07 March 2021

News Flash

ऑनलाईन मालिका : पुढाकार

‘‘तुम्ही निवडून आलात तरी कारभार सगळा प्रकाशच पाहणार आणि तुम्ही नुसत्या त्याच्या इशाऱयावर चालणार, गावागावात सरपंच झालेल्या स्त्रियांसारख्या. असंच वाटत होतं सर्वांना. पण आज तुम्ही

| September 1, 2014 01:15 am

कार्यालयात दोन-तीन कार्यकर्ते टेबलावर पाय पसरून ऐसपैस बसले होते. विद्याला पाहून ते गडबडीने उठले. आश्चर्याने तिच्याकडे पाहायला लागले.
ती सरळ समोरच्या खुर्चीवर जाऊन बसली. टेबलावर एका बाजूला फोन आणि दुसऱया बाजूला एकावर एक रचून ठेवलेले चार-पाच पेपर. आणि त्याच टेबलाच्या आधाराने एक कॅरम बोर्ड उभा केलेला होता. डाव्या भिंतीवर लटकवलेल्या एलसीडीवर मोठय़ा आवाजात शाहरूख खानचा चित्रपट चालू होता. तिकडं एक नजर टाकून कॅरम बोर्डकडे पाहात विद्याने विचारलं,
‘‘हा कॅरम कसा काय इथं?’’
यावर कोणीच काही बोललं नाही.
‘‘कॅरम क्लब आहे का हा? ’’
तिने पुन्हा विचारलं.
‘‘नाही.’’
 एक कार्यकर्ता तिच्याकडे आश्चर्याने बघत म्हणाला,  मग त्याच्याकडे बघत विद्याने आपला आवाज  थोडा वाढवला. म्हणाली,
‘‘मग इथं त्याच्याशिवाय दुसरं काहीच दिसत नाही.’’
‘‘आहे ना.’’
दुसरा कार्यकर्ता गडबडीनं म्हणाला.
 ‘‘कुठं?’’
‘‘कपाटात’’
‘‘मग काढा बाहेर.’’
तसे सगळे एकमेकांच्या तोंडाकडे पाहायला लागले. सगळेच गडबडले. आतापर्यंत उभ्या असलेल्या अलकाला बाजूच्या खुर्चीवर बसण्याची खूण करत तिनं एका कार्यकर्त्यांला कपाट उघडायला सांगितलं. तसे पुन्हा सगळे एकमेकांच्या तोंडाकडे पाहायला लागले. त्यांच्या गोंधळलेल्या चेहऱयाकडे बघत विद्या पुन्हा म्हणाली,
‘‘कपाट उघडा.’’
तसा एकजण घाबरत घाबरत म्हणाला,
‘‘कपाटाच्या किल्ल्या प्रकाशकडे आहेत.’’
‘‘मग ऑफिस कशाला उघडं ठेवलंय?’’ विद्या शांतपणे म्हणाली.
‘‘कुणी आलं गेलं तर…’’
‘‘त्यांना विश्रांती घ्यायला, का तुम्हाला ऐसपैस पाय पसरून आराम करायला. कॅरम खेळायला, की टीव्ही बघायला?’’
सगळे गप्प बसले. एका कार्यकर्त्यांने प्रकाशला मोबाइल लावला आणि तो कानाला लावून वैणी ऑफिसवर आल्यात म्हणत बाहेर गेला. विद्या पुढं काही बोलणार तोच डोंगरगावचे सरपंच चार-पाच लोकांसह आत आले. समोरच्या खुर्च्यांवर बसले. प्रचाराच्या सभेत ओळख झालेली होती, त्यामुळे विद्यानेही त्यांना ओळखलं.
थोडा वेळ बसल्यानंतर सरपंच कामाचं बोलायला लागले. म्हणाले, दोन-तीन अर्ज केले होते. एकदा मंजूरही झाले म्हणाले, पण रस्ता काय दुरुस्त झाला नाही. डोंगरगाव आडबाजूला पडतं. शहराच्या जवळ असून सुद्धा डोंगरामुळे खूप लांब असल्यासारखं वाटतं. गावात कसल्याच सोयी नाहीत. प्रत्येक गोष्टीसाठी तालुक्याला नाहीतर पुण्याला जावं लागतं. पण गाडीची सोय नसेल तर तेही जमत नाही. पावसाळ्यात तर एस.टी. सुद्धा येत नाही गावात. तेव्हा पावसाळ्याच्या आत रस्त्याच्या दुरुस्तीचं काम झालं तर एस.टी. बंद होणार नाही… तसं सगळं अर्जात लिहून दिलंय आम्ही दोन महिन्यापूर्वी.
‘‘म्हणजे तुम्ही इथं अर्ज दिला आहे?’’ विद्याने विचारलं.
‘‘हां.’’
तिनं उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांकडे पाहिलं आणि सरपंचांना पावसाळ्याच्या आत रस्ता दुरुस्त करण्याचं आश्वासन दिलं.
आभार मानून सरपंच मोठय़ा खुशीने उठून गेले. मग विद्याने डोंगरगावच्या अर्जाविषयी विचारलं. तेव्हा तो अर्ज प्रकाशने घेतल्याचं तिला कळलं. आता कार्यकर्त्यांना बोलून काही उपयोगच नव्हता. ते काय प्रकाशचे चमचे.
पुढं ती काहीच बोलली नाही. सहा महिन्यात प्रकाशने काय काय लपवून ठेवलं असेल या विचारात ती थोडा वेळ शांत बसली.
थोडय़ा वेळाने रोहिदास दोन-तीन तरुण पोरांसह विद्याचं अभिनंदन करीतच आत आला. म्हणाला,
‘‘अभिनंदन आमदार विद्याताई.’’
विद्याला रोहिदासने केलेल्या अभिनंदनाचं आश्चर्य वाटलं. ती साशंकपणे रोहिदासकडे बघत म्हणाली,
‘‘अभिनंदन? आता कसलं अभिनंदन ?’’
तसा रोहिदास थोडा हसतहसतच म्हणाला,
‘‘आज तुम्ही कार्यालयात आलात. त्यामुळे तालुक्यातल्या राजकीय मंडळींचा अपेक्षाभंग झालाय. आणि त्यांना जबरदस्त धक्काही बसलाय.’’
‘‘धक्का कसला?’’
‘‘तुम्ही निवडून आलात तरी कारभार सगळा प्रकाशच पाहणार आणि तुम्ही नुसत्या त्याच्या इशाऱयावर चालणार, गावागावात सरपंच झालेल्या स्त्रियांसारख्या. असंच वाटत होतं सर्वांना. पण आज तुम्ही त्यांचे सर्व समज खोटे पाडले… आम्हाला पंचायतीच्या ऑफिसात कळलं तुम्ही आल्याचं आणि लगेच आलो खात्री करून घ्यायला.’’
‘‘मग झाली का खात्री?’’
‘‘पक्की. आता रोज येत चला म्हणजे झालं. बघा कसे धाबे दणाणतात सर्वांचे.’’
‘‘सर्वांचे कुणाचे?’’
‘‘नावं सांगायची गरज नाही. कळतील तुमची तुम्हाला.’’
रोहिदासच्या बोलण्यावरून एक गोष्ट विद्याच्या लक्षात आली, की आपल्यावर खूप जणांची नजर आहे. आपल्या हातात सत्ता आहे. म्हणजे शक्ती आहे. आपण जर तिचा उपयोग नाही केला, तर दुसरे जण करून घ्यायला टपूनच आहेत. आपण इथं येण्याने त्यांना धक्का बसतोय, म्हणजे आपल्याला जाणून-बुजून मागे ठेवण्याचा प्रयत्न चालला आहे.
पण आपण तसं होऊन द्यायचं नाही. सत्ता आपल्याला मिळाली आहे, तेव्हा तिचा वापरही आपणच करायचा. मग कोणी कितीही अडथळे आणले तरी ते पार करण्याची तयारी ठेवायची.
तिनं रोहिदासकडे पाहिलं. त्याने आज तिला फार मोठय़ा गोष्टीपासून सावध केलं. त्याचे आभार मानत ती म्हणाली,
‘‘मी इथं येण्याने नवीन काही चांगलं घडणार असेल तर मी रोज येईल. ते माझं कामच आहे. पण तुमच्यासारख्या तरुणांनी साथ दिली तर मात्र निश्चितच काहीतरी चांगलं काम होईल.’’
रोहिदासने तिच्याकडे हसून पाहिलं. काही न बोलता त्या हसण्यातूनच तिला केवढा मोठा आधार वाटला!
घरी गेल्यावर रात्री प्रकाशने विद्याला कार्यालयात जाण्याचं कारण विचारलं. त्याच्या माणसांकडून त्याला सगळं समजलं  होतं. मात्र त्याचं उत्तर देण्याऐवजी तिनं कार्यालयातल्या कपाटाच्या किल्ल्या त्याच्याकडे मागितल्या. प्रकाशने पुन्हा कशासाठी, म्हणून विचारलं. तो असंच काहीतरी बोलणार, म्हणून तीही कसली भीडभाड न बाळगता बोलली. म्हणाली,
‘‘सगळ्या गोष्टींची कारणे द्यायला पाहिजेत का?’’
 ‘‘पण सगळं व्यवस्थित चाललेलं असताना…’’
‘‘काय व्यवस्थित चाललंय? आज दोन-तीन तास तिथं बसले, तेव्हा सगळी व्यवस्था कळली मला.’’
तसा गंभीर होऊन रागाने तिच्याकडे पाहत तो म्हणाला,
‘‘तुला काही गरज नव्हती तिथं जाण्याची. कुठंतरी काहीतरी बोलशील आणि स्वत:बरोबर मलाही अडचणीत आणशील. आणि तिथं बसणारी माणसं आपलीच आहेत. अशी माणसं संभाळायलाच लागत्यात आपल्यासारख्यांना. तेव्हा आता तिथं गरज असेल तेव्हाच येत जा.’’
‘‘पण मी रोज जाणार आहे. सगळ्या गोष्टी स्वत: लक्ष घालून समजून घेणार आहे… सगळी कागदपत्रं कपाटात आहेत. स्टेशनरी सुद्धा कपाटात आहे. त्याची किल्ली पाहिजे मला.’’
विद्याचा निर्धार पक्का होता. पण प्रकाश तिच्या निर्धाराला जुमानत नव्हता. म्हणाला,
‘‘मिळणार नाही. तुला अजून कोणती गोष्ट कोणत्या पद्धतीने करायची ते माहीत नाही. सगळा गोंधळ करून ठेवशील. तुझ्याबरोबर मी असतोच. तेव्हा किल्ली तुझ्याकडे असली काय आणि माझ्याकडे असली काय, सारखंच.’’
त्याने तिच्या क्षमतेविषयी अविश्वास दाखवून, तिच्या मर्यादाच दाखवल्या.
प्रकाश आपल्याला कमी लेखत आहे, या जाणिवेने तिला  वाईट वाटलं. कारण निवडणुकीआधी हाच आपल्याला आपली क्षमता किती मोठी आहे ते सांगत होता. आणि आज तोच आपल्या क्षमतेविषयी शंका घेत आहे. म्हणजे केवळ कोणत्या तरी मार्गाने सत्ता मिळविण्याच्या स्वार्थापोटीच त्याने आपली तेव्हा स्तुती केली होती. ही गोष्ट तेव्हाही तिच्या लक्षात आली होती, पण आता त्याची खात्री झाली. तरी सुद्धा त्याचा स्वार्थ त्याला साधून द्यायचा की नाही हे  आपल्या हातात आहे. आपली कामं आपणच करायची, असा मनाशी पक्का निर्णय घेऊनच ती त्याला बोलत होती.
संपर्क कार्यालय आपलं असूनही त्याच्यावर ताबा त्याचा. त्याचा ताबा तो सहजासहजी आपल्याला देणार नाही, हे जाणून तिनं स्वत: होऊनच त्याच्या टेबलाच्या खणातून किल्ल्या काढून घेतल्या. त्यानं तिला रोखण्याचा प्रयत्न केला, पण विद्या आता आपल्या निर्णयावर ठाम होती. तिच्या नजरेतून ते प्रकाशला कळायला वेळ लागला नाही. मग तिच्या करडय़ा नजरेसमोर तो जास्त वेळ टिकू शकला नाही.
विद्याने कार्यालयाच्या किल्ल्या ताब्यात घेतल्या. आता अशीच एकेक गोष्ट ताब्यात घेऊन सर्व कामं आपण आपली करायची. असा निश्चय करूनच ती रात्री झोपली.

(क्रमश:)

– बबन मिंडे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2014 1:15 am

Web Title: marathi online serial aarakshan part 31 baban minde
Next Stories
1 ऑनलाईन मालिका : राजकारणाचं भान आणि वास्तव
2 ऑनलाईन मालिका : धक्का प्रस्थापित राजघराण्याला
3 ऑनलाईन मालिका : निवडणूक आणि प्रतिष्ठा
Just Now!
X