अनुवादक म्हणून करिअर करता येईल, इतक्या मुबलक संधी अलीकडे या क्षेत्रात निर्माण होऊ लागल्या आहेत. त्याविषयी..
अनुवाद हा काय करिअरचा पर्याय असू शकतो, असा प्रश्न अनेकांना पडेल किंबहुना अनुवादक असं एक वेगाने विस्तारणारं करिअर आहे, हेही काहींना ठाऊक नसेल. ज्या विद्यार्थ्यांचे भाषेवर प्रभुत्व आहे आणि ज्यांना करिअरच्या वेगळ्या वाटेला जायचे असेल त्यांनी अनुवाद या क्षेत्राचा नक्की विचार करावा.
अनुवाद क्षेत्राविषयी..
दहावी-बारावीतील ज्या हुशार विद्यार्थ्यांना अनुवाद या क्षेत्राकडे वळायचे असेल त्यांनी भाषेचा जाणीवपूर्वक अभ्यास करायला हवा. या क्षेत्रात करिअर येऊ इच्छिणाऱ्यांना किमान दोन भाषा उत्तम येणे आवश्यक आहे. अनुवादकाचे करिअर आनंद आणि समाधानासोबतच उत्तम मानधन देऊ शकते.
जागतिकीकरणानंतर देशात बहुराष्ट्रीय कंपन्यांचा वावर वाढला, त्यामुळे व्यवहारही वाढला. त्यांच्याशी कामकाज सुरळीत होण्याच्या दृष्टीने अनेकदा विविध कागदपत्रांच्या अनुवादाची गरज तितकीच वाढत आहे. इंग्रजी, फ्रेंच, चिनी, जपानी, स्पॅनिश अशा भाषांची जाण असलेल्या आणि त्याचा प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद करणाऱ्यांची गरज वाढत आहे. या भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जरी आज वाढली असली तरी या भाषांमध्ये उत्तम, दर्जेदार अनुवादक मात्र तितकेसे उपलब्ध नाहीत. मातृभाषेपलीकडे एखाद्यातरी परदेशी भाषेची वा इतर प्रादेशिक भाषेची उत्तम जाण असणे हे अनुवाद क्षेत्रात करिअर करण्यासाठी अत्यावश्यक ठरते आणि त्या बळावर नियमितपणे तुम्ही उत्तम मानधन कमावू शकता.
भाषेमध्ये गती आणि रुची असल्याचं विद्यार्थ्यांला किंवा त्याच्या पालकाला लक्षात असल्यास त्याच्या भाषा शिक्षणावर विशेष लक्ष केंद्रित करायला हवे. भाषा अस्खलितपणे आली, भाषेतील बारकावे समजले की, अनुवाद करणे सोपे होते. त्यामुळेच ज्या भाषेचा अनुवाद करायचा आहे अशी भाषा आणि ज्या भाषेत अनुवाद करायचा आहे, ती भाषा अशा दोन्ही भाषेत विद्यार्थ्यांने पारंगत असायला हवे.  
करिअर संधी
* अनुवादकांना प्रारंभी एखाद्या जाहिरात संस्थेत जाहिरातीच्या अनुवादाची संधी मिळू शकते. सर्व मोठय़ा कंपन्यांच्या जाहिराती देशातील प्रमुख भाषांमध्ये प्रकाशित होतात. त्यामुळे त्या विशिष्ट भाषेतील अनुवादकांची गरज ही कॉर्पोरेट जगताला नेहमीच भासत असते. राष्ट्रीय पातळीवरील राजकीय संस्था, मोठय़ा सामाजिक संस्था यांच्याही जाहिराती / निवदने प्रमुख भाषांमध्ये प्रकाशित होतात. त्यांनाही अनुवादकांची गरज भासते.
* विविध वेबसाइटवर वेगवेगळ्या भाषेत लिखाण करण्यासाठी अनुवादक लागतात.
* पर्यटन कंपन्या, मोठी हॉटेल्स, विविध देशांचे दूतावास, बहुराष्ट्रीय कंपन्या, कार्पोरेट हाऊसेस यांनाही अनुवादकांची गरज भासते.
* भाषेवरील प्रभुत्वासोबत माहिती तंत्रज्ञानातील कौशल्य संपादन केले तर सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये उत्तम संधी मिळू शकते.
* केंद्र सरकारच्या काही विभागांनाही कनिष्ठ आणि वरिष्ठ पातळीवरील अनुवादकांची आवश्यकता भासत असते.
* वृत्तपत्रांना विविध विषयांवरील लेखांचे अनुवाद करण्यासाठी उत्तम अनुवादक हवे असतात.
* प्रकाशकांना वेगवेगळ्या विषयांची पुस्तके/ग्रंथांच्या अनुवादासाठी तज्ज्ञांची गरज भासते. काही प्रकाशन संस्था इतर भाषांमधील मोठय़ा लेखकांच्या ग्रंथांचे आणि पुस्तकांचे अनुवादाचे हक्क संपादन करतात. त्यांना त्या ग्रंथाचा अनुवाद अमूक एका प्रादेशिक भाषेत करायचा असतो आणि त्यासाठी त्यांना दोन्ही भाषांची उत्तम जाण असलेल्या तसेच उत्कृष्ट लेखनशैली असलेल्या व्यक्तींची आवश्यकता असते. अशी अनुवादित साहित्यनिर्मिती आपल्याकडे मराठीसह अनेक प्रादेशिक भाषांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे. अशा प्रकारे उत्तम साहित्याचा अनुवाद करण्याची संधीही अनुवाद क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना मिळू शकते.
* न्यायालयीन कामकाजाच्या अनुवादासाठी तज्ज्ञ अनुवादकांची गरज भासते.
* अनेक साहित्य संस्कृती मंडळांमार्फत श्रेष्ठ साहित्याच्या इतर भाषांमध्ये अनुवादाची मोठी योजना राबवली जाऊ शकते. त्यावेळी उत्तम अनुवादकांना संधी उपलब्ध होऊ  शकते.
* आयात-निर्यात क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कॉर्पोरेट कंपन्यांना अनुवादकांची गरज भासते.
* संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मुख्यालयात तसेच तत्सम कार्यालयांमध्ये इंग्रजी, फ्रेंच, अरेबिक, रशियन, चिनी/ स्पॅनिश या भाषांमधील अनुवादक हवे असतात. मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांना युनायटेड नेशन्स लँग्वेज कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन द्यावी लागते. ही परीक्षा दर दोन-तीन वर्षांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या अधिकृत भाषांमधील अनुवादक, संपादक, कॉपी प्रिपेरटर्स, व्हर्बाटिम रिपोर्टर्स, संदर्भ मदतनीस, अनुवादक, प्रूफ रीडर्स या पदांसाठी घेतली जाते. याविषयीची माहिती careers.un.org या संकेतस्थळावर मिळू शकेल.
ही परीक्षा संयुक्त राष्ट्र संघाचे सदस्य असलेल्या कोणत्याही राष्ट्रातील नागरिकाला देता येते. ही परीक्षा लेखी आणि तोंडी अशा दोन्ही स्वरूपात घेतली जाते. संयुक्त राष्ट्र संघाच्या अधिकृत भाषेतील पदवी-पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्याथ्याला ही परीक्षा देता येते.
* दिल्लीस्थित इंडियन नॅशनल सायन्टिफिक डॉक्युमेंटेशन सेंटर या संस्थेला तांत्रिक विषयातील कागदपत्रांच्या अनुवादकांची गरज भासते.
काही महत्त्वपूर्ण अभ्यासक्रम
पोस्टग्रॅज्युएट डिप्लोमा इन ट्रान्सलेशन-  हा अभ्यासक्रम इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने सुरू केला आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी किमान एक वर्ष आणि कमाल चार र्वष आहे. हिंदीमधून इंग्रजी आणि इंग्रजीतून हिंदी भाषेमध्ये अनुवाद करण्याचे तंत्र आणि कौशल्य या अभ्यासक्रमात शिकवले जाते. अर्हता- कोणत्याही शाखेतील पदवी. पत्ता- रीजनल सेंटर, एनसीटी ऑफ दिल्ली, गांधी स्मृती अ‍ॅण्ड दर्शन समिती, राजघाट, न्यू दिल्ली- ११०००२,  वेबसाइट- http://www.rcdelhi2.ignou.ac.in
डिप्लोमा इन कमर्शियल अ‍ॅण्ड टेक्निकल ट्रान्सलेशन अ‍ॅण्ड टुरिझम इन जर्मन- हा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाच्या डिपार्टमेन्ट ऑफ जर्मन यांनी सुरू केला आहे. अर्हता- अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन जर्मन लँग्वेज. कलिना कॅम्पसचा पत्ता- रानडे भवन, मुंबई विद्यापीठ, पहिला मजला, कलिना कॅम्पस, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई- ४०००४८. वेबसाइट- http://www.mu.ac.in
पोस्टग्रॅज्युएट डिप्लोमा इन ट्रान्सलेशन- कालावधी एक वर्ष. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. पत्ता- डिपार्टमेंट ऑफ लिंग्विस्टिक्स, एसएनडीटी विमेन युनिव्हर्सिटी, पहिला मजला, खोली क्र. १०, पाटकर हॉल बिल्डिंग १, एन.टी. रोड, चर्चगेट,
मुंबई- ४०००२०.  वेबसाइट- http://www.sndt.ac.in
एम.ए. इन ट्रान्सलेशन थिअरी अ‍ॅण्ड अ‍ॅप्लिकेशन- हा दोन र्वष कालावधीचा अभ्यासक्रम पुणे विद्यापीठाने सुरू केला आहे. पत्ता- सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स्ड स्टडी इन संस्कृत. पुणे विद्यापीठ, गणेशखिंड रोड, पुणे-४११००७. ईमेल- cass@ unipune.ac.in
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ट्रान्सलेशन इन हिंदी- कालावधी एक वर्ष. पत्ता- डिपार्टमेंट ऑफ हिंदी, पुणे विद्यापीठ, गणेशखिंड रोड, पुणे- ४११००७.
वेबसाइट- http://www.unipune.ac.in
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ट्रान्सलेशन (हिंदी, इंग्रजी)- हा अभ्यासक्रम दिल्ली विद्यापीठाने सुरू केला आहे. कालावधी- एक र्वष. पत्ता- साऊथ कॅम्पस बिल्डिंग, बेनिटो जौरेझ मार्ग, मोती बाग, न्यू दिल्ली- ११००२१. वेबसाइट- http://www.south.du.ac.in
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ट्रान्सलेशन स्टडीज इन हिंदी. हा एक वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबादने सुरूकेला आहे. पत्ता- युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबाद, प्रो. सी.आर. राव रोड, गाचीबावली, पोस्ट ऑफिस सेन्ट्रल युनिव्हर्सिटी,
हैदराबाद- ५०००४६. वेबसाइट- http://www.uohyd.ac.in
अनुवादाची कला साध्य करण्यासाठी विद्यापीठातील किंवा दर्जेदार संस्थेतून दीर्घकालीन मुदतीचा परदेशी भाषाविषयक पदविका अथवा पदवी अभ्यासक्रम करणेही संयुक्तिक ठरते. असे अभ्यासक्रम मुंबई, पुणे आणि इतर विद्यापीठांनी सुरू केले आहेत. यातील काही अभ्यासक्रम पूर्णकालीन तर काही अंशकालीन आहेत.

अनुवाद क्षेत्रातील संधी