30 October 2020

News Flash

ऑनलाईन मालिका : तत्त्वांना तिलांजली

‘‘अशा किरकोळ माणसांना भेटून स्वत:ची किंमत कमी करून घेऊ नकोस. तू आमदार आहेस. माणसांची किंमत त्याच्या अवतीभोवतीच्या माणसांवरून ठरत असती. तेव्हा कोणालाही भेटायला जाताना इथूनपुढं

| September 11, 2014 01:15 am

कधी नाही ते रोहिदास तिला थोडा बदलल्यासारख्या दिसला. त्याच्या चेहऱयावर विद्याला पहिल्यासारखी आपुलकी दिसली नाही. पण विद्या मनात कसलाही पूर्वग्रह न ठेवता बोलली. म्हणाली,
‘‘रोहिदास, परवा तू कार्यालयात येऊन गेल्यावर नंतर स्वतंत्रपणे तुला भेटण्याची इच्छा होती. त्याच दिवशी संध्याकाळी तुला बोलावणार होते, पण गडबडीत जमलं नाही. तुझ्यात आणि यांच्यात अजून जास्त तेढ निर्माण व्हायला नको म्हणून आले.’’
‘‘प्रकाशमध्ये आणि आमच्यामध्ये तेढ पहिल्यापासूनच आहे. अगदी तुमच्या लग्नाच्या आधीपासून. आमचा लढा अन्यायाविरुद्ध आणि पिळवणुकी विरुद्ध असतो. सत्तेच्या  लोभापायीच तो आमच्यातून फुटलाय. अण्णासाहेबांच्या विरोधात उभा राहिला ते स्वत:च्या स्वार्थासाठीच. त्यात गावचं हितं नुसतं दाखवण्यापुरतं होतं.’’
‘‘तरी तुम्ही त्यांच्या घरात सत्ता जावी म्हणून मदत केली.’’
‘‘हो. तेव्हा आमच्यासमोर विशिष्ट घराणं नव्हतं. आमच्यासमोर होती. समाज सुधारण्याची खरीखुरी तळमळ असणारी एक सच्ची कार्यकर्ती. तेव्हा ती कार्यकर्ती कोणत्या तरी घराण्यातली आहे. हे आम्ही विसरलो होतो.’’
तिच्या चेहऱयावर एकदम नाराजी उमटली. आपल्या कामाविषयी, आपल्या प्रामाणिकपणाविषयी रोहिदासच्या मनातही शंका आहे, याचं तिला वाईट वाटलं. तेव्हा थोडय़ा नाराजीच्या स्वरातच ती बोलायला लागली. म्हणाली,
‘‘म्हणजे सत्तेची हाव असणाऱयामध्ये तू मलाही मोजतोस की काय?’’
‘‘छे मोजायचा प्रश्नच उरत नाही. एकदा कोणी निवडून आला, की तो आपोआपच त्यात गणला जातो. तो किती  स्वार्थी आणि किती निस्वार्थी आहे हे त्याच्या नंतरच्या कार्यावर ठरतं.’’
‘‘मग तू माझ्याबाबतीत काय ठरवलंस?’’
विद्याने शांतपणे विचारलं. तसा तोही तितक्याच गंभीरपणे बोलला. म्हणाला,
‘‘मी कोण ठरवणारा? आणि अशा एक-दोन माणसांच्या ठरवण्याने काही होत नाही. समोरची परिस्थिती बघून जे काही ठरवायचं ते समाज ठरवतो.’’
रोहिदासच्या बोलण्याचा रोख सतू पहिलवाणाच्या दिशेने होता. विद्याच्याही लक्षात ते चटकन आलं. आपला त्यात कसलाही गुन्हा नसताना आपण त्यात विनाकारण गोवल्या जातोय असं वाटून ती रागारागानेच म्हणाली,
‘‘हे बघ रोहिदास, तू सतूच्या बाबतीत बोलत असशील तर त्यातलं मला काही माहीत नाही. त्याला विहीर मंजूर झाली त्याला गावातील सरपंच आणि ग्रामसेवक जबाबदार आहेत.’’
विद्याच्या या वाक्याने रोहिदास एकदम भडकल्यासारखाच बोलायला लागला. म्हणाला,
‘‘पण तुमच्या सहीचं पत्र आहे. शिफारस करणारं. तुम्हाला या सर्व गोष्टींची माहिती करून घ्यायची नव्हती, आपल्या अधिकारातल्या सर्व गोष्टी लक्षपूर्वक करायच्या नव्हत्या, तर पडायचंच नव्हतं या भानगडीत… आता तुमच्या नावाखाली प्रकाश किती उद्योग करतो, काय काय भानगडी करतो हे सुद्धा माहीत नसेल तुम्हाला. नुसतं कार्यालयात जाऊन बसलं म्हणजे होत नाही. तुम्हाला तिथं बसवून प्रकाश बाहेर बोकाळलाय. आमदार बायको, पण आमदारकीचे सगळे फायदे नवऱयाला…’’
जिभेवरचा ताबा सुटल्यासारखा रोहिदास बोलायला लागला. ते विद्याच्याही सहनशीलतेच्या पलीकडचं होतं. म्हणून ती त्याला मध्येच रोखून म्हणाली,
‘‘रोहिदास, एक चांगला कार्यकर्ता म्हणून मी तुला भेटायला आले. पण तू पार आमच्या घरापर्यंत गेला. आता यांच्यातली आणि तुझ्यातली भांडणं जर विकोपाला गेली तर त्याला जबाबदार तूच असशील. परिस्थितीसमोर कधीकधी झुकाव लागतं. आपल्या तत्त्वांना मुरड घालून पुढं जावं लागतं. तसं नाही केलं तर…’’
‘‘मरावं लागतं… परवडलं ते. तत्त्वांना मुरड घालायची, त्यांना मागं ठेवायचं आणि आपण पुढं जायचं. म्हणजे आत्म्याला मागं ठेवून फक्त शरीराने पुढं जायचं. तुमच्या सारख्यांना जमतं ते. असेच लोक राजकारण चांगलं करू शकतात. तुम्हालाही  जमेल चांगलं ते. पण मला जगायचंय माझ्या तत्त्वांना घेऊन आणि मरायचंही आहे तत्त्वांना घेऊन.’’
यावर विद्या काहीच बोलली नाही. त्याचं बोलणंच एवढं आग ओकणारं होतं, की त्याच्या नजरेला नजर देण्याची हिम्मतही तिच्यात राहिली नाही. एक दिवस तीही काही आदर्श ठेवूनच वाटचाल करत होती, पण आपले आदर्श किती डळमळीत आहेत हे तिला आज समजलं. आपल्या स्वाभिमानाला धक्का देणाऱया रोहिदासचा तिला राग आला. पण त्याच्यातल्या एका आदर्श कार्यकर्त्यांने तिला आपलेही पाय मातीचेच आहेत हे दाखवून दिलं आणि तिला स्वत:च्या खुजेपणाची लाज वाटली.
विद्या रोहिदासला भेटायला गेली होती, हे प्रकाशला दोन दिवसांनी समजलं. विद्या आमदार झाल्यापासून तिच्याशी एकदम सौम्यपणे बोलणारा प्रकाश यावेळी मात्र चिडून बोलला. म्हणाला,
‘‘अशा किरकोळ माणसांना भेटून स्वत:ची किंमत कमी करून घेऊ नकोस. तू आमदार आहेस. माणसांची किंमत त्याच्या अवतीभोवतीच्या माणसांवरून ठरत असती. तेव्हा कोणालाही भेटायला जाताना इथूनपुढं विचार करून जात जा.’’
प्रकाशने रोहिदासला असं हीन लेखनं विद्याला आवडलं नाही. आपल्या यशात रोहिदासचाही थोडाफार हात आहे हे ती जाणत होती. प्रकाशने आपल्या मागं घातलेल्या गोंधळाची चीडही तिच्या मनात होती. त्या चिडीपोटीच ती थोडय़ा त्वेषाने म्हणाली,
‘‘मी निवडणुकीच्या काळात त्याच्याकडं गेलेलं तुम्हाला खटकलं नाही.  तेव्हा त्याचा आपण घेता येईल तेवढा उपयोग करून घेतला. आणि आता त्याला भेटणंही कमीपणाचं वाटायला लागलं.’’
‘‘भेटणं जाऊ दे, तो माणूस तसा असता तर त्याला आपल्या पार्टीतही घेतला असता, पण तो त्या लायकीचा नाही. त्याच्याशी संबंध हे उद्या आपल्यालाच तोटय़ाचे ठरतील. अशा धोकादायक लोकांपासून चार हात लांब राहणंच हिताचं असतं.’’
कोण कोणाला धोका देत आहे, हे प्रकाशच्या मनालाही माहीत होतं आणि विद्याच्या मनालाही माहीत होतं. ज्या गोष्टी आपल्या असतात आणि त्या आपल्याच मनाला बोचतात त्या कधी आपल्याच ओठांवर येत नाहीत. आपलं पाप आपल्या तोंडाने सांगणारी लोकं फार कमी असतात.
नकळत विद्या प्रकाशच्या हातचं बाहुलं झाली नसती, तर कदाचित तिनं आपलं हित कशात आहे ते ठणकावून सांगितलं असतं. पण आता परिस्थितीपुढं नमतं घेणं तिच्या अंगवळणीच पडायला लागलं आहे.
प्रकाशमुळे ग्रामविकास योजना विद्याला तालुकाभर बदनाम करून गेल्या. विद्या अण्णासाहेबांपेक्षा वेगळं काहीतरी करील असं वाटत होतं. पण लोकांच्या अपेक्षेला इथंच तडा गेला आणि विद्याची गणना इतर राजकारण्यांमध्येच होऊ लागली.

(क्रमश:)

– बबन मिंडे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2014 1:15 am

Web Title: marathi online serial aarakshan part 39 baban minde
Next Stories
1 ऑनलाईन मालिका : योजनांची खिरापत
2 ऑनलाईन मालिका : राजकारणातील घोटाळे
3 ऑनलाईन मालिका : लाभार्थी आणि योजना
Just Now!
X