पुण्याहून अवघड दिवेघाट पार करून पंढरीकडे निघालेला पालखी सोहळा सोमवारी सायंकाळी कऱ्हेकाठी सासवडमध्ये विसावला. सासवडमध्ये सायंकाळी पालखी तळावर समाजआरती झाली आणि त्यानंतर हजारो भाविकांनी पादुकांच्या दर्शनासाठी रीघ लावली.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे सोमवारी सकाळी पुण्यातून प्रस्थान झाल्यानंतर हडपसरमाग्रे पालखी सोहळा वडकी नाला येथे विसाव्यासाठी थांबला. त्यानंतर दुपारी पालखी सोहळ्याने अवघड दिवे घाट चढण्यास सुरुवात केली. टाळ-मृदंगांचा गजर आणि अखंड हरिनामाचा घोष अशा भारावलेल्या वातावरणात माउलींच्या पालखी सोहळ्याने अवघड दिवेघाट पार केला आणि दुपारी साडेचार वाजता पुरंदर तालुक्यात प्रवेश केला. उन्हाची पर्वा न करता पांडुरंगाच्या ओढीने घाट चढून आलेल्या वारकरी बांधवांच्या चेहऱ्यावर या वेळी आनंद दिसत होता. या वेळी आमदार विजय शिवतारे, माजी मंत्री दादा जाधवराव, सहकार परिषदचे अध्यक्ष चंदुकाका जगताप, प्रांत समीर िशगटे, तहसीलदार संजय पाटील, गटविकास अधिकारी कविता चव्हाण आदींनी सोहळ्याचे स्वागत केले.
वारकऱ्यांनी जवळच्या मदानात थोडी विश्रांती घेतल्यानंतर पालखी सासवडकडे निघाली. संत सोपानदेवांच्या सासवडनगरीत पालखी सोहळा आला, तेव्हा पालिकेच्या वतीने नगराध्यक्षा नीलिमा चौखंडे, मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास, संत सोपानकाका बॅँकेचे अध्यक्ष संजय जगताप आदींनी वैष्णवांच्या मेळ्याचे स्वागत करून िदडीप्रमुख व वीणेकऱ्यांचा सत्कार केला. दोन दिवसांच्या मुक्कामासाठी सोहळा दाखल झाला आहे. नगरपालिकेने सुशोभित केलेल्या पालखी तळावर समाज आरती झाल्यानंतर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.