‘पाहू द्या रे मज विठोब्बाचे रूप’ असे म्हणत आळंदी ते पंढरपूर पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांसमवेत जाणाऱ्या पालखी सोहळय़ासाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा आधुनिक रथ सज्ज झाला आहे. दिघी येथील लष्कराच्या संशोधन आणि विकास संस्थेने (आर अँड डी. ई.) आधुनिक तंत्रज्ञानासह विकसित केलेला हा दिवेघाट झोकात सर करणार आहे.
आर अँड डी. ई. संस्थेने माउलींच्या रथाचे प्रारूप विकसित केले. हा रथ गेल्या वर्षी पालखी सोहळय़ात प्रथमच सहभागी झाला होता. यंदाच्या वर्षी या रथामध्ये तांत्रिकदृष्टय़ा काही बदल करण्यात आले आहेत. रथाच्या डिझाइनचे काम विवेक खटावकर यांनी केले असून त्यावर केमिकलमध्ये डीप करून चांदीचा मुलामा चढविण्यात आला आहे. बॅटरी ऑपरेटेड हा स्वयंचलित रथ असल्याने गेल्या वर्षी हा रथ ओढणाऱ्या बैलांवरील ताण कमी झाला होता. या वर्षीच्या रथावर बसविण्यात आलेल्या बॅटरीच्या क्षमतेची नव्याने चाचणी घेण्यात आली आहे.
गेल्या वर्षी विकसित केलेल्या या रथासाठी यंदा आठ खांब, गाडय़ाचे रेिलग आणि पॅनेल्स नव्याने करण्यात आली आहेत. त्यापैकी दर्शनी भागाच्या दोन खांबांवर जय-विजय, हनुमान आणि गरुड कोरण्यात आले आहेत. या नव्या रथावर केमिकलमध्ये डीप करून चांदीचा मुलामा देण्यात आला आहे, असे प्रसिद्ध कलादिग्दर्शक विवेक खटावकर यांनी सांगितले. गेल्या वर्षीच्या रथामध्ये जाणवलेल्या तांत्रिक आणि इलेक्ट्रिकलविषयक त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. रथावर सहा किलोवॉट क्षमतेची बॅटरी बसविण्यात आली आहे. आठ तास पूर्णवेळ चालू शकेल अशी या बॅटरीची क्षमता आहे. गेल्या वर्षी पालखी दिवेघाट चढून गेल्यानंतरही केवळ तीन तास बॅटरी खर्च झाली होती. त्याचप्रमाणे सीसीटीव्ही कॅमेऱ्याची लोकेशन्सही बदलण्यात आली आहेत, अशी माहिती संस्थेच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.
बैलांचा ताण कमी होणार
गेल्या वर्षी रथाला असलेल्या बॅटरी मीटरची रचना बदलण्यात आली. बैलांचे चालणे थांबले की बॅटरीची मोटार कट-ऑफ होऊन आपोआप ब्रेक लागतो. ही सुधारणा यंदाच्या रथामध्ये करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिकल कंपोनंट असलेला दांडा रथाला होता. त्यामुळे चालताना बैलांचा पाय अडकत होता. ही रचनादेखील बदलण्यात आली असून त्यामुळे बैलांवर असलेला ताण यंदा पूर्णपणे कमी होणार आहे.