संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली व जगद्गुरू संत तुकाराममहाराजांच्या पालख्यांचे शनिवारी पुण्यनगरीत आगमन होणार आहे. पालख्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. पालख्यांचा शहरात प्रवेश झाल्यापासून त्या मुक्कामाच्या ठिकाणी जाईपर्यंतच्या मार्गावरील वाहतूक त्या-त्या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे.
आळंदी मुक्कामी असलेली ज्ञानेश्वर महाराजांची पालखी शनिवारी मार्गस्थ होऊन शहरात दाखल होईल. मस्के वस्ती येथे पालिकेच्या वतीने पालखीचे स्वागत होईल. तुकाराममहाराजांची पालखी आकुर्डी येथील मुक्कामानंतर शनिवारी मार्गस्थ होईल. या पालखीचे बोपोडी येथे पालिकेच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे. दोन्ही पालख्यांचे एकत्रित स्वागत पाटील इस्टेटजवळ होणार आहे. पालिकेसह विविध मंडळे व संस्थांच्या वतीने पालख्यांच्या स्वागताची व वारकऱ्यांच्या व्यवस्थेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पोलीस व जिल्हा प्रशासनाकडूनही सज्जता ठेवण्यात आली आहे.
पालख्या शहरातून जात असलेल्या मार्गावरील वाहतूक पालख्या पुढे जाईपर्यंत बंद केली जाणार आहे. पुणे- मुंबई महामार्गाने पालख्या आल्यानंतर संचेती चौक, सिमला ऑफिस चौकातून पुढे फग्र्युसन रस्त्याने, खंडोजीबाबा चौकातून लक्ष्मी रस्त्याने मुक्कामाच्या ठिकाणी जातील. तुकाराम महाराजांची पालखी नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिर आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा येथे मुक्कामी असणार आहे. त्यामुळे या भागातील वाहतूक त्या-त्या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे.
 
वारकऱ्यांसाठी हेल्पलाईन क्रमांक

पालिकेच्या भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने वारकऱ्यांसाठी हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. २६४३७०४१ तसेच ९६८९९३४९४८ (प्रदीप परदेशी) हे क्रमांक पालख्या शहरातून मार्गस्थ होईपर्यंत २४ तास उपलब्ध राहणार आहेत. वारकऱ्यांनी पालिकेच्या टँकरमधील पाण्याचाच वापर करावा. उघडय़ावरील अन्नपदार्थ घेणे टाळावे. त्याचप्रमाणे वारकऱ्यांना विविध खाद्यपदार्थ देणाऱ्यांनी त्याबाबत अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.