मुंबई महानगरीचे प्रश्न वर्षांनुवर्षे कायम असून जणू ते डोक्यावर घेऊनच दररोजचे जगणे मुंबईकर जगत असतो. उपनगरी लोकल या ‘जीवनवाहिनी’च्या माध्यमातून होणाऱ्या ‘मरणयातना’ सवयीच्याच बनल्या असून त्याने दखल घेणारे कोणीही नाही, म्हणून तक्रार करणेही जणू सोडून दिले आहे. मुंबई केवळ महापालिका क्षेत्रापुरती मर्यादित नसून तिचा विस्तार ठाणे, नवी मुंबई म्हणजे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रात झालेला आहे. मुंबईत कामानिमित्ताने येणारे सुमारे ७० टक्के कर्मचारी व अन्य मंडळी ठाणे, कल्याण-डोंबिवली, कर्जत-कसाऱ्याहून येतात. त्यामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनविताना आणि या महानगरीच्या विकासाचे सुंदर स्वप्न पाहताना ‘महामुंबई’ म्हणून विचार करावा लागेल. या एमएमआरडीए क्षेत्रातून सर्वच्या सर्व खासदार ‘रालोआ’चे निवडून आले असल्याने या ‘महामुंबईकर’ खासदारांचे विकासकामांसाठी दिल्लीत ‘सिंडिकेट’ करून केंद्र सरकारकडून अधिकाधिक निधी आणण्याचा निर्धार त्यांनी ‘लोकसत्ता-आयडिया एक्स्चेंज’च्या व्यासपीठावर व्यक्त केला.मुंबईला दिल्लीप्रमाणेच विशेष दर्जा देऊन स्वतंत्र विकासनिधी मिळविण्याचा संकल्प सर्व खासदारांनी केला आहे. मात्र विकासकामांवर नजर ठेवण्यासाठी सीईओ नेमण्यास त्यांचा विरोध आहे.  आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांना मुंबईच्या प्रश्नांबद्दल कधीही आत्मीयता नसल्याचे दिसून आले आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तांतर अटळ असून खऱ्या अर्थाने मुंबईकरांबद्दल जिव्हाळा असलेला मुख्यमंत्री लाभेल, असा आशावाद सर्वच खासदारांनी व्यक्त केला.
धारावीच्या पुनर्विकासाला प्राधान्य – राहुल शेवाळे
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात सगळ्यांत महत्त्वाचा प्रश्न पुनर्वसनाचा आहे. बीडीडी चाळ आणि पोलीस वसाहतींचेही प्रश्न आहेत. धारावीचे पुनर्वसन होत नाही, ते राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे. १०० नवीन शहरे निर्माण करण्याचे सरकारने ठरवले आहे, त्यात धारावी हे ‘रोल मॉडेल’ असावे. केंद्र व राज्य सरकारने येथे सुधारणा करून चांगली वसाहत विकसित करावी, असे मला वाटते. त्यासाठी धारावीचे पुनर्वसन ‘म्हाडा’ऐवजी मुंबई महानगरपालिकेने करण्याची गरज आहे.
कोळीवाडय़ांना सीआरझेडमधून सूट मिळवून देणार – गजानन कीर्तिकर
दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे तो प्रदूषणाचा. इंडियन ऑइल, बीपीसीएल, एचपीसीएल, टाटा, नॅशनल पॉवर कॉर्पोरेशन अशा कंपन्या या मतदारसंघात आहेत. तीन डंपिंग ग्राऊंड आहेत. चेंबूर हे मुंबईसह देशात सर्वात प्रदूषित ठिकाणांपैकी एक आहे. त्यामुळे चेंबूरच्या ५-१० किलोमीटर परिसरातील नागरिकांसाठी आरोग्याच्या योजना राबवणे आवश्यक आहे. प्रदूषणाच्या समस्येचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्यात आली असून, येत्या महिन्यात तिचा अहवाल आल्यानंतर याबाबतचे धोरण निश्चित होईल. हा अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यात येईल.
‘पीपीपी’ मॉडेलने काम करणार – पूनम महाजन
रेल्वेच्या समस्या हाही मोठा विषय आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गाचा या मतदारसंघाशी संबंध येतो. दादर हे येथील महत्त्वाचे रेल्वेस्थानक आहे. त्याचे आधुनिकीकरण आणि विस्तार करणे, महिलांसाठी आवश्यक त्या सोयी करणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आदी कामे लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. पश्चिम रेल्वेवरील उन्नत रेल्वे मार्गासाठीही मी पाठपुरावा करणार आहे.
मुंबईचा विकास आराखडा तयार केला जातो, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. यामुळे अनेक समस्या जागच्या जागी राहतात. नवा आराखडा सरकारला सादर करण्यात आला आहे. मुंबईच्या विकासाकरता केंद्र सरकारने ७१ हजार कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी मी मुंबईतील इतर खासदारांसोबत केंद्र सरकारला करणार आहे. किनारपट्टी रस्त्यामुळे वाहतुकीची समस्या मोठय़ा प्रमाणात सुटू शकते. त्यामुळे हा मार्ग तयार करण्यासाठी महापालिकेला द्यावा आणि त्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण खात्याकडे असलेला प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. सायन रुग्णालय आरोग्य विद्यापीठ बनवण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. तोही मार्गी लावायचा आहे.
ठाणे स्थानकात दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणारच! – राजन विचारे
माझ्या मतदारसंघात ऐतिहासिक महत्त्वाचे ५ किल्ले असून त्यांचे जतन आणि संवर्धन करण्याचे काम मी करणार आहे. बाबासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करीन. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक महापौर बंगल्याच्या शेजारी करण्याची योजना आहे.
समूह विकास योजनेसाठी कायद्यात बदल हवा – अरविंद सावंत