‘माध्यमांमधली स्पर्धा आजकाल वाढली आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमांना तर प्रत्येक गोष्टीचा उगाच बाऊ करण्याची सवय झाली आहे.. अवघ्या काही दिवसांच्या अंतरानं माझी प्रतिमा ‘वाद उकरून काढणारा’ अशी झाली होती, त्याला ही स्पर्धाच जबाबदार’, अशी स्पष्टोक्ती करणाऱ्या गिरीश कर्नाडांनी ‘लोकसत्ता- आयडिया एक्स्चेंज’मध्ये अगदी दिलखुलास गप्पा मारल्या. त्यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन होण्यापूर्वी काही तास झालेल्या या गप्पांचा रोख आत्मचरित्राकडे होताच, पण तुमच्या नाटकांना मिथकांचा आधार का असतो, चित्रपटांकडे का वळलात, या वयातही नवं कसं काय लिहिता, अशा प्रश्नांना कर्नाड उत्तरं देत होते. त्यांच्या काळाची गोष्टच सांगत होते.. कर्नाडांशी झालेल्या दीर्घ गप्पांचा हा पहिला भाग. पुढील भाग रविवार, २ जूनच्या अंकात.. चांगल्या सिनेमाला ‘मल्टिप्लेक्स’मुळे बरे दिवस..मधल्या काळात व्यावसायिक कारणास्तव सिनेमा पूर्णपणे धंदेवाईक झाला होता. केवळ मनोरंजन आवडणाऱ्या प्रेक्षकांची संख्या अधिक असल्याने तेच चित्रपटाच्या यशापयशाचे भवितव्य ठरवायचे. दर्जेदार विषय, मांडणी,वेगळे प्रयोग हवे असलेले प्रेक्षक होते, पण त्यांची संख्या कमी होती. त्यामुळे मनोरंजन आवडणाऱ्यांना चित्रपटगृहापर्यंत आणण्यासाठी त्यांना आवडेल अशी नाचगाणी, मारहाण असा मसाला त्यात टाकला जायचा. बऱ्याचदा वितरकच चित्रपटाचे स्वरूप ठरवायचे. पंजाबी वितरकाला मारहाण हवी असायची तर तामीळ वितरकाला नाच-गाणी. त्यातून वेगळे विषय-प्रयोग करणे लेखक-दिग्दर्शकांना कठीण झाले. सिनेमासाठी प्रचंड पैसा लागत असल्याने पदरचे पैसे टाकून आपल्याला हवे ते करू, हे शक्य होत नाही. पण काही काळापूर्वी ‘मल्टिप्लेक्स’चे आगमन झाले. त्याने मोठी कलाटणी दिली. मल्टिप्लेक्सच्या आगमनामुळे सिनेमाची आर्थिक समीकरणे बदलली. भिन्न आवड असणाऱ्या प्रेक्षकांसाठी छोटय़ा-मोठय़ा आकाराची चित्रपटगृहे तयार झाली. त्यामुळे वेगळय़ा अभिरूचीच्या प्रेक्षकांसाठी चौकटीबाहेरचे विषय, मांडणी असणारे चित्रपट तयार करणे शक्य झाले. तशात कॉपरेरेट कंपन्याही पुढे सरसावल्याने वेगळय़ा सिनेमांची निर्मिती आर्थिकदृष्टय़ा परवडणारी ठरली. गेल्या काही काळात त्यातून अनेक चांगले चित्रपट आले. गिरीश कुलकर्णीचा ‘विहीर’, ‘विकी डोनर’सारख्या रूढ चौकटीबाहेरचा विषय अत्यंत सुलभपणे व सुंदररीत्या मांडणारा सिनेमा, ‘शांघाय’ ही काही नावे उदाहरणासाठी सांगता येतील. मल्टिप्लेक्सचे आगमन हे चांगल्या सिनेमाला वाव देणारे ठरले आहे. आम्ही चारचौघेमी जेव्हा नाटक लिहायला सुरुवात केली. त्यावेळी नुकतेच स्वातंत्र्य मिळाले होते आणि तो सांस्कृतिकदृष्टय़ा खूप सशक्त असा काळ होता. चित्रपटांमध्ये सत्यजित रे, बिमल रॉय, गुरुदत्त यासारखे लोक होते. त्याच काळात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची स्थापना झाली होती. सत्यदेव दुबेंनी मुंबईमध्ये हिंदी नाटकांसाठी चळवळ सुरू केली होती. त्या काळात म्हणजे १९६० ते साधारण १९८२ पर्यंत नाटकांशिवाय मनोरंजनाचे दुसरे साधनच नव्हते. मुख्य म्हणजे त्यावेळी टीव्ही नव्हता. त्यामुळे नाटकाला चांगला प्रेक्षक होता. आम्ही सगळे एका अर्थानं नशीबवान आहोत, की आम्ही सगळे एकाच काळात काम करत होतो. दुबे आणि अरविंद देशपांडे यांना विनोद दोशी यांनी वालचंद टेरेसमध्ये दिलेल्या जागेमुळे आमच्यासाठी हक्काची जागा मिळाली होती. त्यावेळी नाटकासाठी पैसा उपलब्ध होत होता, सकारात्मक वातावरण होते आणि आमच्यात कोणतीही स्पर्धा नव्हती, या सगळ्याचा खूप फायदा झाला. एकदा दुबेंना भेटायला वालचंद टेरेसला गेलो होतो, तिथे तेंडुलकरही होते. आम्ही दोघे तिथेच झोपलो. सकाळी उठलो तेव्हा तेंडुलकर गेले होते आणि शेजारी बादल सरकार झोपले होते. असा सगळा माहोल होता. एकमेकाच्या साथीशिवाय आम्हाला तरणोपाय नाही याची सगळ्यांनाच जाणीव होती. त्यावेळी आम्ही एकमेकांची नाटके आपापल्या भाषेत भाषांतरित केली. एका नाटकाच्या शुभारंभाच्या वेळी मोहन राकेश हसत हसत म्हणाले की, ‘‘भारतीय नाटकाचे भविष्य आमच्या हातात आहे.’’ तेंडुलकर, बादल सरकार, मोहन राकेश यांच्यापेक्षा मी दहा वर्षांनी लहान होतो, त्याचाही मला फायदा झाला. त्यांना जे जे मिळालं ते पुढे जाऊन माझ्यापर्यंत आलं. म्हणजे पुरस्कार वगैरे. आम्ही सगळे चांगले मित्र होतो. खरं तर माझ्या आधी तेंडुलकरांना ज्ञानपीठ मिळायला हवं होतं. त्यांना ते का मिळाले नाही, ते निश्चितपणे सांगता येणार नाही. मी असतो तर त्यांनाच पहिल्यांदा ज्ञानपीठ दिलं असतं. ‘तुघलक’ची जन्मकथामी जेव्हा ऐतिहासिक नाटक लिहायला सुरुवात केली, तेव्हा ऐतिहासिक नाटकाचा एक प्रचलित ढाचा होता. मी मोहेंजोदडोपासून इतिहास अभ्यासायला सुरुवात केली. पुढे मौर्य वगैरे करत मी तुघलकापाशी आलो. तुघलकाची ओळख एक ‘वेडा’ राजा म्हणून होती. तुघलकाला वेडा म्हटलं जात होतं आणि त्यानेच मला आकर्षित केलं. मला वेगळं ऐतिहासिक नाटक लिहायचं होतं, ज्यात आजच्या काळाचं प्रतििबब दिसेल. ऐतिहासिक व्यक्तींकडे भावनिक दृष्टिकोनातून पाहण्याऐवजी त्यांची मानसिकता, त्यामुळे घडलेले नाटय़ उलगडून दाखवण्याचा माझा प्रयत्न होता. ‘तुघलक’ हे नेहरूंच्या काळातील सामाजिक स्थिती आणि त्यांच्या कारकिर्दीचे विश्लेषण करणारे नाटक असल्याची चर्चा झाली. त्यावेळची परिस्थिती नाटकात परावर्तित झालेली असू शकते, पण मी मुळात राजकीय भाष्य करण्याच्या उद्देशाने ‘तुघलक’ लिहिलं नव्हतं. मिथकांमधून दिसून येणाऱ्या मानसिकतेने मला नेहमीच आकर्षित केले आहे. .. ऑन टोस्टबंगलोर शहराबद्दल मी ‘बेंदकाळु ऑन टोस्ट’ लिहिलं. आम्ही बंगलोरमध्ये राहणारे सारे कन्नड लेखक, मुळात ग्रामीण भागातून आलेलो आहोत. मराठीत जे ‘ग्रामीण साहित्य’ असं काहीतरी वेगळं आहे, तसं कन्नडमध्ये नाहीच- अख्खं कन्नड साहित्य हेच ग्रामीण साहित्य. शहरी साहित्य कन्नडमध्ये आत्ता येऊ घातलंय.. दुसरीकडे या शहराशी नाळच न जुळलेले, केवळ आर्थिक संबंधानं बंगलोरवासी झालेले लोक इथं वाढताहेत. या शहराच्या नावाबद्दल एक कथाच अशी आहे की, एक राजा विपन्नावस्थेत इथं आला. त्याला खायलादेखील काही मिळालं नव्हतं. एका म्हातारीनं त्याला उकडलेले दाणे दिले- त्याला कन्नडमध्ये बेंदाकाळु म्हणतात, किंवा इंग्रजीत बेक्ड बीन्स. तर, हे बेंदाकाळुचं गाव म्हणून बेंदाकाळु+ऊरु पुढे बंगळुरू झालं, अशी कथा. या कथेचा नाटकाच्या कथानकाशी नाही पण नावाशी संबंध आहे. नाटकाचं कथानक १५ पात्रांमधून एकेक करून उलगडतं, पण ही सारी बंगळुरूमध्ये आर्थिक कारणांनी असलेली पात्रं. नाटकाच्या नावातली ‘बेंदाकाळु ऑन टोस्ट’ ही सरमिसळ, ही ‘बेक्ड बीन्स ऑन टोस्ट’ खाणाऱ्या या शहराची बदलती संस्कृती. मराठी नाटक मात्र पुणे शहराबद्दलच मी लिहिलंय, असं काहीजणांना वाटतं! हे श्रेय अर्थातच मोहितचं (टाकळकर) आहे. एका शहराबद्दलचं नाटक, दुसऱ्या शहरात गेलं तरी ते तिथलं वाटतं, याचा अर्थ ही समस्या दोन्ही शहरांची आहे. ..अर्थात, मघाशी मी म्हणालोच की मी काही समस्याप्रधान वगैरे नाटकं लिहिणारा नाही. मी माणसांबद्दल लिहितो. आणखी लिहावं, आणखी वेगळय़ा प्रकारे लिहावं, असं वाटतं तोवर लिहीतच राहीन नवंनवं. मिथक-नाटक : शिरसी ते ऑक्सफर्डमाझ्या मिथक नाटकांची मुळं माझ्या शिरसीतील बालपणातल्या काळात शोधावी लागतील. सुरुवातीची काही वर्षे आमचं वास्तव्य पुण्यात होतं. माझे वडील सरकारी नोकरीत होते. पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये ते डॉक्टर होते. परंतु दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांची कर्नाटकातील शिरसीला बदली झाली. त्यामुळे माझी वाढ द्वैभाषिक अशीच झाली. पुण्यात आम्ही खूप मराठी, पारशी वगैरे नाटकं पाहात असू. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण मी प्रथम वाचले ते ना. सी. फडके. त्यांच्याशिवाय अन्यही मराठी लेखकांची पुस्तके मी वाचत होतो. शिरसीत वडिलांची बदली झाल्यावर माझी आई खूपच वैतागली. कुठल्या रानात येऊन पडलोत, असं ती म्हणत असे. उत्तर कर्नाटकातील हे गाव. घनदाट जंगलानं वेढलेलं. त्याकाळी शिरसीत वीजही आली नव्हती. त्यामुळे मिट्ट काळोख पडल्यावर कंदिलाच्या प्रकाशातच वावरावं लागे. रात्री घरी वडीलधाऱ्यांकडून पौराणिक कथा, रामायण, महाभारतातल्या कथा, लोककथा सांगितल्या जात. रात्रीचं ते गहन-गूढ वातावरण, या कथांमधील अद्भुतरम्यता यांनी आम्ही मुलं भारावून जात असू. तेव्हा तिथं दुसरी काही मनोरंजनाची साधनं नसल्यानं शाळेतही मुलांना फावल्या वेळात गोष्टीच सांगायला सांगितलं जाई. शिरसीत एक-दोन मोडकी थिएटर्स होती. तिथं कर्नाटकातील छोटय़ा नाटक कंपन्या मराठी संगीत नाटकं नाव बदलून आपल्या परीनं सादर करीत. उदाहरणार्थ ‘संगीत सम्राट’ (सं. संशयकल्लोळ) वगैरे. याशिवाय हरिकथा, कीर्तनं, यक्षगान वगैरेही सतत तिथं पाहायला मिळत. यक्षगान सादर करणारे कलावंत त्यातल्या आपल्या वाटय़ाला आलेल्या भूमिका इतक्या समरसून करत, की लिखित संहिता नसूनही त्या अत्यंत प्रभावी होत. वेशभूषेशिवायच्या या सादरीकरणांचाही माझ्यावर चांगलाच प्रभाव पडला. इरावती कव्र्याची ‘युगान्त’ही याच दरम्यान माझ्या वाचनात आल्यानं महाभारतातील व्यक्तिरेखांचं त्यातलं विश्लेषणही माझ्यावर परिणाम करून गेलं होतं. या सर्वाच्या प्रभावाबरोबरच तिथले कैलाशम् आणि आद्य रंगाचार्य ही मंडळीही, मो. ग. रांगणेकर- आचार्य अत्र्यांच्या पद्धतीचीच सामाजिक नाटकं तिथं सादर करीत होती. ‘स्थळ : दिवाणखाना’ याभोवतीच ही नाटकं गुंफलेली असल्यानं मला त्यांचा उबग येत असे. आपण अशी नाटकं करायची नाहीत असं मी तेव्हाच मनात पक्कं ठरवलं होतं. याच दरम्यान मी अल्काझींचं ‘अॅण्टिगनी’ मुंबईत पाहिलं. ते युरोपियन नाटकं करायचे. दुसऱ्या महायुद्धाचा हा काळ असल्याने सेन्सॉरशिपचा कांच होता. त्यामुळे मिथस्चा वापर करून ते आपल्याला जे मांडायचं आहे ते आपल्या नाटकांतून मांडत असत. एकीकडे आपली नाटकं भक्तिरसपूर्ण असल्याने त्यात खरीखुरी शोकांतिका सादर करणं शक्यच नव्हतं. कारण संकटात सापडलेल्याच्या मदतीला देव धावून येणार हे ठरलेलंच असायचं. त्यामुळे या फॉर्ममध्ये शोकांतिकेची शक्यताच मला दिसत नव्हती. म्हणून मग मी ‘ययाति’मध्ये मिथककथेचा आधार घेतला. पुढे ‘अग्निवर्षां’मध्येही हा मिथस्चा वापर केला आहे. पुढे मी ऑक्सफर्डला गेल्यावर मिथ्सचा वापर करून विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात लिहिल्या गेलेल्या फ्रेंच ट्रॅजिडिज पाहिल्या. त्यातून मला मिथ्सचा वापर करून आधुनिक आशय नाटकातून मांडता येईल हे लक्षात आलं. त्यातून माझ्या मिथक-नाटकांची निर्मिती झाली. काळाचं दस्तावेजीकरणआत्मचरित्रात पूर्णपणे सत्य लिहिलं जात नाही असं म्हटलं जातं, पण ते कुठल्या अर्थाने हेही पाहिलं पाहिजे. स्त्रियांविषयी लिहिताना बरेच लेखक लपवाछपवी करतात. आयुष्यात आलेल्या स्त्रियांविषयी सांगत नाहीत. तुम्हाला मैत्रिणी असतील, तुमच्या काही प्रेयसीही असतील, तर त्याविषयी न लपवता सांगितलं पाहिजे. सेक्स रिलेशनशिपबाबत मला काही म्हणायचं नाही, त्या तुटू शकतात. पण एखादं नातं तुमच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव टाकणारं असेल, तर त्याविषयी लिहिलं पाहिजे, असं मला वाटतं.दुसरं म्हणजे माझा काळ हा महत्त्वाचा काळ आहे. १९३८ ला माझा जन्म झाला, ४७ ला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि भारत-पाक फाळणी झाली. ६० चे दशक हे भारतीय सिनेमाचा सुवर्णकाळ होता. याच काळात विजय तेंडुलकर, मोहन राकेश, बादल सरकार हे नाटककार लिहीत होते. त्यामुळे माझं आयुष्य हे एकापरीने या काळाचं दस्तावेजीकरण आहे, ‘रेकॉर्ड ऑफ एज’ आहे. ते सर्व नोंदवलं गेलं पाहिजे म्हणून मी आत्मचरित्र लिहिलं. मूळ कन्नडमध्ये लिहिलेल्या या आत्मचरित्राला मी ‘आडाडता आयुष्य’ असं नाव दिलं आहे. हे शीर्षक मी प्रसिद्ध कन्नड-मराठी कवी द. रा. बेंद्रे यांच्या एका कवितेवरून घेतलं आहे. ‘नोड नोडता दिनमान, आडाडता आयुष्य’ अशी ती कवितेची ओळ आहे. म्हणजे खेळता खेळता आयुष्य निसटून गेलं. यात थोडी विषादाची छटा आहे. खेळता खेळता जिंकलो पण काहीतरी राहून गेलं, असं माझ्या मनात हे शीर्षक ठेवताना होतं. त्यासाठीच मी ते घेतलं. पण मराठीत तो भाव येतो की नाही, याबाबत जरा मी साशंक होतो, पण नंतर मी असा विचार केला, की बेंद्रे हे मराठीतही लिहिणारे लेखक होते, त्यामुळे त्यांना त्यानिमित्ताने सलाम करता येईल असं वाटलं. म्हणून ते नाव न बदलता मी आहे तसंच ठेवलं. मोठय़ा भावाविषयी..मी आत्मचरित्रातल्या पहिल्याच प्रकरणात माझ्या आई आणि मोठय़ा भावाविषयी सविस्तर लिहिलं आहे. माझी आई विधवा होती. तिला आधीच्या पतीपासून एक मुलगा झाला होता. आई नर्स होती आणि वडील डॉक्टर. दोघांचंही एकमेकांवर प्रेम होतं. पण आईला खात्री वाटत नव्हती, की हा माणूस आपल्यासारख्या विधवेशी लग्न करेल किंवा नाही? आई आसरा शोधत होती. पण वडिलांना समाज काय म्हणेल ही भीती होतीच. शेवटी दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. त्या आधी ते दोघं पाच वर्षे एकत्र राहत होते. त्या काळी असा निर्णय घेणं हे मोठं धाडसाचं काम होतं. शेवटी त्यांनी लग्न केलं. तेव्हा तो विषय खूप चर्चेचा झाला होता. समाजात आई-बाबांविषयी काहीबाही बोललं जात होतं. तेव्हा माझा हा मोठा भाऊ आठ-नऊ वर्षांचा होता. त्याच्या ते सगळं कानावर येत होतं. ते ऐकून त्याच्या मनावर काय परिणाम झाला असेल, याचा मी विचार केला. त्याविषयी लिहिलं. ही गोष्ट आई-बाबांनी आमच्यापासून लपवून ठेवली होती. त्यामुळे तो आमचा सख्खा भाऊ आहे असेच आम्ही अनेक वर्षे समजत होतो. आईने वयाच्या ८२ वर्षी आपली कहाणी लिहिली, तेव्हा आम्हाला त्याविषयी समजले. ती वाचल्यावर मला या गोष्टीचा उलगडा झाला. खरा प्रश्न निर्माण झाला तो वडिलांचं निधन झाल्यावर. लोक म्हणाले, की तुझ्या मोठा भावाला अग्नी देण्याचा अधिकार नाही. कारण तो त्यांचा मुलगा नाही. तो तुला देता येईल किंवा तुझ्या मधल्या भावाला देता येईल. मला त्याचं कारण कळलं नाही. कारण तोही जन्मभर कर्नाड हेच नाव लावत होता. त्यामुळे त्याला तो अधिकार मिळावा यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागला. कादंबरी उत्तम, चित्रपटावर बंदी!सत्यजित रे यांचे चित्रपट पाहून मी प्रभावित झालो, सिनेमाकडे वळलो. चित्रपट करून पाहणं, हेच माझं ध्येय होतं. यू. आर. अनंतमूर्ती यांची ‘संस्कार’ ही कादंबरी एक महान कलाकृती आहे. यावर चित्रपट झाला पाहिजे, असं मी आणि माझ्या वीसेक मित्रांनी ठरवलं. स्वतचे पैसे घालून तो चित्रपट ९५ हजार रुपयांत पूर्ण केला.. आताचे फार तर २० लाख रुपये. मी तेव्हा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसमध्ये संपादक होतो.. आता सांगायला हरकत नाही, तेव्हा ऑक्सफर्डनं मला दिलेली गाडीच आम्ही आमच्या चित्रपटाच्या प्रॉडक्शनसाठी वापरायचो. ‘मद्रास ग्रूप’ हे आमच्या चित्रपटसंस्थेचं अनौपचारिक नाव. चित्रपट पूर्ण झाला खरा, पण तो ब्राह्मणविरोधी असल्याची ओरड झाली.खरं तर त्या कादंबरीत ब्राह्मणविरोधी असं काहीच नव्हतं. ग्रामीण जीवनाचं अगदी खरंखुरं चित्रण करणारी ती कादंबरी. एका व्यसनी आणि समाजाच्या मते अनैतिक वर्तन करणाऱ्या इसमाच्या मृत्यूनंतर, तो ब्राह्मण होता म्हणून त्याच्यावर ब्राह्मणांच्या पद्धतीप्रमाणे अंत्यसंस्कार करावेत की नाही, या प्रश्नावरून अख्खं गावच दुभंगलं जातं, असं ते कथानक. वास्तव अगदी अचूकपणे दाखवणारी. त्यामुळे सरकारनं या चित्रपटावर बंदी घातल्यावर, यात बंदी घालण्यासारखं काय आहे, असा प्रश्न आम्हां सर्वाना पडला. मग आम्हीही प्रतिवाद करू लागलो- या कादंबरीचे लेखक ब्राह्मण, चित्रपटाचा निर्माता ब्राह्मण, मी दिग्दर्शक होतो तोही ब्राह्मणच आणि या चित्रपटाशी संबंधित असलेले एकंदर १२ जण ब्राह्मण. मग आम्ही कशाला ब्राह्मणविरोधी प्रचार करू, असंही म्हणून पाहिलं. पण बंदी कायम राहिली आणि आम्हीही हंगामा करत राहिलो. परिणाम एवढाच झाला, की या चित्रपटाची प्रसिद्धी जोरदार झाली आणि बंदी जेव्हा उठली, तेव्हा तो भरपूर चालला! याच चित्रपटातला माझा अभिनय श्याम बेनेगल यांनी पाहिला आणि मला ‘निशांत’ मध्ये भूमिका दिली. माझं हिंदी चित्रपटांतलं अभिनयाचं करिअर सुरू झालं.