पण आज निवडणुकीला उभं राहण्याची वेळ आली म्हणून विद्याने मनातली ही सल बोलून दाखवली. तिचे हे विचार अलकाला उभी करण्याच्या वेळेस कुठे गेले होते? तिच्या अशा बोलण्याने अलकाला थोडा राग आला. म्हणजे असं असतानाही विद्याने आपल्याला फसवलंय या भावनेने थोडी चिडूनच ती बोलली. म्हणाली,
 ‘‘म्हणजे आम्हाला पुढं करून तू चांगली शाबूत राहतीयेस. सध्याच्या परिस्थितीत सगळं ढवळून निघालंय, तरी आपण आपलं काम प्रामाणिकपणे करायचं, असं तूच मला म्हणाली होतीस. पुढं वाढून येणाऱया गोष्टींचा आपण आताच कशाला विचार करायचा? आणि आल्याच कोणत्या गोष्टी वाटय़ाला तर त्याला समर्थपणे तोंड द्यायचं, असंही म्हणाली होतीस, मग आज तू त्या गोष्टींना घाबरून मागं कशाला सरतीस.’’
अलकाच्या बोलण्याने विद्या एकदम निरुत्तर झाली. खरंच होतं अलकाचं. स्त्रियांनी आपली क्षमता ओळखून अशा ठिकाणी पाऊल उचलावं असं जर विद्याला वाटत असेल, तर तिला अलकाची क्षमता चांगलीच माहिती होती. तरी तिनं अलकाला पुढं केली. त्यामुळं अलकाला या गोष्टीचा राग येणं स्वाभाविकच होतं.
गप्प बसलेल्या विद्याकडे बघून मग ती रागारागानेच निघून गेली. पाठोपाठ नंदाही काहीच न बोलता उठून गेली.
हे सगळं ऐकणारा प्रकाश मात्र शांतपणे बसला होता. विद्याचा पुरुषांविषयीचा बोलण्याचा रोख त्याला न कळण्याइतका तो मूर्ख नव्हता. म्हणून तर आता काही न बोलता गरम झालेलं वातावरण थंड होण्याची वाट पाहत तो गप्प बसला.
रात्री जेवण झाल्यानंतर अंगणात वाऱयाला बसलेले सरूआक्का आणि भाऊ या सर्व गोष्टींपासून अजून दूरच होते. प्रकाशच्या डोक्यात विद्याला निवडणुकीला उभी करण्याचं खुळही येऊ शकतं याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती. त्यामुळे कसलाही घोर नसल्याने ते दोघंही अंगणात निवांत बसले होते.
पण थोडय़ा वेळाने प्रकाश कधी नाही ते त्यांच्याजवळ आला. आपुलकीने त्यांच्या पुढय़ात बसला. भाऊंना आणि सरूआक्काला आश्चर्य वाटलं. आपल्या पोरातला हा बदल दोघांनाही अंगणातल्या त्या गार वाऱयात शीतल आनंद देऊन गेला. पण तो क्षणभरच! पुढच्याच क्षणी प्रकाशने विद्याला निवडणुकीला उभी करण्याचा आपला विचार त्यांच्यापुढे मांडला. प्रकाशचा तो विचार ऐकूण ते भोळे आईबाप अगदी मुळापासून हादरले. प्रकाश राजकारणात सत्ता मिळविण्यासाठी आपल्या बायकोचाही असा वापर करील याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती. सरूआक्काला ते पटलं नाही. तिनं तिथंच प्रकाशला विरोध केला. म्हणाली,
‘‘तुला काय करायचं असेल ते कर, पण विद्याला या असल्या भानगडीत वढू नकोस. बायकांची कामं नाहीत ती. त्यात पडलेल्या बायकांबद्दल कायकाय ऐकायला येतं ते बघतोईस ना. आणि एकदा बाईची जात घराबाहेर पडली की तिला लाज शरम काही राहत नाही. तसल्या बायका चटवल्यागत वागतात. घरंदाज बायकांची कामं नाहीत ती… आपल्या घराण्यात असलं आक्रीत अजून कुणी केलेलं नाय.’’
‘‘त्यात आक्रीत काय आहे एवढं! चांगल्या चांगल्या घराण्यातल्या बायका आता राजकारणात आहेत. तुला या जामगावच्या बाहेरचं काय माहीत नाही अजून.’’
घरातल्या असल्या कुठल्याही विरोधावर लगेच चिडणाऱया प्रकाशने यावेळी मात्र शांतपणे घेत  सरूआक्काची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण ती सहजासहजी त्याचं म्हणनं मान्य करणारी नव्हती. तिनं आपलं एकच लावून धरलं. म्हणाली,
‘‘राजकारण म्हणजे सगळा पुरुषांचा बाजार, त्यात अशी एखादी बाईमाणूस जाणार, म्हणजे सगळ्या पुरुषांच्या वसवसलेल्या नजरा तिच्यावर आणि त्यात ही अशी संकोची, घाबरी पोरं. तिथं नाही निभाव लागायचा तिचा.’’
तसा प्रकाश विद्या आतल्या घरात असल्याची खात्री करून हळू आवाजात म्हणाला,
 ‘‘तिचा निभाव लागायला न लागायला तिला कशाला जाऊन देतोय मी त्या पुरुषांमध्ये. पार्टीचं आरक्षण आहे म्हणून तिला नुसती उभी करायची. सगळे व्यवहार पाहणारा मीच! ती नुसती नावाला… तू आपल्या गावच्या सरंपचिणीला, नंदाला नाही बघत होय. तसंच चालणार सगळं. ती जशी सरपंचीण तशी ही आमदारीण.’’
प्रकाशच्या या बोलण्याने सरुआक्का त्याच्याकडे नुसतीच पाहत राहिली. तसे आतापर्यंत गप्प बसलेल भाऊ आपल्या आजवरच्या अनुभवाने अगदी नेमके बोलले. म्हणाले,
‘‘तू म्हणतो ते खरं आहे प्रकाश. असलंच राजकारण बघायला मिळतंय सगळीकडं आता. पण विद्या तसल्या बायकांसारखी नाय. लय मानी आहे ती. दुसऱयाच्या इशाऱयावर नाचणारी नाय. तेव्हा तिच्या हाती कोलीत देण्याआधी विचार कर, नायतर उद्या तुलाच त्याचे चटके बसतील.’’
भाऊंच्या या बोलण्याचा प्रकाशने गांभीर्याने विचार केला नाही. त्याला आता आनंद याच गोष्टीचा झाला होता की या दोघांनीही आपल्यालाच विचार करून निर्णय घ्यायला सांगितला म्हणजे त्यांचा विरोध मावळला. आणि जरी तो विरोध मावळला नसता तरी त्याला तो जुमानणारा नव्हता.
आता प्रश्न होता तो फक्त विद्याचा.
आपल्या घरातून रागारागाने गेलेल्या अलकाचा आणि नंदाचा विचार करत ती आतल्या घरात अंथरुणावर पडली होती. अलकाला पंचायत समितीला उभी करताना आपण खरोखरच अलकाच्या मानसिक पातळीवर उतरून विचार केला नव्हता. निवडणुकीला उभं राहण्यासाठी फार मोठं धाडस असावं लागतं. आणि त्यातल्या त्यात स्त्रीला तर ते अग्निदिव्यच असतं. दुसऱयाला तू उभी रहा, मी तुझ्या पाठीशी आहे, असं म्हणनं सोपं असतं. पण स्वत:वर वेळ आली, की कळतं त्याला केवढय़ा मोठय़ा मनोबलाची गरज असते ती. अर्ज भरणं, पक्षकार्यालयात खेटय़ा मारणं, सतत चार बायका मागंपुढं ठेवण्यासाठी त्यांची मर्जी राखणं, त्यांना सांभाळणं, प्रचार करणं, भाषणं करणं, सभा घेणं, मोर्चे काढणं… एक एक सर्व तिच्या डोळ्यापुढं उभं राहायला लागलं.
मग ज्या स्त्रिया हे सर्व करताहेत त्यांना कोणकोणत्या दिव्यातून जावं लागत असेल याचीही तिला कल्पना यायला लागली. आजपर्यंत निवडणुकीला उभं राहणं एवढं अवघड असतं याची तिला कल्पनाच आली नव्हती. स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, हे म्हणतात ते काही खोटं नाही. याचीही तिला प्रचिती आली
अशा  विचारात गुंग झालेली विद्या प्रकाशच्या आवाजाने भानावर आली. अंथरुणावर तशीच सावरून बसली. रोज रात्री-बेरात्री घरी येणारा आपला नवरा आज बाहेरा का गेला नाही हे जसं तिला माहीत आहे, तसंच तो आता काय बोलणार आहे हेसुद्धा तिला माहीत आहे.
डोळे उघडे ठेवून शांतपणे पडलेल्या विद्याकडे बघत प्रकाश कधी नाही ते प्रेमाणे बोलायला लागला. म्हणाला,
 ‘‘मग काय विचार केलाईस?’’
‘‘कशाचा?’’
आढय़ाकडे लावलेली नजर किंचितही न हलवता विद्या बोलली.
 ‘‘कशाचा म्हणजे? दुपारी काय विषय चालला होता? निवडणुकीला उभं राहण्याचा.’’
आढय़ाकडे लावलेली नजर तिनं प्रकाशकडे वळवली. कधी नाही ते तो आपल्याकडे प्रेमाने बघत आहे, याचा तिला क्षणभर भास झाला.
‘‘नाही. मला नाही उभं राहायचं निवडणुकीला.’’
ती शांतपणे म्हणाली. तेव्हा काकुळतीला येत प्रकाशने विचारलं,
‘‘का?’’
प्रकाशच्या या ‘का’नेच विद्याला त्याच्या मनातला हेतू सांगितला. म्हणजे आपण निवडणुकीला उभं राहावं हे त्याला मनापासून वाटतंय. पण तो अजून ते सरळ मार्गाने सांगत नाही. मग तीही थोडं ताणून घेत बोलली. म्हणाली,
‘‘मला नाही जमायचं ते सगळं. तिथं पाय रोवून बसलेल्या लोकांच्या पुढं माझा निभाव नाही लागायचा.’’
‘‘सत्ता तुझ्या हातात असेल तर निभाव न लागून द्यायला ते कोण लागून गेले.’’
‘‘सत्ता असली तरी अशा ठिकाणी स्त्री पंख कापलेल्या पाखरासारखी असते. घ्यायची म्हटली तरी झेप नाही घेता येत तिला… आणि निवडून येईल याची काय खात्री? उगच हसू होणार फुकटचं.’’
आपण निवडून येऊ की नाही, ही शंका निवडणुकीला उभी राहणाऱया विद्याच्या मनात येणं साहजिकच होतं. पण इथं प्रकाशने लगेच तालुक्यात तिच्याविषयी चाललेल्या चर्चेचं सांगितलं. म्हणाला,
‘‘कार्यकर्त्यांमध्ये तुझंच नाव घेतलं जातंय. तुझ्या सत्कारामुळं आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमुळं सगळा तालुका तुला ओळखायला लागला आहे. तूच निवडून येशील असं सगळे म्हणतात.’’
‘‘पण मला अण्णासाहेबांच्या विरोधात जायचं नाही.’’
‘‘का? ते तुझे मामा आहेत म्हणून?’’
‘‘नात्याचा विचार केला असता तर अलकाला मी उभीच केली नसती. मला चिड आहे ती अण्णासाहेबांच्या माणसांची. पण आता अण्णासाहेबच राहणार नसतील तर त्यांच्या लोकांचा तरी कशाला विचार करायचा. अण्णासाहेबांच्या जागी आपल्याला दुसरं कोणीतरी पाहिजे होतं. आता येईल दुसरी कोणती तरी स्त्री.’’
विद्याचा नाराजीचा सूर पाहून मग प्रकाश शांतपणे बोलायला लागला,
‘‘येईल ना! कोण तरी एखादी काशीबाई सारखी स्त्री येईल. मग पुढारी जसे काशीबाईला नाचवतात तसे अण्णासाहेब तिला नाचवतील. म्हणजे पुन्हा तेच. तुम्ही मात्र घाबरून बसा घरात.’’
प्रकाश हे सहज बोलून गेला. त्याच्या या बोलण्यातही स्वार्थ होता. भावनेत अडकवून तिला राजी करण्याचा त्याचा विचार. पण त्यांनं विद्या मात्र अस्वस्थ झाली. आपण निवडणुकीला उभं राह्यचं की नाही, एवढय़ापुरतेच तिचं विचारचक्र चालू होतं. प्रकाशने छेडलेल्या या बाकीच्या गोष्टींचा तिच्या मनाला कधी स्पर्शही झाला नव्हता.
पण आता मात्र तिच्या अस्वस्थ मनात विचारांचा गोंधळ उडाला. मग प्रकाश पुढं काय बोलत राहिला या गोष्टींकडे तिचं लक्षच राहिलं नाही.
त्याच विचारांच्या गोंधळात पार मध्यरात्रीनंतर तिला डोळा लागला.

(क्रमश:)

– बबन मिंडे