पुढं दोन दिवसांनीच प्रकाशची आणि पुढाऱयाची पंचायत समितीत बाचाबाची झाल्याचं विद्याला समजलं. काशीबाईला बाहुली बनवली म्हणून प्रकाशचा पुढाऱयावर आधीच मोठा राग होता. त्याला कोंडीत पकडण्यासाठी तो कोणत्या ना कोणत्या कारणाच्या शोधात होताच. तेव्हा असंच काहीतरी कारण घडल्याशिवाय प्रकाश त्याच्याशी भांडला नसेल, असं समजून तिनं प्रकाशला विचारलं. म्हणाली,
‘‘तुम्ही पंचायत समितीची बैठक चालू असताना तिथं जाऊन पुढाऱयाशी भांडलात. का?’’
विद्याच्या अशा विचारण्याचा प्रकाशला थोडा राग आला. पण हात दगडाखाली असल्याने, तो राग गिळत म्हणाला,
‘‘भांडण करू नको तर काय करू? तुला काही माहीत नसतं. ही लोकं कोणत्या मार्गाने कोणत्या गोष्टी करतील हे तुला समजायला अजून बराच वेळ जावा लागेल… म्हणून म्हणत होतो, तू नुसती बघत रहा, काय करायचं ते मी करतो सगळं.’’
‘‘काय झालंय एवढं?’’
तिनं पुन्हा विचारलं. तसा पुढाऱयाने डाव साधला आणि आपलं फार मोठं नुकसान झालं अशा अविर्भावात तो म्हणाला,
‘‘बंधाऱयाची जागा बदलली. अण्णासाहेबांनी त्याला स्वत:चीच मालमत्ता समजून आपल्याच रानात घेतलाय. त्यांची सर्व जमीन पाण्याखाली येते. बाकीची लोकं मरतील आता कायमची पाण्यावाचून.’’
‘‘मरेपर्यंत गप्प बसणार आहेत का ती?’’
‘‘सरकार मायबाप आहे त्यांचं. जिथं पाण्याची चांगली सोय असणार तिथंच बांधणार तो बंधारा, अशी त्यांची समजूत. त्यांना काय माहीत तो कुठं मंजूर झालाय आणि तो कोणासाठी आहे ते. आपल्या भागात बंधारा होणार एवढंच त्यांना माहीत.’’
‘‘मग आपण सांगू त्यांना.’’
विद्याच्या या वाक्याने प्रकाश तिच्याकडे पाहात क्षणभर गप्प बसला. मग आता काही उपयोग नाही अशा स्वरात श्वास सोडत म्हणाला,
‘‘पण कागदोपत्री बंधाऱयाची जागा आता उंबराच्या माळाजवळच्या ओढय़ावरच आहे.’’
तशी थोडी चिडून विद्या म्हणाली,
‘‘जागा फक्त त्यांनाच बदलता येतात असं नाही. आपल्याकडेही आता तेवढी सत्ता आहे.’’
गोरगरिबांच्या टाळूवरचं लोणी खाणाऱया या लोकांविषयीची चीड तिच्या बोलण्यातून प्रकाशला जाणवली. तिच्या या आत्मविश्वासाच्या बोलण्यातून ती काहीतरी वेगळाच पवित्रा घेणार याचीही त्याला खात्री झाली.
दुसऱया दिवशी विद्याने पाटबंधारे खात्याकडून सगळी माहिती घेतली. प्रकाश म्हणत होता तसंच सर्व झालं होतं. बंधारा उंबराच्या माळावरच्या ओढय़ावरच मंजूर करून घेतला गेला होता. तिथल्या नोकरांकडून समजलं की पाहणीला आलेले अधिकारी अण्णासाहेबांच्या घरी एक दिवस मुक्काम करून गेले. जागेची पाहणी करून इथं पाण्याचा साठा कमी प्रमाणात होईल असं सुचवलही, पण अण्णासाहेबांच्या पुढे त्यांचं काहीच चाललं नाही. त्यावेळी अण्णासाहेबांबरोबरच, तहसीलदार आणि सभापती काशीबाईसुद्धा असल्याचं समजल्यावर विद्याने याविरुद्ध आवाज उठवायचं ठरवलं. अण्णासाहेब जनतेचं नुकसान करून केवळ स्वत:चा विचार करतात, जनतेच्या पैशाचा गैरवापर करतात आणि हे सगळं माहीत असतानाही याला विरोध करायचं सोडून उलट साथच दिली म्हणून सभापती काशीबाईंविरोधातच आंदोलन करायचा विचार करून एक दिवस विद्या काशीबाईला भेटण्यासाठी पंचायत समितीत गेली.  कार्यालयात तेव्हा काशीबाई नव्हती. पण सभापतींना भेटायला येणाऱया लोकांना पुढारी आता थोडय़ा वेळात येतील म्हणून शिपाई सांगत होता. लोकंही त्यांची वाट पाहत थांबत होते. म्हणजे सभापतींचं काम पुढारी सांभाळीत होते. विद्याला पाहून शिपाई चपापला. घाईघाईत मॅडम बसा, मॅडम बसा म्हणत तिला खुर्ची दिली. आणि खिशातला मोबाइल काढून बाहेर गेला. बंधाऱयाची जागा का बदलली, याचं कारण आज जाणून घेतलंच पाहिजे, म्हणून विद्याही कार्यालयातच बसून राहिली. तिला कार्यालयात थांबलेली बघून सर्वजण तिच्याकडे आश्चर्याने पाहायला लागले. कारण अण्णासाहेब आमदार असताना त्यांना एखाद्या कामासाठी असं ताटकळत बसलेलं कोणी पाहिलं नव्हतं.
पार दुपार झाल्यावर पुढारी आला.
सवयीप्रमाणे थेट सभापतींच्या खुर्चीवर जाऊन बसला. समोर बसलेल्या लोकांवर नजर टाकली. शिपायाने सांगितल्याप्रमाणे विद्या अजून होतीच. ती उठून पुढं यायला लागली. तिला बघताच पुढारी खुर्चीवरून उठून उभा राहिला. चेहऱयावर उसणं हसू आणून मोठय़ा नम्रपणे म्हणाला,
‘‘विद्याताई… तुम्ही कशाला या लोकांमध्ये बसायचं. आमदार तुम्ही.’’
‘‘काम होतं सभापतींकडे एक, म्हणून थांबले.’’
विद्या त्याच्याकडे एकटक पाहत म्हणाली.
तस उसणं हसू आणखी खुलवत पुढारी म्हणाला,
‘‘मग फोन नाही का करायचा. मी आलो असतो तुमच्याकडं…’’
‘‘तुमच्याकडं काम नव्हतं तुम्हाला फोन करायला. माझं काम आहे सभापतींकडं.’’
पुढाऱयाला एकदम थोबाडीत मारल्यासारखं झालं. चेहऱयावरचं खोटं हसू क्षणात कुठल्या कुठं नाहीसं झालं. तोंड एकदम सुतकी झालं. त्याने समोर बसलेल्या लोकांकडे पाहिलं. सगळेजण आश्चर्याने पाहत होते. आता काहीतरी बोललंच पाहिजे, म्हणून तो झटदिशी बोलून गेला. म्हणाला,
‘‘ती आज येणार नाय.’’
‘‘कोण ती?’’ विद्याने त्याच्याकडे रोखून पाहात विचारलं.
‘‘काशी… सभापती.’’
‘‘का? घरी भाकरी भाजती का…’’
‘‘हे बघा विद्याताई, मी तुमचा मान राखतो म्हणजे तुम्ही काही बोलावं हे बरं नाही.’’
‘‘मी काही बोलत नाही. ही लोकं वेळ काढून लांबूनलांबून आली आहेत. या लोकांपेक्षा त्यांना घरची कामं महत्त्वाची होती. पोरंबाळं महत्त्वाची होती तर त्यांनी असली जबाबदारी घ्यायचीच नव्हती. स्वत:च्या स्वार्थासाठी लोकांच्या अडचणी कशाला करून ठेवायच्या.’’
‘‘मी आहे ना त्यांची कामं करायला.’’
पुढाऱयाच्या या वाक्याने विद्या त्याच्याकडे पाहतच राहिली. क्षणभर पुढाऱयालाही तिच्या अशा पाहण्याचा अर्थ समजला नाही. पण समजला तेव्हा मात्र शरमेने त्याची मान खाली झुकली.
पुढाऱयाला त्याची जागा दिसली. या गोष्टीवर विद्यालाही आता पुढं काही बोलण्याची इच्छा राहिली नाही. त्याला त्याची लायकी दाखविण्यासाठी एवढं पुरेसं होतं. आता सरळ कामाचं बोलावं म्हणून ती शांतपणे म्हणाली,
‘‘जामगाव, जांभूळवाडी आणि फणसी, या गावांसाठी बंधारा मंजूर होऊन आला आहे. तिन्ही गावांच्या मध्ये कोंडीवर तो बांधायचा होता. बंधाऱयाच्या दृष्टीने ती जागा योग्य आहे. आणि पाणी साठण्याच्या दृष्टीनेही तीच जागा योग्य आहे. असं असताना त्याची जागा का बदलली गेली आणि हे माहीत असतानाही सभापती त्याला पाठिंबा देत गप का राहिल्या हे मी आज सभापतींना विचारायला आले. पण तुम्हीच कार्यकारी सभापती असाल तर तुम्हीच सांगा हे असं का झालं.’’
विद्याला आपली ही करणी कळल्यावर ती आपल्याला याचा जाब विचारणार हे पुढाऱयाला माहीत होतं. म्हणून त्याने अगोदरच या प्रश्नांची उत्तरं तयार ठेवली होती. समोरच्याला खरं वाटावं इतक्या सहजपणे तो म्हणाला,
‘‘पहिली गोष्ट बंधारा मंजूर करणं नामंजूर करणं हे आमच्या हातात नाय. ते पाटबंधारे खात्याला विचारा. आणि तुम्हाला कोण म्हणालं बंधाऱयाची जागा बदलली म्हणून, जागेची पाहणी करायला आलेल्या अधिकाऱयानीच ती जागा निवडलीये.’’
पुढाऱयाचं हे धडधडीत खोटं बोलणं विद्याला चीड आणणारं होतं. थोडी चिडूनच ती म्हणाली,
‘‘भोळ्याभाबडय़ा लोकांच्या डोळ्यात तुम्ही धूळ फेकाल, पण मी आमदार आहे इथंली. एका माणसाच्या स्वार्थासाठी सगळ्या जनतेवर अन्याय होऊन देणार नाही मी. अण्णासाहेब हे  सगळं करतात हे माहीत असूनही तुम्ही त्यात सहभागी होऊन जनतेला फसवत आहात.’’
‘‘विद्याताई, सगळ्या गोष्टी कायदेशीर झाल्यात. तुम्ही आता काही करू शकत नाही.’’
पुढाऱयाने कायद्याची भाषा केली तशी विद्या त्याच्याकडे केविलवाणी पाहायला लागली. तिच्या नजरेला नजर देण्याची ताकद पुढाऱयात नव्हती. त्याच्या खाली झुकलेल्या नजरेकडे पाहत ती म्हणाली,
‘‘पुढारी, कायदा जनतेसाठी असतो. वेळ पडली तर जनतेपुढे कायद्याचे हे कागद चुरगाळून फाडले जातील. तुम्ही मला कायद्याची भीती दाखवू नका. मी त्याला घाबरणारी नाही, कारण आता माझ्याकडे जनतेची ताकद आहे… मी काय करू शकते ते तुम्हाला दोन दिवसातच कळेल.’’
पुढाऱयाला दम देऊनच विद्या पंचायत समितीतून बाहेर पडली. पुढारी बधीर झाल्यासारखा तिच्या पाठमोऱया देहाकडं पाहत राहिला.

(क्रमश:)

– बबन मिंडे