गणितात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिटय़ूटमध्ये पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमांची आणि त्यांच्या प्रवेशप्रक्रियांची माहिती-

जर पाल्याला गणितात गती असल्यास बारावीनंतर चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिटय़ूटमधील गणितविषयक अभ्यासक्रमांचा जरूर विचार करावा. चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिटय़ूट ही आपल्या देशातील गणित आणि संगणकीय शास्त्र या विषयांचे उच्च शिक्षण देणारी आणि संशोधन कार्याला सहाय्य करणारी महत्त्वाची संस्था आहे. या संस्थेत गणितातून बीएस्सी आणि एमएस्सी अभ्यासक्रम राबवले जातात. हे अभ्यासक्रम देशातील सर्वोत्कृष्ट अभ्यासक्रम मानले जातात. हे अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना जगभरातील नामवंत संस्थांमध्ये उच्चपदस्थ नोकरीच्या संधी प्राप्त झाल्या आहेत. या संस्थेला केंद्र सरकारने विद्यापीठाचा दर्जा दिला असून संस्थेला केंद्र सरकारचे आणि इतर खासगी उद्योगांचे वित्तीय सहाय्य प्राप्त होते.
गणिती आणि संगणकीय कौशल्यांची गरज
विविध क्षेत्रांसाठी निवडक प्रतिभावंत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी या संस्थेने गणिती अभ्यासक्रम सुरू केले आहेत. हे  अभ्यासक्रम भौतिकशास्त्र, गणित आणि संगणकीय क्षेत्रांतील संशोधक शिकवत असल्यामुळे या क्षेत्राशी संबंधित अशा अनेक नव्या संकल्पना विद्यार्थ्यांना इथे सातत्याने शिकायला मिळतात. एमएस्सी पातळीवरील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात गणित, संगणक शास्त्रातील प्रगत विषयांचा समावेश करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम लवचिक असून तो विद्यार्थ्यांना संशोधनात्मक करिअरमध्ये प्रगती साधण्यास उपयुक्त ठरतो. विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे संगणकीय कौशल्य अवगत व्हावे यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा संस्थेत उपलब्ध करून दिल्या जातात.
संस्थेतील अभ्यासक्रम- = बीएस्सी (ऑनर्स) इन मॅथेमॅटिक्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटर सायन्स = बीएस्सी (ऑनर्स) इन मॅथेमॅटिक्स अ‍ॅण्ड फिजिक्स = एमएस्सी इन मॅथेमॅटिक्स
= एमएस्सी इन कॉम्प्युटर सायन्स = एमएस्सी इन अ‍ॅप्लिकेशन ऑफ मॅथेमॅटिक्स = पीएच.डी इन मॅथेमॅटिक्स = पीएच.डी इन कॉम्प्युटर सायन्स = पीएच.डी इन फिजिक्स.
बीएस्सी अभ्यासक्रम : हा अभ्यासक्रम तीन वर्षांचा आणि सहा सत्रांमध्ये विभाजित करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अखिल भारतीय पातळीवर प्रवेश परीक्षा घेतली जाते. यंदा ही परीक्षा १८ मे २०१५ रोजी होणार आहे. गणित विषयासह बारावी उत्तीर्ण विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात. नॅशनल सायन्स ऑलिम्पियाडमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या विद्यार्थ्यांना चाचणी परीक्षेत सवलत मिळू शकते.
या अभ्यासक्रमाचे शुल्क प्रत्येक सत्राला ७५० रुपये आहे. या अभ्यासक्रमासाठी मर्यादित स्वरूपात शिष्यवृत्तीसुद्धा दिली जाते. त्यात संपूर्ण शिकवणी शुल्क माफ आणि दरमहा चार हजार रुपयांचे वित्तीय सहाय्य याचा समावेश आहे. काही विद्यार्थ्यांना फक्त शिकवणी शुल्क माफ केले जाते. या अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांला दरमहा एक हजार रुपयांचे विद्यावेतन दिले जाते.
एमएस्सी अभ्यसाक्रम : हा अभ्यासक्रम दोन वर्षांचा आणि चार सत्रांमध्ये विभाजित करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा आणि मुलाखत घेतली जाते. चाचणी परीक्षा देशभरातील विविध केंद्रांवर होत असली तरी मुलाखत मात्र चेन्नई कॅम्पसमध्येच घेतली जाते. अर्हता- बीएस्सी, बी. मॅथ, बी. स्टॅट, बी. टेक.
या अभ्यासक्रमाचे शुल्क ४,८०० रुपये आहे. मर्यादित स्वरुपात शिष्यवृत्तीसुद्धा दिली जाते. यामध्ये शिकवणी माफ आणि दरमहा सहा हजार रुपयांचा समावेश आहे. काही विद्यार्थ्यांना फक्त शिकवणी शुल्क माफ केले जाते. शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची प्रत्येक सत्रातील कामगिरी लक्षात घेतली जाते.
पीएच.डी अभ्यासक्रम : गणितामध्ये पीएच.डी करण्यासाठी अर्हता- एमएस्सी गणित किंवा अभियांत्रिकी पदवी आणि संशोधन करण्याकडे तीव्र कल. संगणकीय शास्त्रामध्ये पीएच.डी करण्यासाठी अर्हता- एमएस्सी किंवा अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान पदवी, एमसीए किंवा विज्ञान विषयातील पदवी आणि संशोधन करण्याकडे तीव्र कल.  भौतिकशास्त्रामध्ये पीएच.डी करण्यासाठी अर्हता- एमएस्सी- भौतिकशास्त्र किंवा भौतिकशास्त्र विषयातील पदवी आणि संशोधन करण्याकडे तीव्र कल.
या तिन्ही पीएच.डी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देशभरातील विविध केंद्रांमध्ये प्रवेश परीक्षा घेतली जाते. मुलाखत मात्र चेन्नईत घेतली जाते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पहिल्या दोन वर्षांसाठी दरमहा १६ हजार रुपये आणि पुढील तीन वर्षांसाठी दरमहा १८ हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. पुस्तकखरेदी आणि इतर नमित्तिक खर्चासाठी वार्षकि १० हजार रुपये दिले जातात.
हे अभ्यासक्रम चेन्नईस्थित इन्स्टिटय़ूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सच्या सहकार्याने चालवले जातात. अभ्यासक्रम शिकवण्यासाठी टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च- मुंबई, आयआयटी- मद्रास, द इंटरयुनिव्हर्सटिी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रॉनॉमी अ‍ॅण्ड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स- पुणे आदी महत्त्वाच्या संस्थांमधील तज्ज्ञ शिकवायला येतात.
या संस्थेने पॅरिसस्थित इकॉले नॉर्मले सुप्रियर या संस्थेशी शैक्षणिक सहकार्य करार केला आहे. ही संस्था गणित विषयात संशोधन करणारी आणि शिक्षण देणारी जगातील आघाडीची संस्था मानली जाते. या संस्थेत चेन्नई मॅथेमॅटिकल संस्थेच्या विद्यार्थ्यांना उन्हाळी संशोधनात्मक प्रकल्पासाठी पाठवले जाते. याशिवाय इतरही परदेशी संस्थांसोबत असेच शैक्षणिक सहकार्य करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्ञानकक्षा रुंदावण्यासाठी सहाय्य मिळते.
या संस्थेतील विद्यार्थ्यांना अमेरिकेतील कॅल्टेक, शिकागो, कॉन्रेल, हार्वर्ड, एमआयटी, प्रिन्स्टॉन, स्टॅन्डफोर्ड, यू पेन, येल विद्यापीठांमध्ये, फ्रान्समधील इएनएस-पॅरिस, युनिव्ह-पॅरिस, युनिव्ह- बॉरडेक्स विद्यापीठात, जर्मनीतील मॅक्स प्लॅन्क इन्स्टिटय़ूट, हॅमबोल्ड युनिव्हर्सटिी यासारख्या नामवंत विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेण्यास प्राधान्याने संधी मिळते.
या संस्थेतील विद्यार्थ्यांना मुख्यत्वे गणित, संगणकीय शास्त्र आणि भौतिकशास्त्र या क्षेत्रांत उत्तमोत्तम करिअरच्या संधी मिळतात. काही विद्यार्थी फायनान्शियल मॅथेमॅटिक्स, मॅनेजमेंट अ‍ॅण्ड इकोनॉमिक्स या क्षेत्रांतही करिअर करत आहेत. शिवाय येथील अनेक विद्यार्थ्यांना देशी-परदेशी उत्कृष्ट सॉफ्टवेअर कंपन्यांमध्येही संधी मिळाली आहे.
होस्टेल व्यवस्था- संस्थेचे अभ्यासक्रम हे पूर्णपणे निवासी स्वरुपाचे आहेत. त्याकरता विद्यार्थ्यांसाठी कॅम्पसमध्ये निवासव्यवस्था उपलब्ध आहे. याची फी सध्या प्रत्येक सत्राला १९ हजार रुपये आहे.
पत्ता- चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिटय़ूट, एच वन, सिपकॉट आयटी पार्क, सिरुसेरी, केलाम्बक्कम. वेबसाइट–www.ac.in
ईमेल- admissions@cmi.ac.in

नया है यह!
एम.एस्सी इन अ‍ॅप्लाइड मॅथेमॅटिक्स-
हा अभ्यासक्रम गौतम बुद्ध युनिव्हर्सटिीने सुरू केला आहे. कालावधी- दोन वष्रे. अर्हता- बीएस्सी इन मॅथमॅटिक्स.
पत्ता- को-आíडनेटर, अ‍ॅडमिशन ऑफिस, गौतम बुद्ध युनिव्हर्सटिी, ग्रेटर नॉयडा, जिल्हा- गौतम बुद्धनगर- २०१३१२.
वेबसाइट- http://www.gbu.in

सुरेश वांदिले – ekank@hotmail.com