15 August 2020

News Flash

ऑनलाईन मालिका : एका कार्यकर्तीचा बळी

विद्याचं हे राजकारणी बोलणं अलकाला अंतर्मुख करणारं होतं. एके काळी सच्चाईसाठी, समाजासाठी झगडणाऱया विद्याचं ह रूप तिला अस्वस्थ करून गेलं. काही न बोलताच एकदा विद्याकडे

| September 16, 2014 01:15 am

‘‘आज कशी काय पावलं वळली आमच्याकडं?’’
विद्याच्या या प्रश्नाने मात्र ती भानावर आली. मग बसलेल्या सर्व कार्यकर्त्यांवर नजर फिरवून ती विद्यावर स्थिर केली आणि अगदी खालच्या स्वरात शांतपणे म्हणाली,
‘‘विद्या, मी तुझ्यामुळे पार्टीत आले. पंचायत समितीची सदस्य आहे. तरी तुम्ही कुणीच मला ग्रामपंचायत निवडणुकीत सहभागी करून घेतलं नाय. या निवडणुकी संदर्भात मला कुठलीच गोष्ट विचारली नाही…’’
अलकाच्या या बोलण्याला चेअरमन आणि कांबळेसर छद्मीपणाने हसायला लागले.
अलका आपलं बोलणं थांबवून त्यांच्याकडे पाहाला लागली. तेव्हा कांबळेसर तिच्याकडे केविलवाणी पाहत होते. तिला अपराध्यासारखं वाटायला लागलं. त्या हसण्याचा, बघण्याचा अर्थ कळण्याच्या आतच कांबळेसर बोलून गेले.
‘‘तुला सहभागी करून घ्यायला पार्टीची कचेरी तुझ्या चुलीपुढं आणायची होती की काय!’’
‘‘राजकारण घरात बसून करता येत नाही. ते खेळणाऱयाच्या पायात भिंगरी असावी लागते. सहभागी करून घ्यायची वाट बघायची नसते, आपण सहभागी व्हायचं असतं.’’
मध्येच चेअरमननेही बोलण्याची संधी साधून घेतली. चेअरमनची अशी साथ मिळाल्यावर कांबळेसरांच्या जिभेवर ताबा राहिला तरच नवल! नाहीतरी निवडणुकीत अलकाने त्यांना पाडल्याचा राग त्यांच्या मनात होताच. त्याच रागाने ते बोलले. म्हणाले,
‘‘अहो, त्यांना नवऱयाचं करता करता होत नाही, तर पार्टीचं काम काय करणार, डोंबलं.’’
अलकाला ते सहन झालं नाही. तिनेही मग चेअरमन आणि कांबळेसरांच्या मर्मावरच बोट ठेवलं. म्हणाली,
‘‘कांबळेसर, मला नसेल जमत पार्टीचं काम करायला, पण तुम्ही तुमच्या पक्षाचं काम किती निष्ठेने केलं, ते तुम्हाला इथं बसलेले पाहून कळतंय मला. मी काम करत नसले, तरी ते विस्कटून तरी ठेवत नाही. पण तुम्ही… स्वार्थापायी आयुष्यभर ज्याचं खाल्ल त्याला लाथ मारून इथं…’’
‘‘अलका, तू ज्या कामासाठी आलीस त्या कामापुरतीच बोल. नको ती विधानं करून आमची बसत चाललेली घडी विस्कटू नकोस. पार्टीत काय घडामोडी घडल्यात याची जर तुला माहिती नसेल, तर तू काही न बोललेलंच बरं.’’
विद्या एकदम वरच्या आवाजात बोलली. तिच्या या वरच्या आवाजातल्या बोलण्याचं अलकाला आश्चर्य वाटलं. वाट्टेल ते बोलणाऱया चेअरमन, कांबळेसरांना तिने रोखलं नाही.  पण आपल्या खरं बोलण्यावर मात्र ती चिडून उठली. त्यामुळे अलकाला पुढं काही बोलावसं वाटलं नाही, वरच्या आवाजात बोलून नको त्या लोकांसमोर विद्याने आपला अपमान केला, म्हणून काही न बोलताच ती जायला निघाली. तेव्हा चेअरमन, कांबळेसर आणि सतू आपल्या चेहऱयावरचं हसू लपवू शकत नव्हते. त्यांच्या हसणाऱया चेहऱयाकडे बघतच ती खिन्न मनाने दाराकडे वळली.
का कोणास ठाऊक, पण विद्या सुद्धा तिच्या पाठीमागं ओढून नेल्यासारखी गेली. दारातून बाहेर पडणाऱया पाठमोऱया अलकाला तिने हलक्या स्वरात हाक मारली. विद्याची हाक कानावर पडताच अलका जागेवरच थांबली. जवळ जाऊन विद्याने तिचा हात हातात घेतला. एकवेळ आत बसलेल्या लोकांकडे वळून पाहिलं. मग त्यांना ऐकायला जाणार नाही अशा स्वरात ती अलकाकडे पाहत म्हणाली,
‘‘आत बसलेली सगळी मंडळी आपल्या पार्टीत नवीन आहेत. आपणच त्यांना अपमानास्पद बोलण्याने ती नाराज होतील. आणि आपल्याला निवडणुकीच्या काळात कोणाला नाराज करायचं नाही.’’
‘‘पण ते पार्टीत काल आलेत. नवीन कार्यकर्त्यांची मर्जी सांभाळण्यासाठी जुन्या कार्यकर्त्यांना दूर लोटायचं?’’
अलकाच्या या प्रश्नाने विद्या क्षणभर निरुतर झाली. पण पुढच्याच क्षणी तिने अलकाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून उलट प्रश्न केला,  
‘‘बरं ते जाऊ दे, तू आलीस होती कशाला?’’
‘‘ते सांगण्यात काही अर्थ नाही आता.’’
अलका निराशेच्या स्वरात म्हणाली.
‘‘उपयोग कसा नाही. तू सदस्य आहेस पंचायत समितीची. तुझ्या सूचनांचा निश्चित विचार करीन मी.’’
मग अलकाही तिच्या नजरेला नजर देत शांतपणे म्हणाली,
‘‘सुमनला तू ओळखतीस. ती एक चांगली कार्यकर्ती आहे. जांभुळवाडीत आतापर्यंत तिच्यावर अन्याय होत आला आहे… पण आता तू मनावर घेतलंस तर ती या वेळेस जांभुळवाडीत सरपंच होईल.’’
अलकाची मागणी अनपेक्षितच होती. त्यामुळे विद्याच्या मनातला गोंधळ एकदम तिच्या चेहऱयावर उमटला.
पण तिला नुसतंच गोंधळून कसं चालेल.
जिच्या मनावर आता बुद्धीचा अंमल सुरू झाला आहे ती विद्या भावनाशून्य होऊन म्हणाली,
‘‘हे बघ अलका, सुमनच्या जागी तू मला दुसरं एखादं नाव सुचव, मी त्याचा विचार करीन. पण सुमन आहे महत्त्वाकांक्षी. तिने तिच्या घरातल्या माणसांशी बंडखोरी केली आहे. उद्या आपल्याशी करणार नाही असं कशावरून? वाट सापडली, की ती उधळणारी बाई आहे. आणि आपल्याला आपल्या दावणीला राहणारी माणसं पाहिजेत.’’
‘‘म्हणजे तुला नंदासारखी बाहुलीसारखी नाचणारी माणसं पाहिजेत… चांगली राजकारणी झालीयेस. खूप लवकर तयार झालीस तू इथं.’’
‘‘त्यासाठी खास प्रयत्न करावे लागत नाहीत. माणसं या राजकारणात पडली की ती आपोआपच तयार होतात… तुला म्हणून सांगते, आपल्याला जर मोठं व्हायचं असेल तर अगोदर स्वत:चा पाया मजबूत करावा लागतो. आपलं फाऊंडेशन मजबूत असेल तरच आपण एकएक मजला चढू शकू, आपल्या भोवतीचं वैभव कायम आपल्याच भोवती ठेवू शकू. हे वैभव सांभाळण्यासाठी माणसंही पोसावी लागतात. अशावेळी असल्या वैभवाचं स्वप्न पाहणाऱयांना तर आपण दूरच ठेवायचं असतं, पण आपण होऊनही ते कोणाच्या गळ्यात टाकायचं नसतं. आज तू तिला हात देशील, पण उद्या तिचे हात तुझे पाय ओढतील. तेव्हा तू स्वत:चे पाय पहिले राजकारणात रोवून ठेव आणि मग बाकीच्यांचा विचार कर. आपली जागा पक्की झाली की दुसऱयाच्या जागेसाठी झगडता येतं!’’
विद्याचं हे राजकारणी बोलणं अलकाला अंतर्मुख करणारं होतं. एके काळी सच्चाईसाठी, समाजासाठी  झगडणाऱया विद्याचं ह रूप तिला अस्वस्थ करून गेलं.
काही न बोलताच एकदा विद्याकडे पाहून ती अगदी खिन्न मनाने चालायला लागली. तेव्हा तिच्या मनातली खंत तिच्या चेहऱयावर लपली नाही.
ती खंत सुमन सरपंच होऊ शकणार नव्हती म्हणून नाही, तर ती खंत होती या राजकारणाने घेतलेल्या विद्यासारख्या एका सच्चा कार्यकर्तीच्या बळीची!

(समाप्त)

– बबन मिंडे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2014 1:15 am

Web Title: marathi online serial aarakshan part 42 baban minde
Next Stories
1 ऑनलाईन मालिका : आदर्शांना तिलांजली
2 ऑनलाईन मालिका : राजकीय कुबड्या
3 ऑनलाईन मालिका : तत्त्वांना तिलांजली
Just Now!
X