भारतीय नौदलातील भरतीप्रक्रिया

भारतीय नौदलातर्फे केल्या जाणाऱ्या विविध अधिकारीवर्ग आणि कर्मचारीवर्ग पदांसाठीच्या भरतीप्रक्रियेची माहिती-

भारतीय नौदलातर्फे केल्या जाणाऱ्या विविध अधिकारीवर्ग आणि कर्मचारीवर्ग पदांसाठीच्या भरतीप्रक्रियेची माहिती-
भारतीय नौदलाचे वर्णन ‘उत्कृष्ट जीवन- वैश्विक अनुभव’ असे केले जाते. भारतीय नौदलात वेळोवेळी विविध स्तरांवरील अधिकारी आणि कर्मचारीवर्ग यांच्या नेमणुका केल्या जातात. नियमित स्वरूपातील भरती प्रक्रियेद्वारे नौदलाच्या तांत्रिकशाखा, पाणबुडी शाखा आणि कार्यकारी शाखेत भरती केली जाते.
अर्हता :
० तांत्रिक शाखा : ’ अभियांत्रिकी शाखा- मेकॅनिकल/ मरिन/ ऑटोमोटिव्ह/ मेटलर्जी/ मेकॅट्रॉनिक्स/ इंडस्ट्रिअल अ‍ॅण्ड प्रॉडक्शन/ मेटलर्जी/ एरोनॉटिक्स/ एरोस्पेस या विषयातील बीई किंवा टेक किंवा बॅचलर ऑफ सायन्स इन मरिन इंजिनीअरिंग. ’ इलेक्ट्रिकल शाखा- इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इन्स्ट्रमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन/ पॉवर इंजिनीअरिंग/ कंट्रोल सिस्टीम/ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स या विषयातील बीई किंवा बीटेक.
० पाणबुडी (सबमरिन) शाखा : ’ इंजिनीअरिंग- मेकॅनिकल/ मरिन/ ऑटोमोटिव्ह/ मेटलर्जी/ मेकॅट्रॉनिक्स/ इंडस्ट्रिअल अ‍ॅण्ड प्रॉडक्शन/ एरोनॉटिक/ एरोस्पेस/ प्रॉडक्शन/ इंडस्ट्रिअल इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंट/ ऑटोमेशन अ‍ॅण्ड रोबोटिक्स/ इन्स्ट्रमेंटेशन अ‍ॅण्ड कंट्रोल या विषयातील बीई किंवा टेक किंवा बॅचलर ऑफ सायन्स इन मरिन इंजिनीअरिंग. ’ इलेक्ट्रिकल- इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इन्स्ट्रमेंटेशन.
०  कार्यकारी शाखा : कोणत्याही विषयातील विषयातील बीई किंवा टेक. उमेदवारांची निवड करताना एनसीसी- सी प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या उमेदवारांना प्राधान्य. उमेदवाराची उंची १५७ सेंमी. तांत्रिक शाखा-सामान्य सेवा आणि पाणबुडी शाखेतील उमेदवारांसाठी दृष्टी चष्म्याशिवाय ६/२४ आणि चष्म्यासह ६/६. कार्यकारी शाखा- उमेदवारांसाठी दृष्टी चष्म्याशिवाय ६/१२ आणि चष्म्यासह ६/६ अशी असावी. सर्व शाखांसाठी- वयोमर्यादा- किमान साडे एकोणीस आणि कमाल वयोमर्यादा २५ वष्रे.
निवड प्रक्रिया- उमेदवारांची निवड कार्यकारी शाखा आणि तांत्रिक शाखेसाठी शॉर्ट सव्‍‌र्हिस कमिशनद्वारे केली जाते. सब लेफ्टनंट म्हणून निवड झालेले उमेदवार कालबद्ध पदोन्नतीने लेफ्टनंट, लेफ्टनंट कमांडर आणि कमांडर असा वरचा टप्पा गाठतात.
विविध लाभ आणि सवलती- निवड झालेल्या उमेदवारांना अधिकारी पदासाठी असलेल्या वेतनासोबतच दरमहा लष्करासाठी म्हणून असलेला खास भत्ता सहा हजार रुपये दिला जातो तसेच वाहतूक भत्ता, मोफत गणवेश दिला जातो. उमेदवारांना शासकीय निवासस्थान उपलब्ध होते. ज्यांना असे निवासस्थान मिळू शकत नाही त्यांना मूळ पगाराच्या १० ते ३० टक्क्यांच्या प्रमाणात घरभाडे भत्ता दिला जातो. शासनामार्फत जे क्षेत्र, कठीण क्षेत्र म्हणून घोषित केले आहे, अशा ठिकाणी कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना वेतनाच्या २५ टक्के अधिक भत्ता दिला जातो. सागरी वाहतुकीत असणाऱ्या जहाजावर अधिकाऱ्यांना पदानुसार दरमहा ६२०० ते ६५०० रुपये, तांत्रिक अधिकाऱ्यांना २५०० ते ६२५० रुपये, इन्स्ट्रक्टर- २२५० रुपये आणि प्रशिक्षित पाणबुडी चालकांना – ११२५० ते १७५०० रुपये इतका भत्ता दरमहा दिला जातो.
याशिवाय उमेदवार आणि त्याच्या कुटुंबीयांना वैद्यकीय सेवा, उपाहारगृह सुविधा, अन्नधान्य, भोजनगृह/ क्लब/ क्रीडा सुविधा दिल्या जातात. घरबांधणीसाठी अल्प व्याजाने कर्ज दिले जाते.
तांत्रिक शाखेतील अधिकाऱ्यांना ४० लाख रुपयांचे आणि पाणबुडीतज्ज्ञ अधिकाऱ्यांना ४७ लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. यासाठी उमेदवारांना आपला वित्तीय सहभाग द्यावा लागतो. वार्षकि ६० दिवसांच्या अर्जति रजा आणि दरवर्षी किरकोळ २० रजा दिल्या जातात. रेल्वे प्रवासासाठी लागणाऱ्या भाडय़ामध्ये ४० टक्के सवलत दिली जाते. काही ठिकाणी उमेदवार आणि त्याचे कुटुंबीय मोफत प्रवास करूशकतात. या उमेदवारांना त्यांच्या आवडीच्या क्रीडा प्रकारात सहभागी होता यावे यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. रिव्हर राफ्टिंग, पर्वतारोहण, हँग ग्लायिडग, विंड सर्फिंग, हॉट एअर बलुनिंग अशासारखे साहसी खेळ शिकण्यासाठी आणि त्यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.
प्रारंभिक निवड दहा वर्षांसाठी : निवड झालेल्या उमेदवारांना प्रारंभी १० वर्षांसाठी शॉर्ट सव्‍‌र्हिस कमिशन दिले जाते. या कालावधीतील उमेदवारांची गुणवत्ता, कामगिरी आणि उमेदवारांची इच्छा बघून ही सेवा पुढे १४ वर्षांपर्यंत विस्तारित होऊ शकते. नौदलातील शिस्तबद्ध आयुष्य आणि या काळात प्राप्त केलेले व्यावसायिक कौशल्य आणि नेतृत्वगुणांच्या बळावर निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना दुसऱ्या करिअरची निवड करताना उपयुक्त ठरतात.
निवड प्रक्रिया – या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची पदवी परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करून कॉल लेटर्स पाठवले जातात. गुणांचे कटऑफ ठरविण्याचा अधिकार इंटिग्रेटेड हेडक्वॉर्टर्स, संरक्षण मंत्रालय (नौदल) यांना आहे. या अनुषंगाने कोणताही पत्रव्यवहार केला जात नाही. उमेदवारांच्या मुलाखती भोपाळ, बंगळुरू, कोईम्बतूर, विशाखापट्टणम येथे घेतल्या जातात. या मुलाखती दोन टप्प्यांत पार पडतात.
पहिला टप्पा- या टप्प्यात बुद्धिमत्ता चाचणी, समूह चर्चा आणि पिक्चर पस्रेप्शन (चित्रांकन भूमिका) यांचा समावेश असतो.
दुसरा टप्पा- पहिल्या टप्प्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र ठरवले जाते. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्याच दिवशी परत पाठवले जाते. दुसऱ्या टप्प्यात मानसशास्त्रीय चाचणी, समूह चर्चा आणि मुलाखतीचा समावेश असतो. या टप्प्याचा कालावधी चार दिवसांचा असतो. या टप्प्यात यशस्वी ठरलेल्या उमेदवारांना वैद्यकीय परीक्षेला सामोरे जावे लागते. ही परीक्षा साधारणत: तीन ते पाच दिवस चालते. ही परीक्षाी यशस्वीरीत्या पार पाडलेल्या उमेदवारांची अखिल भारतीय स्तरावरची गुणवत्ता यादी तयार केली जाते. त्यानंतर उपलब्ध जागेनुसार उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवले जाते. मुलाखतीसाठी पहिल्यांदाच बोलावणे आले असल्यास रेल्वेच्या थ्री टायर एसीचे जाण्या-येण्याचे भाडे दिले जाते.
प्रशिक्षण- इंडियन नेव्हल अकॅडमी येथे प्रशिक्षण दिले जाते. तांत्रिक शाखा सामान्य सेवेसाठी निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण २२ आठवडय़ांचे तर कार्यकारी शाखा सामान्य सेवेसाठी निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण ४४ आठवडय़ांचे असते. या प्रारंभिक प्रशिक्षणानंतर प्रत्यक्ष कार्याचे अनुभव नौदलाच्या विविध केंद्र आणि जहाजांवर दिले जाते. या काळात त्यांना पूर्ण वेतन दिले जाते.
प्रोबेशन कालावधी दोन वर्षांचा असतो. या काळातील कामगिरी अथवा वर्तणूक समाधानकारक नसल्यास उमेदवारांना प्रशिक्षणामधून काढून टाकलं जाऊ शकते. पाणबुडी शाखेसाठी निवड झालेल्या उमेदवारांनासुद्धा अशाच प्रकारे प्रशिक्षण घ्यावे लागते. या प्रशिक्षणानंतर या शाखेतील उमेदवारांना सबमरिन क्वालिफाईंग बोर्ड परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. ही परीक्षा अनुत्तीर्ण झाल्यास उमेदवारांना परत पाठवले जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय या शाखेसाठी असलेले विशेष वेतन आणि भत्ता लागू होत नाही. फक्त अविवाहित तरुणच या पदांसाठी अर्ज करू शकतात. प्रशिक्षणाच्या काळात या तरुणांनी विवाह केल्यास त्यांचे प्रशिक्षण संपुष्टात आणले जाते. प्रशिक्षणावर केलेला खर्च वसूल केला जातो.
अर्ज प्रक्रिया- इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागतो. वय आणि नावाबाबतची माहिती ही शालांत परीक्षेतील प्रमाणपत्रानुसारच असावी. ई-मेल, मोबाइल नंबर ही माहिती अत्यावश्यक स्वरूपाची आहे. ऑनलाइन अर्ज भरताना २५ केबी आकाराचे पासपोर्ट छायाचित्र jpeg प्रकारात सोबत असू द्यावे. कारण हे छायाचित्र अर्जासोबत त्याच वेळी अपलोड करणं गरजेचे असते. एकदा अर्ज पाठवल्यानंतर छायाचित्र दुसऱ्यांदा पाठवता येत नाही. अर्ज पाठवल्यानंतर दोन प्रतींमध्ये त्याच्या प्रती प्रिंट कराव्यात. दोन्ही प्रतींवर सही करावी. एक प्रत पोस्ट बॉक्स क्रमांक ४, चाणक्य पुरी पोस्ट ऑफिस नवी दिल्ली- ११००२१ या पत्त्यावर पाठवावी. सोबत दहावी आणि बारावी परीक्षांच्या प्रमाणपत्रे/ गुणपत्रिका आणि इतर शैक्षणिक अर्हतेच्या छायांकित आणि राजपत्रित अधिकाऱ्यांनी स्वाक्षरांकित केलेल्या प्रती, स्व-स्वाक्षरांकित स्वत:चे छायाचित्र जोडावे. अर्ज पाठवण्यात येणाऱ्या लिफाफ्यावर ऑनलाइन अ‍ॅप्लिकेशन नंबर…, अ‍ॅप्लिकेशन फॉर एसएससी एक्स (जीएस)/ हायड्रो कॅडर/ टेक्निकल ब्रँच(ई/एल/एसएम), कोर्स क्वालिफिकेशन.., परसेंटेज..%, एनसीसी-येस/ नो, असं नमूद करणे आवश्यक असते. संपर्क संकेतस्थळ- http://www.nausena-bharti.nic.in 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व way to success बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Indian navy recruitment process

ताज्या बातम्या