नमस्कार! लोकसत्ता ‘स्पर्धा परीक्षा गुरू’ लेखमालिकेला आज आरंभ करत आहोत. या लेखमालिकेद्वारे एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना बदललेल्या अभ्यासक्रमानुसार अचूक मार्गदर्शन उपलब्ध केले जाईल. या लेखमालेत एमपीएससी-यूपीएससी परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम, अध्ययनाची तयारी अशा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षांचा विचार केला जाईल.

मित्रांनो, येत्या ५ एप्रिलला राज्य सेवा पूर्वपरीक्षा आहे. राज्य प्रशासकीय सेवेत येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची परीक्षा आहे. पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच मुख्य परीक्षा देता येते. ही परीक्षा खालील पदांसाठी होत आहे-
= उपजिल्हाधिकारी, गट अ (एकूण ९ पदे)
= पोलीस उपअधीक्षक / साहाय्यक पोलीस आयुक्त, गट-अ (एकूण १३ पदे)
= साहाय्यक विक्रीकर आयुक्त गट अ (एकूण ३ पदे)
= उपमुख्य कार्यकारी अधिकारी/ गटविकास अधिकारी (उच्च श्रेणी), गट अ (एकूण २१ पदे)
= साहाय्यक संचालक व महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा,
गट अ (एकूण १५ पदे)
= अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट अ (१ पद)
= तहसीलदार, गट अ (एकूण १० पदे)
= साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट ब
(एकूण १३ पदे)
= कक्ष अधिकारी, गट ब (एकूण ३८ पदे)
= साहाय्यक गटविकास अधिकारी, गट ब (एकूण ९ पदे)
= मुख्याधिकारी, गट ब (३५ पदे)
= उपअधीक्षक भूमी अभिलेखन (एकूण ८ पदे)
= उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गट ब (३ पदे)
= साहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क , गट ब
= नायब तहसीलदार (एकूण ३७ पदे)
या परीक्षेला अवघा महिना उरला आहे. दर वर्षीप्रमाणे जवळजवळ १५ ते २० लाख विद्यार्थी या परीक्षेला बसतील. उर्वरित दिवसांत या परीक्षेची तयारी कशी करता येईल, याचा विद्यार्थ्यांनी सविस्तर विचार करायला हवा. गेल्या काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासल्या आणि या वर्षी पार पडलेल्या आयोगाच्या इतर प्रश्नपत्रिका अभ्यासल्या की लक्षात येते की, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बदलत आहे. या परीक्षेचा अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे –
राज्य स्तरीय तसेच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, इतिहास (महाराष्ट्राच्या संदर्भासह) आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळ, राज्य पद्धती व प्रशासन, आíथक आणि सामाजिक विकास, पर्यावरण, सामान्य विज्ञान.
१) चालू घडामोडी :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१३ व २०१४ या परीक्षेचा विचार करता चालू घडामोडींचा आवाका दिवसेंदिवस वाढत आहे. या घटकाची तयारी करताना विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडींचा अभ्यास करावा. यासाठी वृत्तपत्रांचे नियमित वाचन आवश्यक ठरते.
२) इतिहास (महाराष्ट्राच्या संदर्भासह) व भारतीय स्वातंत्र्य चळवळ :
इतिहासाचा अभ्यास करताना त्याची व्याप्ती समजून घ्यावी. अभ्यासक्रमात ‘इतिहास महाराष्ट्राच्या संदर्भासह’ असा उल्लेख आहे. विद्यार्थ्यांनी इतिहासाचा अभ्यास करताना प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास, भारतीय स्वातंत्र्य चळवळ यांचा अभ्यास करावा. भारताचा सांस्कृतिक इतिहासही अभ्यासावा.
संदर्भग्रंथ :
प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासासाठी क्रमिक पुस्तके वाचावीत.
आधुनिक भारताचा इतिहास- बिपिनचंद्र
आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर अ‍ॅण्ड ग्रोवर.
ही पुस्तके मराठीत भाषांतरित झाली आहेत. प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासासाठी ‘एनसीईआरटी’ पुस्तकांचा अभ्यास करावा.