दुसऱया दिवशी सकाळी प्रकाशने पुन्हा तोच विषय छेडला. पण अजूनही विद्याची अवस्था संभ्रमाचीच होती. त्यामुळे काहीच न बोलता ती प्रकाशसमोर गप्प राहिली. तिच्या गप्प राहण्याचा प्रकाशला थोडा राग आला. पण राग व्यक्त करण्याची ही वेळ नव्हती. संध्याकाळी पुन्हा विचारता येईल, असा विचार करून तो तालुक्याला मिटिंगसाठी निघून गेला.
विद्याच्या मनात विचारांचा गोंधळ मात्र अजूनही चालूच होता.
दुपारी थोडी निवांत झाल्यावर विद्या अलकाकडे गेली. अलका अजून तिच्यावर रागावलेलीच होती. पण विद्या घरी आली, याचा तिला आनंदच झाला.
दोघींचाही थोडा वेळ  मूळ विषयावर यावं की नाही या विचारात गेल्यावर मग विद्यानेच विषय काढला. म्हणाली,
‘‘अलका, काल तू असं रागारागाने निघून येणं मला अजिबात आवडलं नाही. जी परिस्थिती आहे ती सांगितली मी तुम्हाला. पण तू त्याचा भलताच अर्थ घेतला. तुला नको त्या भानगडीत गोवण्याइतकी वाईट नाही मी. पंचायतीच्या निवडणुकीत आणि विधानसभेच्या निवडणुकीत खूप फरक आहे. तुला अगदी जावं लागलं तर तालुक्याला जावं लागेल, पण पुणे-मुंबई-नागपूर अशा मोठमोठय़ा शहरात खेपा घालायची वेळ आली तर मात्र अवघड आहे. ते आपल्या स्त्रीपणाच्या मर्यादा लक्षात घेऊन जमणारं आहे की, नाही तेसुद्धा लक्षात घेतलं पाहिजे.’’
‘‘सगळं जमतं. ते करायची मनापासून तयारी पाहिजे फक्त. तुला ते टाळायचंच असेल तर त्यात हजार अडचणी दिसतील.’’
‘‘मी ते टाळत नाही गं! पण आपली क्षमता, आपल्या मर्यादा आपल्यालाच माहीत असतात. आपल्याच गावातल्या लोकांसमोर बोलताना आपली ततमम होते. इथंतर सगळ्या तालुक्याभर फिरावं लागणार आहे. कसं जमेल?’’
‘‘कसं जमेल? तालुक्याला अजून काळी का गोरी माहीत नसलेल्या बाळासाहेब मोहित्यांच्या बायकोला जमतं. मग तुला काय झालं जमायला.’’
बाळासाहेबांच्या बायकोचं नाव काढलं तसं विद्या अलकाकडे आश्चर्याने पाहत म्हणाली,
‘‘अण्णासाहेबांची सून, निर्मला आमदारकीला उभी राहत आहे?’’
‘‘हो. ते बरे सत्ता बाहेर जाऊन देतील.’’
अलकाने रागानेच ही माहिती दिली. तसा विद्याला तिचा असं रागारागाने बोलण्याचा राग आला. आणि मग तीही थोडी चिडून म्हणाली,
‘‘हे बघ अलका, जे काही सांगायचं ते नीट सांग, मी तुझ्या घरी आले, तरी तुला रागानेच बोलायचं असेल तर मला परत जायला.’’
विद्याने अशी परत जाण्याची गोष्ट केली तशी अलका थोडी नरमली. आपल्या रागाचं अतिच होतंय असं वाटून थोडी मवाळपणे बोलायला लागली. म्हणाली,
‘‘तू अण्णासाहेबांच्या नव्या पक्षाचं पेपरात वाचलंच असशील. पण रोहिदास आला होता काल. सगळं सांगत होता. आतून काय घडतंय ते. अण्णासाहेब काही आमदारांबरोबर पार्टीतून बाहेर पडलेत. नवा पक्ष काढलाय. मराठा विकास आघाडी. लोकसंघ पार्टीने स्त्रियांना आरक्षण दिलं म्हणून आता यांच्या पक्षानेही मतांवर डोळा ठेवून तेच केलंय. त्याच पक्षातून आपल्या सुनेला उभी करताहेत. ती निवडून आली तर पुन्हा अण्णासाहेबांचंच राज्य. मग पुढच्या लोकसभेला ते स्वत: उभे राहून विधानसभेसह लोकसभेची जागाही आपल्याकडेच ठेवणार. म्हणजे सगळ्या जिल्ह्यावर त्यांचंच राज्य.’’
निर्मला निवडून येणं म्हणजे सत्ता अण्णासाहेब मोहित्यांच्याच घरात राहणं  हे उघड होतं. आपला मामा सत्तेला एवढा चिकटून का आहे, याचं  गुपित विद्याला अलीकडे थोडं थोडं कळायला लागलं होतं. आणि यात तिला जनतेची फसवणूकच दिसत होती. हे बदलायचं असेल तर परिवर्तन आवश्यक आहे, हेही तिला समजत होतं.
हाच विचार करत ती थोडा वेळ शांत बसली.
मग ठाम निर्णय घेऊन बोलल्यासारखी म्हणाली,
‘‘अलका, उद्या रोहिदास, नंदा, तू… अशा आपल्या सर्व माणसांना तुझ्या घरी बोलवून घे. काय करायचं ते तेव्हाच ठरवू.’’
अलकाला विद्यातला हा बदल दिलासा देऊन गेला. आता विद्या मागं सरणार नाही याची तिला खात्री वाटायला लागली. मग ती जेव्हा जायला निघाली तेव्हा तिच्याकडे मोठय़ा आशेने बघत अलका म्हणाली,
‘‘विद्या, तुझ्याकडून हीच अपेक्षा होती.’’
विद्यालाही अलकाच्या चेहऱयावरचा आनंद बघून बरं वाटलं. पण तो आनंद टिकवून ठेवण्यासाठी तिला आता फार मोठी जबाबदारी अंगावर घ्यावी लागणार होती.

विद्या घरी आली तेव्हा भाऊंनी दुपारी आलेलं एक पत्र तिच्या हातात दिलं. विद्याने ते उघडून बघितलं. ते सुमनचं पत्र होतं. जांभूळवाडीहून आलेलं. अगदी गावाला गाव खेटून आहे, तरी सुमनने पत्र का पाठवलं असावं? ती घाईघाईने वाचायला लागली,
विद्या,
स. न.
तुला प्रत्यक्ष भेटण्याची खूप इच्छा होती. पण अण्णासाहेबांनी सर्व दिशा बंद केल्या आहेत. बाबांना कसली भीती घालून मला सासरी सोडायला लावली. इच्छा नसतानाही मला इकडं यावं लागलं. येताना बाबांनी मला तुला भेटूनही दिलं नाही.
आता मी परत निवडणुकीला उभी राहते की काय म्हणून पहिल्यापासूनच माझ्यावर दबाव आणायला लागले आहेत. आता तर मला मोबाइलही वापरून देत नाहीत. पुढाऱयाने तर घरी येऊन मला दम दिला आहे. झेप घेण्याची खूप इच्छा होती, पण आता यांनी माझ्या सगळ्या वाटा बंद केल्या आहेत. सद्या मनात घालमेल आहे. सगळ्या व्यवस्थेलाच लाथ मारून बंड करून लढायचं की या व्यवस्थेशीच तडजोड करून सडत जगायचं? असं जगत राहणं मानवणारं नाही मला. मोठ्या कोंडीत आहे सद्या…मात्र एक दिवस नक्कीच फुटेल ती…
पण विधानसभेसाठी सगळ्या जांभूळवाडीत चर्चा आहे तुझ्या नावाची. ऐकूण बरं वाटलं. तू आमदार झालीच तर चांगलंच आहे. यांच्या अत्याचाराविरुद्ध उभी रहा. मला खात्री आहे, तू नक्की निवडून येशील. तेव्हा आलेल्या संधीचा फायदा घे आणि त्या नराधमांच्या हातची सत्ता आपल्या हाती घे.
तुझी
सुमन

(क्रमश:)


– बबन मिंडे