संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुण्यातील आगमन अगदी एकाच दिवसावर येऊन ठेपले आहे. तरीसुद्धा पुण्यावर केवळ ढगांची गर्दी दिसत आहे, मोठा पाऊस बेपत्ताच आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी पालख्या पुण्यातील पावसाला मुकणार की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानेही या शक्यतेला पुष्टी दिली आहे. हा अंदाज असे सांगतो, की पुण्यात पुढील काही दिवसांत पाऊस फारसा सक्रिय राहणार नाही. पाऊस पडलाच तर काही हलक्या सरी पडतील.
पालख्यांचे पुण्यातील आगमन आणि पाऊस यांचे जुने नाते आहे. पावसाच्या सरी झेलत, चिंब पावसाळी वातावरणात पालख्यांचे पुण्यात आगमन होते. जवळजवळ दरवर्षी अशीच स्थिती असते. हा जणू काही नियमच आहे, असे अनेक जण मानतात. या वर्षी हा नियम कायम राहणार की नाही, अशी शंका उपस्थित व्हावी असे वातावरण आहे. पाऊस सध्या राज्याच्या इतर भागात सक्रिय आहे. पुढील चार-पाच दिवसांतही, विशेषत: कोकण व विदर्भात त्याचा जोर असेल. पुण्यासह मध्य महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागात ढगाळ वातावरण कायम आहे. या भागात मान्सूनचे आगमनही झाले आहे. मात्र, येथे दमदार पावसाची शक्यता नाही. येत्या दोन दिवसांतही पुण्यात पावसाच्या फारतर एक-दोन सरी पडतील. त्यामुळे पालख्यांच्या आगमनाच्या दिवशी पुण्यात विशेष पाऊस नसेल, असाच हवामान विभागाचा अंदाज आहे.
पुणे पावसाला का मुकले?
बंगालच्या उपसागरात सध्या हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याच्या प्रभावामुळे विदर्भ व पूर्व भारतात जोरदार पाऊस सुरू आहे. बंगालच्या उपसागरात असे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले की सामान्यत: पुण्यातही पावसाचा जोर वाढतो. पुण्याबरोबरच सह्य़ाद्रीच्या घाटमाथ्यांवर म्हणजे लोणावळा-खंडाळा, ताम्हिणी, महाबळेश्वर अशा ठिकाणीही मुसळधार पाऊस पडतो. या वेळी मात्र असे झाले नाही. याबाबत भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या उपमहासंचालक डॉ. मेधा खोले यांनी सांगितले की, सध्याचे कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरात बरेच ईशान्येकडे निर्माण झाले आहे. ते बांगलादेशच्या किनाऱ्याजवळ आहे. ते ओरिसा किंवा पश्चिम बंगालच्या किनाऱ्याजवळ असते तर पुण्यात मोठय़ा प्रमाणात पाऊस पडला असता. या वेळी त्याची जागा वेगळी असल्याने पुणे मोठय़ा पावसाला मुकले आहे.
पुण्यात इनमीन अर्धा इंच पाऊस
पुण्यात १ जूनपासून आतापर्यंत केवळ १३.८ मिलिमीटर (साधारणत: अर्धा इंच) इतकाच पाऊस पडला आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, पुण्यात १ ते १९ जून या काळात ८५ मिलिमीटर पाऊस पडतो. या वेळी त्याचे प्रमाण खूपच कमी आहे. गुरुवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या चोवीस तासांत पुण्यात केवळ ०.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गुरुवारी दिवसभरही ढगाळ वातावरण होते. मात्र, एखादीच हलकी सर आली. पावसातील ही तूट कधी भरून निघणार, याबाबत आता उत्सुकता आहे.