अणू ऊर्जा आणि अणू तंत्रज्ञान या विषयाशी निगडित विविध अभ्यासक्रमांची माहिती-
इंटरनॅशनल अ‍ॅटोमिक एनर्जी एजन्सी आणि न्युक्लिअर सप्लाय ग्रुप यांनी र्निबध उठवल्यामुळे आता अणू ऊर्जा निर्मिती क्षेत्रात खासगी क्षेत्रही उतरू शकते. यामुळे या क्षेत्रात करिअरच्या नवनव्या संधी निर्माण होऊ लागल्या आहेत. सेंटर फॉर डिटेक्टर अ‍ॅण्ड रिलेटेड सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी या संस्थेच्या मते, येत्या शतकात न्युक्लिअर सायन्स आणि टेक्नॉलॉजी ही ज्ञानशाखा जागतिक ऊर्जेची गरज भागविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञ अणूंपासून ऊर्जा निर्मितीचे अधिक सुरक्षित आणि नावीण्यपूर्ण तंत्र विकसित करू शकतात.
अणू तंत्रज्ञान क्षेत्रात जगभर सखोल संशोधन सुरू आहे. त्याचा परीघ वैद्यक शाखा, पर्यावरण शाखा यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये विस्तारला आहे. मात्र ऊर्जा निर्मितीसाठी हा वापर अधिक प्रभावीपणे होत आहे. औष्णिक ऊर्जेपासून होणारे प्रदूषण मोठे आहे. शिवाय उत्तम दर्जाच्या कोळशाच्या साठय़ांमध्ये घट होत आहे. त्यामुळे शुद्ध स्वरूपातील आणि प्रदूषणविरहित अणुऊर्जा मानवी विकास आणि प्रगतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
या क्षेत्रातील तंत्रज्ञ आणि अभियंत्यांना विविध प्रकारच्या कार्यात सहभागी व्हावे लागते. यामध्ये अणुऊर्जा प्रकल्पाची उभारणी प्रक्रिया, अशी उभारणी झाल्यावर कार्यान्वयन, देखभाल, दुरुस्ती आणि प्रकल्पाचे व्यवस्थापन अशा कामांचा समावेश आहे. अणुकचऱ्याचे सुरक्षित आणि सुव्यस्थित व्यवस्थापनासाठीसुद्धा या तज्ज्ञांची गरज भासते.
न्युक्लिअर मेडिसीन हे नवे क्षेत्र विकसित होत असून, त्यासाठीही मोठे संशोधन प्रकल्प राबवण्यास सुरुवात झाली आहे. अणुऊर्जा या विषयातील तज्ज्ञांना रिलायन्स न्युक्लिअर, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, लार्सन अ‍ॅण्ड टय़ुब्रो, एआरईव्हीए कॉर्पोरेशन या संस्थांमध्ये करिअरच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यायी ऊर्जा निर्मितीसाठीचे प्रयत्न मोठय़ा प्रमाणावर विविध देशांमध्ये होत असल्याने त्याठिकाणी संयंत्रांची उभारणी, देखभाल, दुरुस्ती आणि संशोधनासाठी विविध संधी सातत्याने उपलब्ध होऊ शकतात.
न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेने देशातील चार ठिकाणी अणुऊर्जा केंद्र उभारणीवर लक्ष केंद्रित केले आहे. जशी गरज वाढत जाईल त्याप्रमाणे या क्षेत्रात खासगी आणि आंतरराष्ट्रीय संस्थासुद्धा उतरू शकतात. या सर्व बाबी लक्षात घेतल्या तर नजिकच्या काळात या क्षेत्रात काम करण्यासाठी तज्ज्ञ मनुष्यबळाची मोठी गरज भासू शकते. सध्या आपल्या देशात या विषयातील प्रगत अभ्यासक्रम फार कमी शैक्षणिक संस्थांमध्ये सुरू करण्यात आले आहेत.
* केंद्राचा अणू ऊर्जा विभाग :     ही संस्था अणू अभियांत्रिकी विद्याशाखेतील शिक्षण-प्रशिक्षण देणारी आणि संशोधनाला चालना आणि प्रोत्साहन देणारी सर्वात मोठी संस्था आहे. या संस्थेच्या वेगवेगळ्या कॅम्पसमध्ये पुढील अभ्यासक्रम चालवले जातात.
* मुंबई – पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन न्युक्लिअर इंजिनीअरिंग आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन न्युक्लिअर सायन्स.
* इंदोर – पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अ‍ॅक्लेरेटर्स अ‍ॅण्ड रिअ‍ॅक्टर्स.
* हैदराबाद – पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिझाइन ऑपरेशन अ‍ॅण्ड मेन्टेनन्स ऑफ न्युक्लिअर फ्युएल सायकल फॅसिलिटीज.
* कलकप्पम – पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन फास्ट ब्रीडर रिअ‍ॅक्टर अ‍ॅण्ड रिसायकल सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी.
अभ्यासक्रमांचा कालावधी- एक वर्ष. या अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी देश स्तरावर प्रवेश परीक्षा आणि त्यानंतर मुलाखती घेतल्या जातात. प्रशिक्षणानंतर या उमेदवारांना डिपार्टमेन्ट ऑफ अ‍ॅटोमिक एनर्जीच्या विविध विभागांमध्ये गरजेनुसार सामावून घेतले जाते. पत्ता- सेन्ट्रल ऑफिस, ट्रेनिंग स्कूल कॉम्प्लेक्स, अणुशक्तीनगर, मुंबई- ४०००९४.
    वेबसाइट- http://www.hbni.ac.in  ईमेल- info@dae.gov.in
* इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर :
* एम.टेक्. इन न्युक्लिअर इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी.
अर्हता- बीटेक्. कालावधी- दोन वर्षे.
* मास्टर्स आणि पीएच.डी. इन न्युक्लिअर इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी. अर्हता- एम.टेक्. इन न्युक्लिअर इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी.
    पत्ता- डीन ऑफ अ‍ॅकॅडेमिक अफेअर्स, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर. ईमेल- doaa@iitk.ac.in
वेबसाइट- http://www.iitk.ac.in
* डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स अ‍ॅण्ड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स, दिल्ली युनिव्हर्सिटी :
    एम.टेक् . इन न्युक्लिअर सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी – कालावधी दोन वर्षे. अर्हता- फिजिक्स विषयासह बी.एस्सी. प्रवेश- जॉइंट अ‍ॅडमिशन्स फॉर मास्टर्स या प्रवेश परीक्षेद्वारे. पत्ता- ऑफिस इन चार्ज, रूम नंबर- १८९, मल्टीस्टोरिड बिल्डिंग, सेकंड फ्लोअर, न्यू दिल्ली- ११०००७, डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स अ‍ॅण्ड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स, युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली.
    वेबसाइट- http://www.du.ac.in
* अ‍ॅमिटी इन्स्टिटय़ूट ऑफ न्युक्लिअर सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी :
* बी.टेक्.- एम.टेक्. इन न्युक्लिअर सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी (डय़ुएल डिग्री)
* बी.टेक्. इन न्युक्लिअर सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी
* एम. टेक्. इन न्युक्लिअर सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी
* पीएच.डी. इन न्युक्लिअर सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी
    पत्ता- ए ३ ब्लॉक, अमिटी युनिव्हर्सिटी कॅम्पस, सेक्टर १२५, नॉयडा- २०१३०३. वेबसाइट- http://www.amity.edu
* इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रास :
* एम.टेक्. इन न्युक्लिअर इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी.
अर्हता- बी.टेक्. कालावधी- दोन वर्षे.
* जॉइंट अ‍ॅडमिशन्स फॉर मास्टर्स. पत्ता- एम.टेक्. अ‍ॅडमिशन कमिटी, ATE  ऑफिस, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास, चेन्नई- ६०००३६. ईमेल-mtechadm@iitm.ac.in
    वेबसाइट- mtechadm.www.iitm.ac.in
* एसआरएम युनिव्हर्सिटी :
    बी.टेक्. इन न्युक्लिअर सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी.
कालावधी- चार वर्षे. प्रवेशासाठी एसआरएम प्रवेश परीक्षा द्यावी लागते. अर्हता- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह बारावी विज्ञान शाखेची परीक्षा उत्तीर्ण. या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने एसआरएम युनिव्हर्सिटीने भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च इन्स्टिटय़ूट आणि इंदिरा गांधी सेंटर फॉर अ‍ॅटोमिक रिसर्च या दोन संस्थांसोबत शैक्षणिक सहकार्यासाठी करार केला आहे.
    पत्ता- डायरेक्टर अ‍ॅडमिशन, एसआरएम युनिव्हर्सिटी, एसआरएम नगर, कट्टनकुलाथूर, जिल्हा कांचिपूरम- तामीळनाडू.
    वेबसाइट- srmuniv.ac.in
    ईमेल- admissions.india@srmuniv.ac.in
* युनिव्हर्सिटी ऑफ पेट्रोलिअम अ‍ॅण्ड एनर्जी स्टडीज : एम.टेक्. इन न्युक्लिअर सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी. कालावधी- दोन वर्षे. अर्हता- ६० टक्के गुणांसह बीई किंवा बी.टेक्. इन मेकॅनिकल इंजिनीअरिंग किंवा बी.एस्सी. इन फिजिक्स. प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो.
    पत्ता- यूपीईएस कॅम्पस, पोस्ट ऑफिस- बिधोली, व्हाया प्रेमनगर, डेहरादून- २४८००७. वेबसाइट–www.upes.ac.in
ईमेल-enrollments@upes.ac.in
* पंडित दिनदयाल पेट्रोलियम युनिव्हर्सिटी :
    एम.टेक्. इन न्युक्लिअर एनर्जी हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. पत्ता- स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी, रायसन, जिल्हा- गांधीनगर- ३८२००७. वेबसाइट- http://www.sot.pdpu.ac.in
*  सात्रा युनिव्हर्सिटी :
    एम.टेक. इन न्युक्लिअर टेक्नॉलॉजी. कालावधी- दोन वर्षे.
पत्ता- सात्रा युनिव्हर्सिटी, तिरुमलायसमुद्रम, तंजावर- ६१३४०२.
ई-मेल-admissioans@sastra.ac.in
वेबसाइट-www.sastra.ac.in