एक वर्ष गेलं.
मध्ये नागपूर अधिवेशनात विद्याला काही दिवस नागपूरला राहावं लागलं. तेव्हा प्रकाश सतत तिच्या मागेच राहिला. तिथं काय बोलायचं, काय नाही ते सारखं सांगत राहिला. विद्या मात्र आता त्याच्याकडे दुर्लक्ष करत राहिली. आपल्याला आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल, तर इथले प्रश्न, इथल्या समस्या केवळ आपल्याला समजून चालणार नाहीत. त्या योग्य ठिकाणी मांडणंच गरजेचं होतं. आणि ज्यांनी आपल्याला त्या मांडण्यासाठी निवडून दिलंय त्यांच्यासाठी आपण त्या  योग्य ठिकाणी पोहोचविण्याचं धाडस केलं पाहिजे. या जाणिवेनेच ती नागपूरला गेली.
जाताना अलका बरोबर होती. तेव्हा प्रकाशने मागून जाणं गरजेचं नव्हतं. उलट विद्याच्या दृष्टीने ते अशोभनीयच होतं. पण पुरुषांच्या मेळ्यात बायकोला एकटीला सोडून निवांत बसेल तो नवरा कसला.
नागपूरहून परत आल्यावर विद्याची तर तालुकाभर शोभा झालीच, पण प्रकाशही बायकोचं शेपूट म्हणून प्रसिद्ध झाला. आपण आपल्या नवऱयाच्या हातातलं खेळणं आहे, असं विद्याला अनेकदा ऐकावंही लागलं, पण त्याची तिला आता सवय झाली आहे. दहा नावं ठेवणारे असतील तर चार कौतुक करणारे असतात, हे आता तिला कळायला लागलं होतं. आणि म्हणूनच ती आता लोकांच्या बोलण्याचं मनावर न घेता आपल्या कामात रमत होती.
स्वत:ला असं कामात बुडवून घेतल्याने घरात दुर्लक्ष होणं साहजिकच होतं. मात्र सरूआक्का सगळं सांभाळून घेत होती. पण प्रकाश? बायको आमदार असली तरी त्याच्या दृष्टीने ती पहिली एक स्त्री होती. मग मानसिक कोंडमाऱयाला आता समर्थपणे तोंड द्यायला लागलेल्या विद्याला आता आपलं शरीर मात्र एक यंत्र झाल्यासारखं वाटायला लागलं.

एक दिवस संध्याकाळची नंदा विद्याला भेटायला आली. विद्या आमदार झाल्यापासून नंदावर तिला भेटण्याची बंधनं फार. तिच्या नवऱयाने तिला तशी ताकीदच देऊन ठेवलेली. त्यातच पुढारी आणि चेअरमनची भर! या सगळ्यांच्या तावडीतून विद्यापर्यंत जाणं नंदाला अवघडच. नवऱयाच्या धाकाने तिनंही चोरून लपून भेटण्याचा प्रयत्न केला नाही. विद्या ही सगळी परिस्थिती जाणूनच होती. त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमात तिनं नंदाला गृहीत धरणंच सोडून दिलं होतं. नंदा नवऱयाच्या पुढं जाऊन बंडखोरी करणारी नाही. आपल्याला जे योग्य वाटेल ते करण्याची इच्छा असली तरी इतरांच्या दबावाने, त्यांच्या भीतीने ते  ती करणार नाही, हे विद्याला माहीत होतं. आणि एखाद्याला बळजबरी करणं विद्याला पटणारंही नव्हतं. त्याबाबतीत अलका मात्र विद्याला थोडी वेगळी वाटते. नंदासारखाच तिच्यावरही घरच्यांचा दबाव असला, तरी ती त्यांच्या हातातलं बाहुलं झाली नाही. कोणाला नाराज न करता, आपलं काम प्रामाणिकपणे करायचं. हे असलं कठीण काम ती मोठय़ा चतुराईने करते.
नंदाला असली चतुराई कधी जमली नाही. तिनं हातात कधी काही राखून ठेवलंच नाही. त्यात तिचा नवरा मुलखाचा धूर्त. त्याला जोड पुढारी – चेअरमनसारख्या मित्रांची. मग काय, मोकळ्या रानात बोकाळले वेसन नसलेल्या बैलासारखे.
एवढी बंधनं असतानाही नंदा आज विद्याकडे आली होती, म्हणजे नक्कीच काहीतरी महत्त्वाचं असणार. तिला बघताच विद्यानेही ते नेमकं हेरलं.
घरात गावातलं दुसरं कोणी नाही याचा अंदाज घेत ती ओटीवरल्या खुर्चीत बसली. सगळं घर न्याहाळत म्हणाली,
‘‘घर चांगलं सजवलईस गं आता.’’
‘‘हो. चांगली चांगली लोकं येतात, म्हणून यांनीच थोडी सुधारणा करून घेतली.’’
‘‘चांगल्या राजकारण्याचं घर दिसतंय. आज पहिल्यांदाच इथं आल्यावर अण्णासाहेबांच्या घरात आल्यासारखं वाटलं.’’
नंदाच्या या बोलण्यावर विद्या काहीच बोलली नाही. एकमेकींच्या तोंडाकडे बघत दोघीही गप्प. आपण काहीतरी लागण्यासारखं बोललो, असं नंदाला उगीचंच वाटलं. मग सावरून घेत तीच म्हणाली,
‘‘तू त्या राजकारण्यांमधली नाय म्हणा. पण मी माझ्या घरात बघते ना! या सत्तेच्या मोहाने चांगल्या चांगल्यांची निष्ठा गळून पडते. प्रामाणिकपणाने कुणीच पुढं जात नाय. आलेल्या संधीचा फायदा घेऊन आपली झोळी भरली, तर तिच्या जीवावर पुढं राज्य करता येतं. नायतर अशी ठेच लागती, की पुन्हा कधी उठताच येत नाय.’’
विद्या नंदाचं बोलणं ऐकत तिच्याकडं पाहतच राहिली. नंदाच्या तोंडून असले विचार ऐकायला मिळणं म्हणजे आश्चर्यच. त्याच आश्चर्याने ती म्हणाली,
‘‘नंदा, माझं घर अण्णासाहेबांच्या घरासारखं झालंय, की नाही ते मला माहीत नाही. पण तू बोलताना मात्र मला अण्णासाहेबांचे विचार ऐकल्यासारखं वाटतंय.’’
‘‘त्यांच्या माणसांचे म्हणजे त्यांचेच झाले की.’’
‘‘म्हणजे?’’
विद्याने पुन्हा आश्चर्याने विचारलं.
‘‘म्हणजे आमच्या घरात रात्रंदिवस याच गोष्टी चाललेल्या असतात. त्याच सांगते तुला. मला अशी राजकारणातली नीती समजली असती म्हणजे काही बघायलाच नको.’’
‘‘आणखी कायकाय चालतं?’’
विद्याने थोडं खोदून विचारलं. तेव्हा तेच सांगायला आले होते, अशा अविर्भावात ती सांगायला लागली. म्हणाली,
‘‘विद्या, जामगाव, जांभूळवाडी आणि फणसी या तीन गावांना पाणी पुरेल अशा हिशोबानी एक बंधारा मंजूर होऊन आलाय. त्या गोष्टीला आज दोन वर्षे झाली. जिथं रानचं पाणी सगळं एकत्र होतं, अशा ठिकाणी तो बांधण्याला सुरुवात करणार होते. पण दोन वर्षांपूर्वी अण्णासाहेबांनी ते काम लांबवलंय, ते अजून लांबलंचंय. आता बांधायचा म्हणत्यात. तुला ते कळलंच असेल पण आतली एक गोष्ट सांगायची म्हणून आले मी.’’
‘‘काय?’’
‘‘बंधारा तिन्ही गावचे ओढे जिथे मिळत्यात त्या कोंडीव बांधायचं ठरलं होतं. पण कालच्या आमच्या घरातल्या चर्चेवरून त्याची जागा बदललीये, असं वाटतंय.’’
 ‘‘कशावरून?’’
विद्याने थोडं गोंधळून विचारलं. मग नंदानेही काही न लपवता सगळं सांगितलं. म्हणाली,
‘‘अण्णासाहेबांनी उंबराच्या माळाजवळ जो ओढा आहे, त्या ओढय़ावर बंधारा बांधायचं ठरवलंय. ओसाड रान म्हणून बहुतेक लोकांनी तिथल्या जमिनी विकल्यात. आणि त्या सगळ्या जमिनी अण्णसाहेबांनी खरेदी करून सपाट केल्यात. आता तिथं जर बंधारा झाला तर त्याचा सगळा फायदा त्यांनाच होणार. फणसीला तर पाणी जाणं शक्यच नाही. जामगावामधल्या चारआठ शेतकऱयांना त्याचा फायदा होईल तेवढाच. ते शेतकरीही अण्णासाहेबांच्याच पार्टीतले.’’
‘‘पण बंधाऱयाची जागा बदलली असं कोणी सांगितलं तुला?’’ विद्याने मध्येच विचारलं.
‘‘तसं काल बोलणंच चाललं होतं त्यांचं. सगळं पक्क झालंय. पुढारी, चेअरमनलासुद्धा ते पटत नव्हतं, पण त्यांची तोंडं बंद करून टाकली अण्णासाहेबांनी.’’
‘‘आणि तुझ्या नवऱयाचं?’’
‘‘अशा बाबतीत त्यांचं तोंड तर कायम बंदच असतं. कांबळेसरांना सुद्धा हाताशी धरलंय.. सगळा कट शिजलाय त्यांचा.’’
नंदाच्या बोलण्यावरून सगळा प्रकार लक्षात येऊन विद्या शांत बसली. नंदाने ही गोष्ट आपल्याला येऊन सांगितली याचं तिला कौतुकही वाटलं.
वास्तविक पाहता बंधाऱयासंदर्भातल्या या गोष्टी विद्याला माहिती नव्हत्या असं नाही. महिन्यापूर्वीच या गोष्टी तिला समजल्या आहेत. अण्णासाहेबांच्या हालचाली चाललेल्या असल्या तरी कागदोपत्री अजून बंधाऱयाची जागा बदललेली नाही. त्यामुळे ती त्या संदर्भात काही बोलत नव्हती. पण पंचायत समितीवरच्या वर्चस्वाने अण्णासाहेबांना कागदं बदलायला जास्त वेळ लागणार नव्हता. तेव्हा  आपल्याला सावध राहिलं पाहिजे याची जाणीव तिला नंदाच्या भेटीमुळे  झाली. ती मोठय़ा आत्मविश्वासाने नंदाला म्हणाली,
‘‘नंदा, अण्णासाहेबांनी कितीही खटाटोप केला, तरी बंधारा जिथं व्हायला पाहिजे, तिथंच होईल. तो बंधारा सगळ्यांच्या सोयीसाठी आहे. तेव्हा केवळ अण्णासाहेबांसाठी त्याला मी उंबराच्या माळाजवळ आणून देणार नाही, याची खात्री बाळग.’’
‘‘मला त्याची खात्री आहे, पण वेळ गेल्यावर तुला कळायला नको म्हणून सांगायला आले होते.’’
असं म्हणून नंदा उठून गेली. आणि विद्याच्या डोक्यात एक नवा भुंगा घुसला.

(क्रमश:)

– बबन मिंडे