

ऑनलाईन मालिका : कुरघोडी आणि डावपेच

पार्टी तोलामोलाचाच उमेदवार पाहील. पण तसा उमेदवार मिळणार नाही, म्हणून त्यांना टक्करच द्यायची नाही? होऊ द्या झालो रक्तबंबाळ तर! एकदा व्हाल, दोनदा व्हाल पण

| August 20, 2014 01:15 am

इकडे प्रकाश जाधवने अण्णासाहेब पक्षातून बाहेर पडणार हे गृहीत धरून पक्षाचं तिकीट मिळविण्याची जोरदार तयारी सुरू केली होती.
तो पार्टीतल्या आपल्या गटाच्या लोकांना एकत्र करून अध्यक्षांना भेटायला जाण्याच्या विचारात होता.
तसा प्रकाश या मतदारसंघात फार प्रभावी आहे असं नाही. पार्टीच्या नेत्याशी त्याचा प्रत्यक्ष संबंध कमीच. म्हणजे पार्टीत तो तसा नवीनच. पण मतदारसंघात अण्णासाहेबांना उघडउघड विरोध करणारा तो एकमेवच. अण्णासाहेबांवर लपून-छपून वार करणारे त्याला नंतर येऊन मिळालेले.
तेव्हा अण्णासाहेबांचा कट्टर विरोधक म्हणून पार्टी त्याचा विचार करील असं प्रकाशचं मत.
तालुक्यात अण्णासाहेबांच्या विरोधात असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना त्याने एकदिवस जामगावात आपल्या घरी बोलावून घेतलं. अण्णासाहेबांच्या घराण्याविषयी ज्यांच्या मनात चिड आहे, ज्यांच्या डोळ्यात ते खुपतंय ते सर्व जण जमा झाले. सगळे नव्या पिढीतले, तरुण रक्ताचे.
जमलेल्या तरुणांना प्रकाशने येणाऱया निवडणुकीत संधी मिळाली तर पार्टीच्या तिकिटावर उभं राहण्याचा आपला विचार सांगितला. म्हणाला,
 ‘‘तुम्हाला आपल्या पार्टीतला अंतर्गत वाद पेपरमध्ये वाचायला मिळालाच असेल. पार्टीच्या जिवावर मोठे झालेल्या अण्णासाहेबांसारख्या काही नेत्यांनी स्वार्थासाठी पार्टीशी गद्दारी करायला सुरुवात केली आहे. त्यांच्याकडून त्यांच्या बंडखोरीची कारणे वेगळी मिळत असली, तरी मुख्यमंत्रिपदाच्या वादावरून त्यांनी पार्टीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. ऐन निवडणुकीच्या काळात झालेल्या असल्या बंडखोरीला पार्टी कधीच माफ करणार नाही. बाहेर पडण्याच्या विचारात असलेले आमदार त्यांचा वेगळा पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत आहे. त्यांच्या जागी तरुणांना संधी देण्याच्या विचारात आपली पार्टी आहे. तेव्हा तुमचा पाठिंबा असेल तर मी…’’
‘‘पण पार्टी अण्णासाहेबांच्या विरोधात तशाच तोलामोलाच्या उमेदवाराचा विचार करील.’’
प्रकाशचा निवडणुकीला उभं राहण्याचा विचार आहे, हे लक्षात येताच एका कार्यकर्त्याने आपलं मत मांडलं. त्याचं बोलणं प्रकाशला थोडं खटकलं. म्हणजे आपण अजून अण्णासाहेबांना टक्कर देण्याच्या लायक झालो नाही. तालुक्यातील कार्यकर्त्यांना आपण एवढे प्रभावी वाटत नाही. त्याच्या आत्मविश्वासाला कोठेतरी तडा गेला. पण आपलं म्हणनं मध्येच सोडून न देता तो पुढे बोलतच राहिला. म्हणाला,
‘‘आपण तिकीट मिळविण्याचा प्रयत्न करायचा. आपल्या पाठीमागं लोकं आहेत असं पार्टीला वाटलं तर ती विचार करील आपला… आणि पार्टीने आपल्या मतदारसंघाबाहेरचा उमेदवार उभा केला तर ठीक, नाहीतर मला नाही वाटत की आपल्या तालुक्यात अण्णासाहेबांच्या तोडीचा उमेदवार सापडेल म्हणून.’’
‘‘म्हणजे पार्टी बदलली तरी त्यांच्या घरातील सत्ता बाहेर जाणार नाही?’’
मध्येच दुसऱया एका कार्यकर्त्याने प्रश्न उपस्थित केला. तशी प्रकाशला बोलण्याची संधी मिळाल्यासारखंच झालं. मग तावातावानेच तो बोलायला लागला. म्हणाला,
 ‘‘तेच म्हणतोय मी. पार्टी तोलामोलाचाच उमेदवार पाहील. पण तसा उमेदवार मिळणार नाही, म्हणून त्यांना टक्करच द्यायची नाही? होऊ द्या झालो रक्तबंबाळ तर! एकदा व्हाल, दोनदा  व्हाल पण तिसऱयांदा तर बाजी मारू. आणि अण्णासाहेबांना मोठं कुणी केलं? आपणच ना! पण त्यांनी आपल्याला वाऱयावर सोडून दिलं. मी लग्नाआधी त्यांच्याकरता झिजलो. पण मला कधीच साधी पंचायत समितीवरही त्यांनी संधी दिली नाही. नंतर नातं जुळलं. तेव्हाही केवळ माझ्या बायकोच्या कामाचं श्रेय घेण्यासाठी तिचा सत्कार केला, पण कुठल्या पदावर संधी दिली नाही. अशा स्वार्थी माणसासाठी आपण नुसतंच राबायचं का? माझं त्यांचं काही वैयक्तिक भांडण नाही. पण मी नुसता राबणार नाही. आणि महत्त्वाकांक्षा बाळगणं काही चुकीचं नाही.’’
प्रकाशचं हे बोलणं ऐकूण सगळे शांत झाले.
मुख्य उद्देश होता अण्णासाहेबांच्या पारंपरिक घराण्याला विरोध.
त्यांना बदलायची आहे एकाच घराण्यात वर्षांनुवर्षे असलेली सत्ता. आणि बघायचं आहे नवीन घराला संधी देऊन.
मग इथं कोण उभं राहतंय ते महत्त्वाचं नव्हतं. त्यांना असा नेता पाहिजे होता, जो त्यांना आपला वाटेल. असा नेता जो आपल्या माणसांच्या दु:खाने दु:खी होईल. ज्याला आपल्यावर टाकलेल्या विश्वासाची जाणीव असेल. ज्याला आपली जबाबदारी कळत असेल. ज्याच्या मनात माझा तुझा भाव नसेल. ज्याची दृष्टी सर्वांवर सारखीच असेल आणि प्रामाणिक  कार्यकर्त्यांची कदर करेल.
पण अण्णासाहेबांचं घराणं आता स्वत:च्याच पुढच्या पिढय़ांच्या तयारीला लागलं होतं. आणि प्रकाशसारखंच बाकीच्या जमलेल्या कार्यकर्त्यांना नेमकं तेच नको होतं.
म्हणून ही घराणेशाही नष्ट करण्यासाठी त्यांना हवे होते सत्तांतर!
शांत बसलेल्या कार्यकर्त्यांच्या मनातले हे विचार प्रकाशही अनुभवत होता. त्यांचं मौन प्रकाशला पाठिंबा देऊन गेलं. अण्णासाहेबांच्या घराकडे बघून सत्तेची स्वप्ने पाहणाऱया प्रकाशला ही गोष्ट लाखमोलाची होती. मोठय़ा उत्साहाने मग तो कार्यकर्त्यांना म्हणाला,
‘‘अण्णसाहेबांचा दरारा सर्वाना माहीत आहे. तेव्हा आपणही पार्टीला आपली ताकद दाखवून दिली पाहिजे. त्यासाठी सर्वानी एकत्र मिळून जाण्याची गरज आहे. पार्टीनेत्यांना आपल्या सर्व कार्यकर्त्यांची ओळख झाली पाहिजे.’’
सर्वांनीच प्रकाशच्या या सूचनेला संमती दिली आणि मोठय़ा संख्येने पार्टीनेत्याला भेटायला जाण्याची तारीख निश्चित केली.
प्रकाशची ही हालचाल पुढारी, चेअरमन आणि कांबळेसरांसारख्या अण्णासाहेबांच्या माणसांना कळली. मोबाइलमुळे आता अशा गोष्टींना क्षणाचाही विलंब लागत नाही.
 त्यांनीही मग अण्णासाहेबांनी दिलेल्या जीपने तालुकाभर धूळ उडवली. कार्यकर्त्यांना एकत्र करून अण्णासाहेबांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली.
पंचायत समितीचं सभापती पद मिळवून अण्णासाहेबांनी तालुक्यातील आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. त्याचाही फायदा या निवडणुकीत उठविण्याचा या त्रिकुटाचा डाव होता.
म्हणजे एकाच पार्टीतले हे दोन्ही गट निवडणुकीसाठी आपापल्या परीने सिद्ध होत होते.
एकमेकांवर चिखलफेक करीत होते. सत्तेसाठी चाललेल्या या युद्धात सामान्य माणसाच्या भावना मात्र पायाखाली तुडवल्या जात होत्या.  त्याने रोहिदाससारखा एखादाच सच्चा कार्यकर्ता दंड ठोकून उभा राहत होता आणि आपल्याच माणसांनी मांडलेल्या या सत्तेच्या खेळाने एखादीच विद्या अस्वस्थ होत होती.
पण एक दिवस लोकशाहीमधील त्या बातमीने सगळे गार पडले.

(क्रमश:)

– बबन मिंडे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2014 1:15 am

Web Title: marathi online serial aarakshan part 23 baban minde
Next Stories
1 ऑनलाईन मालिका : राजकारण आणि तडजोडी
2 ऑनलाईन मालिका : पक्ष-पार्ट्यांचं राजकारण आणि सामान्य जनता
3 ऑनलाईन मालिका : धडे राजकारणाचे
Just Now!
X