हवामानशास्त्र
प्रतिव्यापारी वाऱ्यांची वैशिष्टय़े
= प्रतिव्यापारी वाऱ्यांची दिशा व गती अनिश्चित असते. काही वेळेला हे वारे संथपणे वाहतात तर काही वेळेस त्यांना उग्र वादळी रूप प्राप्त होते.
= प्रतिव्यापारी वारे कर्क व मकरवृत्तातील जास्त दाबाच्या प्रदेशाकडून ध्रुववृत्तावरील कमी दाबाच्या प्रदेशाकडे वाहतात.
= प्रतिव्यापारी वारे उष्ण प्रदेशाकडून थंड प्रदेशाकडे वाहत असतात, त्यामुळे या वाऱ्यांची बाष्पधारण शक्ती कमी होते.
= उत्तर गोलार्धात प्रतिव्यापारी वाऱ्यांच्या दिशेवर आवर्त-प्रत्यावर्ताचा परिणाम होतो. हिवाळ्यात प्रतिव्यापारी वारे वेगाने वाहतात.
= दक्षिण गोलार्धात सागरी प्रदेश जास्त असल्याने प्रतिव्यापारी वारे नियमितपणे वाहतात. दक्षिण गोलार्धामध्ये ४० अंश दक्षिण अक्षवृत्ताच्या पलीकडे भूप्रदेशाचा अडथळा नसल्याने हे वारे वेगाने वाहतात. वाहताना ते विशिष्ट आवाज करत वाहतात, म्हणून यांना ‘गर्जणारे चाळीस वारे’ असे म्हणतात. (Roaring Fortie)
= ५० अंश दक्षिण अक्षवृत्ताच्या पलीकडे संपूर्ण सागरी प्रदेश असल्याने या वाऱ्यांना कोणताच अडथळा असत नाही. या भागात वाऱ्यांचा वेग जास्त असतो व ते उग्र स्वरूप धारण करतात, म्हणून त्यांना ‘खवळलेले पन्नास वारे’ (Furious fifties) किंवा ‘शूर पश्चिमी वारे’ असे म्हणतात.
3. ध्रुवीय वारे (Polar Easterlies)
= ध्रुवाजवळील हवेच्या जास्त दाबाच्या प्रदेशाकडून ध्रुवाजवळ ६० ते ७० अंश उत्तर व दक्षिण दरम्यान असणाऱ्या ध्रुववृत्तीय कमी दाबाच्या पट्टय़ाकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना ‘ध्रुवीय वारे’ असे म्हणतात.
= ध्रुवीय वारे साधारणपणे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात, म्हणून त्यांना ‘पूर्व ध्रुवीय वारे’ असे म्हणतात.
= उत्तर गोलार्धात या वाऱ्यांना ‘नॉरईस्टर’ असे म्हणतात. ते अतिशय वेगाने वाहतात.
जगाचा भूगोल
नवीन अभ्यासक्रमानुसार या घटकात ‘जागतिक भूगोल’ समाविष्ट केला आहे. हा घटक अभ्यासताना आपल्याकडे जगाचा नकाशा असणे आवश्यक आहे व वेळ मिळेल तेव्हा जगाच्या नकाशात महत्त्वाची शहरे, डोंगर रांगा, नदीप्रणाली तसेच वृत्तपत्रांत उल्लेख केलेले शहर पाहावे. अशा तऱ्हेने केलेला अभ्यास लक्षात राहायला सोपा ठरतो. जगाचा अभ्यास खंडांनुसार करावा. उदा. आशिया खंड अभ्यासताना आशिया खंडांतील देश, तेथील डोंगररांगा, नदीप्रणाली, हवामानाचे वैशिष्टय़, या खंडात आढळणारी खनिज संपत्ती व येथील वाहतूक प्रणाली अशा प्रकारे अभ्यास करावा. आज आपण युरोप खंड अभ्यासणार आहोत.
युरोप : युरोप हा जगातील सर्वाधिक दाट लोकवस्तीचा औद्योगिकीकरण झालेला खंड आहे. त्याच्या उत्तरेला बेरेन्टस् समुद्र, पश्चिमेला अटलांटिक महासागर आणि दक्षिणेला भूमध्य समुद्र आहे. ग्रेट ब्रिटन, आयलँड आणि आईसलँड ही प्रमुख बेटे आहेत. याशिवाय ओर्कने, शेटलँड, फेरोस, सिसिली, साíडना इ. लहान बेटे आहेत.
युरोप खंडातील महत्त्वाच्या नद्या
पो नदी : इटलीमधून वाहणाऱ्या या नदीच्या किनाऱ्यावर व्हेनिस शहर वसलेले आहे.
तिबर नदी : इटलीतून वाहणाऱ्या या नदीच्या किनाऱ्यावर रोम वसलेले आहे.
ऱ्होन नदी : ही नदी स्वित्झरलँडमधील जिनिव्हा सरोवरातून वाहत पुढे भूमध्य सागराला जाऊन मिळते.
डॅन्युब नदी : ही जगातील एकमेव नदी आहे की आठ देशांमधून वाहत जाऊन मध्य युरोपातून वाहत जाऊन पुढे काळ्या समुद्राला जाऊन मिळते. या नदीच्या किनाऱ्याला व्हिएन्ना, बुडापेस्ट, बेल्ग्रेड इत्यादी महत्त्वाची शहरे वसलेली आहेत.
व्होल्गा नदी : ही युरोपातील सर्वात लांब नदी आहे.
(३६९० कि.मी.)