डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडोओ) ही आपल्या देशाच्या संरक्षण सिद्धतेसाठी विविध प्रकारचे संशोधन कार्य करणारी महत्त्वाची संस्था आहे. या संस्थेत सध्या ६५०च्या आसपास पीएच.डी.धारक, सात हजारांच्या आसपास एम.एस्सी, ३३००च्या आसपास बी.टेक्., २०००च्या आसपास एम.टेक्. उमेदवार विविध शाखांमध्ये कार्यरत आहेत. ‘डीआरडोओ’च्या विविध शाखांमध्ये सतत संशोधन चालू असते. लष्कराशी निगडित संशोधनात्मक कार्यासाठी केंद्र सरकार दरवर्षी सात ते आठ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देते. लष्कराच्या संशोधनाच्या परिघात विविध प्रकारच्या अस्त्रांची आणि शस्त्रांची रचना आणि निर्मिती, सुलभ लष्करी कार्यप्रणालीचा विकास आणि प्रत्यक्ष कार्यान्वयन, क्षेपणास्त्रे, हलकी लढाऊ विमाने, युद्धभूमीवरील रणगाडे, अस्त्रे या महत्त्वाच्या उपकरणांचे आधुनिकीकरण, निर्मिती आणि उपकरणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न यांचा समावेश होतो. या संस्थेतील संशोधक अधिकाधिक प्रभावी क्षेपणास्त्रे विकसित करतात. अत्यंत दुर्गम भागात आणि कठीण परिस्थितीत कार्यरत राहण्यासाठी उपयुक्त ठरतील अशी औषधांचा वा रसायनांचा ते विकास करतात. लष्कराच्या सेवेमधील पदांसाठी कोणते उमेदवार पात्र आणि सक्षम ठरू शकतील, यासंबंधीच्या मानसशास्त्रीय चाचण्यासुद्धा हे तज्ज्ञ विकसित करतात. तंत्रज्ञ आणि अभियंते : संशोधकांसमवेत संरक्षण दलांना निर्मिती प्रक्रियेला साहाय्यभूत ठरतील अशा तंत्रज्ञ आणि अभियंत्यांची गरज भासते. शस्त्रास्त्रे, दारूगोळा, चिलखती वाहने, रणगाडे, बुलेटप्रूफ चिलखते यांच्या निर्मिती प्रक्रियेत त्यांचा सहभाग असतो. या तंत्रज्ञांची भरती संघ लोकसेवा आयोगामार्फत केली जाते. देशभरात विखुरलेल्या ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये या तंत्रज्ञानांना प्रत्यक्ष निर्मिती संयंत्रावर काम करावे लागते. आगामी महाशक्ती म्हणून जग भारताकडे बघते. यामध्ये‘डीआरडीओ’ची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सध्या‘डीआरडीओ’च्या ५० हून अधिक संशोधन प्रयोगशाळांमध्ये एरोनॉटिक्स, आर्ममेन्ट्स, कॉम्बॅट इंजिनीअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड अ‍ॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग, मिसाइल्स, मटेरिअल्स, लाइफ सायन्स, नेव्हल सिस्टिम आणि इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड अ‍ॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग या क्षेत्रांमध्ये हजारो डिझायनर्स आणि विकासक संशोधक कार्यरत आहेत. या क्षेत्रांमध्ये संशोधनाच्या विपुल शक्यता दडलेल्या आहेत. बारावीपासूनच तयारी आवश्यक :‘डीआरडीओ’मध्ये करिअरच्या विविध संधी उपलब्ध होत असल्याने या क्षेत्रात येण्याची मानसिक तयारी बारावीपासूनच केलेली उत्तम. संशोधन कार्यात प्रत्यक्ष सहभागी होत असल्याने बारावीनंतरच्या विज्ञान शाखेतील अथवा अभियांत्रिकी शाखेतील संकल्पना समजून उमजून केलेला अभ्यास, प्रथम श्रेणीतील पदवी
आणि त्यानंतर प्रथम श्रेणीतील पदव्युत्तर पदवी ‘डीआरडीओ’मधील प्रवेशाचा मार्ग सुकर करू शकते. या संस्थेतील प्रवेशासाठी सायंटिस्ट एन्ट्री टेस्ट आणि स्कॉलॅस्टिक अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट द्यावी लागते.‘डीआरडीओ’ने आयआयटी आणि इतर महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांसोबत कॅम्पस निवडीबाबत सहकार्य-करार केला आहे. हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेड या शासकीय कंपनीला दरवर्षी सुमारे ६०० तंत्रज्ञांची आणि शास्त्रज्ञांची गरज भासते. या तंत्रज्ञांना अत्याधुनिक पद्धतीच्या विमानांचे डिझाइन, निर्मिती प्रक्रिया, बहुआयामी दळणवळणीय विमाने, मध्यम वजन श्रेणीतले हेलिकॉप्टर, हलक्या वजनाचे विविध कामिगिरीसाठी लागणारे हेलिकॉप्टर, प्रगत हलके हेलिकॉप्टर, आक्रमण करू शकणारी हलकी विमाने, जेट ट्रेनर आणि इतर अत्याधुनिक उपकरणांच्या विकास आणि निर्मिती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे लागते.‘डीआरडीओ’मध्ये सर्जनशील काम करण्याच्या स्वातंत्र्यासोबतच उत्तम वेतन, प्रवास भत्ते, शासकीय निवासस्थान आणि केंद्र सरकारच्या इतर विभागांतील अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या इतरही सुविधा प्राप्त होतात. त्यामुळे या संस्थेमधील करिअर गुणवत्तेला व दर्जाला वाव देणारे ठरते. बारावीनंतर विज्ञान आणि अभियांत्रिकी शाखेमध्ये प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांसाठी ‘डीआरडीओ’ हे करिअर घडवण्याची संधी देणारे महत्त्वाचे डेस्टिनेशन ठरू शकते.
डिफेन्स रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट सव्‍‌र्हिस :‘डीआरडीओ’मध्ये वैज्ञानिकांची भरती झाल्यानंतर ते ‘डिफेन्स रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट सव्‍‌र्हिस’चे भाग बनतात. वैज्ञानिकांच्या
‘बी’ ते ‘एच’ अशा सात श्रेणी आहेत. त्यानंतरची श्रेणी डिस्टिंग्विश्ड  सायंटिस्ट या श्रेणीची आहे. ‘बी’ ते ‘एच’ या श्रेणीपर्यंत वैज्ञानिकांची पदोन्नती गुणवत्तेनुसार होते. ‘सी’ ते ‘एफ’ श्रेणीतील वैज्ञानिकांना दोन इन्क्रिमेंट एवढी अतिरक्त रक्कम दिली जाते. ‘जी’ श्रेणीतील वैज्ञानिकांना चार हजार रुपये दर महिन्याला विशेष वेतन म्हणून दिले जाते. ‘बी’, ‘सी’, ‘डी’ श्रेणीतील वैज्ञानिकांनी शैक्षणिक आणि व्यावसायिक गुणवत्तेत वाढ केल्यास त्यांना वार्षिक १० हजार रुपये आणि ‘एफ’ श्रेणीतील वैज्ञानिकांना वार्षिक २० हजार रुपये विशेष वेतन दिले जाते. ‘जी’ श्रेणी आणि त्यावरील वैज्ञानिक अधिकाऱ्यांना वार्षिक ३० हजार रुपये विशेष वेतन दिले जाते. या वैज्ञानिकांना आयआयटी, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बंगळुरू आणि इतर प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. परदेशातील विविध संस्थांमध्ये कार्य करण्याचीही संधीही उपलब्ध करून दिली जाते.
रिसर्च फेलोशिप योजना : ‘डीआरडीओ’मार्फत उच्च श्रेणीच्या संशोधनाला चालना देण्यासाठी रिसर्च फेलोशिप योजना राबवली जाते. या फेलोशिप तीन
प्रकारच्या आहेत- ज्युनियर रिसर्च फेलोशिप- या योजनेंतर्गत कोणत्याही शाखेतील बीई किंवा बी.टेक्., विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी, मानसशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी प्राप्त फेलोशिप मिळू शकते. वयोमर्यादा- २८ वर्षे. या योजनेतंर्गत दरमहा १६ हजार रुपये फेलोशिप आणि घरभाडे दिले जाते. संबंधित उमेदवारांना पदवी परीक्षेत प्रथम श्रेणी मिळणे आवश्यक आहे. सीनियर रिसर्च फेलोशिप- या योजनेंतर्गत एमबीबीएस/ बीडीएस/ अभियांत्रिकी वा तंत्रज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी प्राप्त फेलोशिप मिळू शकते. वयोमर्यादा- ३२ वर्षे. या योजनेतंर्गत दरमहा १८ हजार रुपये फेलोशिप आणि घरभाडे
दिले जाते. रिसर्च असोसिएट्स- या योजनेंतर्गत विज्ञान शाखेतील पीएच.डी./ एम.डी./ एम.एस. इन मेडिकल किंवा डेन्टल शाखा/ एम.टेक्./ एम.ई. आणि दोन वर्षांचा शिक्षण, संशोधन, डिझाइन आणि विकास या क्षेत्रातील अनुभव असावा. वयोमर्यादा ३० वर्षे. या योजनेतंर्गत दरमहा २४ हजार रुपये फेलोशिप आणि घरभाडे दिले जाते. संबंधित उमेदवारांना पदवी आणि पदव्युत्तर पदवी परीक्षेत प्रथम श्रेणी मिळणे आवश्यक आहे. याशिवाय इतर खर्चासाठी ज्युनियर आणि सीनियर रिसर्च फेलोशिप मिळालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक १५ हजार रुपये आणि रिसर्च असोशिएट्स वार्षिक २० रुपये सहाय्य दिले जाते.
निवड प्रक्रिया : निवड प्रक्रिया डायरेक्टारेट ऑफ लेबॉरेटरीज/ ‘डीआरडीओ’च्या संस्थांमार्फत राबवली जाते. यामध्ये मुलाखतीचा समावेश असतो. उमेदवाराचा कल संशोधनात्मक कार्याकडे आहे, हे पडताळण्यासाठी मुलाखत घेतली जाते. नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट किंवा युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनची ज्युनिअर रिसर्च फेलोशिप आणि ग्रॅज्युएट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट फॉर इंजिनीअर्स (GATE) ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाते.
वेबसाईट- http://www.drdo.gov
ईमेल- drdoentrytest@gmail.com