24 September 2020

News Flash

पालखी प्रस्थान सोहळ्यावर सीसीटीव्हीने लक्ष

संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानासाठी शहर आणि पुणे ग्रामीण पोलीस सज्ज झाले आहेत.

| June 19, 2014 05:13 am

संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानासाठी शहर आणि पुणे ग्रामीण पोलीस सज्ज झाले आहेत. देहू आणि आळंदी येथे पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असून सीसीटीव्हीद्वारे पालखी सोहळ्यावर पोलिसांचे लक्ष राहणार आहे. पालखी मार्गावरील वाहतूक वळविण्यात येणार असून वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे गुरुवारी (१९ जून) देहू येथून, तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे शुक्रवारी (२० जून) आळंदी येथून पंढरपूरसाठी प्रस्थान होणार आहे. तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये ३२९, तर ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये २२८ दिंडय़ा सहभागी होण्याची शक्यता आहे. पालखी मार्गात वाहतुकीची कोंडी होऊ नये आणि वारकऱ्यांना जाण्याकरिता कोणताही अडथळा येऊ नये यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. पालखी मार्गात खासगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांनी दिली. 
श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी शुक्रवारी आकुर्डी येथील इनामदार वाडय़ात दाखल होईल. तर, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम त्या दिवशी आळंदीतील गांधीवाडा येथे असणार आहे. शनिवारी दोन्ही पालख्या पुणे शहरात एकत्रित दाखल होतील. त्यामुळे त्यांच्या मार्गावरील वाहतूक पालखी जाईपर्यत बंद केली जाणार आहे. त्या पालख्या पुणे-मुंबई महामार्गाने पुण्यात दाखल होती. त्यानंतर संचेती चौक, सिमला ऑफिस चौकातून पुढे फग्र्युसन रस्त्याने, खंडोजीबाबा चौकातून लक्ष्मी रस्त्याने मुक्कामाच्या ठिकाणी जातील. तुकाराम महाराजांची पालखी नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिर आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा येथे मुक्कामाला राहणार आहेत. दोन दिवस मुक्काम केल्यानंतर २३ जून रोजी सकाळी दोन्ही पालख्या सोलापूर रस्त्याने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतील. त्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक वळविण्यात येणार आहे. या काळात शहरात अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर वाहनचालकांनी या काळात पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्त विश्वास पांढरे यांनी केले आहे. 
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी २१ आणि २२ जूनला पुण्यात मुक्काम केल्यानंतर २३ जून रोजी सकाळी पुढील मुक्कामासाठी निघेल. त्यामुळे पहाटे तीन वाजल्यापासून सासवड ते हडपसर मार्गावरील वाहतूक बंद राहील, तर संत तुकाराम महाराजांची पालखी ही सोलापूर रस्त्याने लोणीकाळभोरकडे प्रस्थान करेल. तेथील वाहतूक बंद असल्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी सांगितले. 
पुणे ग्रामीण पोलिसांचा बंदोबस्त 
पालखीसाठी एक पोलीस अधीक्षक, दोन अतिरिक्त पोलीस अधीक्षक, तीस पोलीस निरीक्षक, ६९ सहायक पोलीस निरीक्षक, ७०६ पोलीस कर्मचारी, १२० वाहतूक पोलीस, अकराशे होमगार्ड आणि एक राज्य राखीव पोलीस दलाची कंपनी तैनात करण्यात येणार आहे. देहू आणि आळंदी या दोन्ही ठिकाणी तात्पुरता पोलीस नियंत्रण कक्ष राहणार आहे. दोन्ही ठिकाणी बॉम्बशोधक व नाशक पथकाची दोन पथके राहणार आहेत. पालखी मुक्कामाच्या ठिकाणाची अगोदर तपासणी केली जाईल. पालखी मार्गावरील धर्मशाळांची पाहणी करून एका धर्मशाळेसाठी एक पोलीस कर्मचारी देण्यात आला आहे. पालखीत होणाऱ्या चोऱ्या, साखळीचोरी, लुटमार अशा घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची पथके तैनात राहणार आहेत, असे लोहिया यांनी सांगितले. दोन्ही पालखींसोबत पोलिसांचे फिरते नियंत्रण कक्ष राहणार आहे. त्या ठिकाणी दोन मोबाईल असतील. त्याचबरोबर वायरलेस सुविधा असेल. वारकऱ्यांना काही तक्रार द्यायची असेल तर ते या नियंत्रण कक्षात देऊ शकतील, अशी माहिती लोहिया यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2014 5:13 am

Web Title: palkhi departure cctv traffic 2
टॅग Palkhi,Wari
Next Stories
1 वारी आनंदाची..
2 सेवेचे व्रत
3 विज्ञान-तंत्रज्ञानातील नवे पर्याय
Just Now!
X