scorecardresearch

वैमानिक व्हायचंय?

वैमानिक होण्यासाठी उपलब्ध असलेल्या अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती..

वैमानिक होण्यासाठी उपलब्ध असलेल्या अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती..
जगातील हवाई वाहतूक प्रचंड वेगाने वाढत आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार २०२८ सालापर्यंत जगातील विमानांची संख्या सध्यापेक्षा दुप्पट होईल आणि वाहतूक तिप्पट होईल. पुढील २० वर्षांत दरवर्षी २० हजारांच्या आसपास प्रशिक्षित वैमानिकांची गरज भासू शकते. या क्षेत्रात करिअरच्या संधी मोठय़ा असल्या तरी हे प्रशिक्षण बरेच महागडे आणि कष्टाचे आहे. वैमानिक प्रशिक्षण देणाऱ्या देशातील काही प्रमुख संस्था पुढीलप्रमाणे आहेत-

* इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अ‍ॅकॅडमी – ही केंद्र सरकारच्या नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी स्वायत्त संस्था आहे. या संस्थेत विविध प्रकारच्या हवाई वाहतुकीचे प्रशिक्षण दिले जाते. असे प्रशिक्षण देणारी ही आपल्या देशातील सर्वोत्कृष्ट संस्था आहे. संस्थेत प्रशिक्षणाची अत्याधुनिक संसाधने उपलब्ध आहेत. संस्थेतील प्रशिक्षित वैमानिकांना देश-विदेशातील खासगी आणि शासकीय विमानसेवेत उत्तमोत्तम करिअर संधी प्राप्त झाल्या आहेत.
संस्थेमार्फत कमíशयल पायलट लायसन्स कोर्स हा अभ्यासक्रम चालवला जातो. कालावधी- दीड वर्षे. आवश्यकतेनुसार हा कालावधी वाढू शकतो. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मोठी विमाने चालवण्यासाठीचा परवाना प्राप्त होतो. या अभ्यासक्रमासाठी दर तीन महिन्यांनी नव्या तुकडय़ांची भरती केली जाते. पुढील शैक्षणिक तुकडीचा प्रारंभ ऑगस्ट २०१६ मध्ये होणार आहे.
प्रवेशजागा – १५०. (खुला संवर्ग- ७५, अनुसूचित जाती- २३, अनुसूचित जमाती- ११, नॉन क्रिमिलेअर इतर मागासवर्गीय संवर्ग- ४३. अनुसूचित जाती/जमाती आणि नॉन क्रिमिलेअर इतर मागास संवर्गातील उमेदवारांना चाळणी परीक्षेतील गुणांमध्ये ५ टक्के सवलत दिल्यावरही त्यांची निवड होऊ शकली नाही तर या जागा खुला संवर्गातील उमेदवारांना दिल्या जातात.
अर्हता – खुला संवर्ग- बारावी विज्ञान परीक्षेत गणित आणि भौतिकशास्त्र या विषयात किमान ५५ टक्के गुण आणि इंग्रजी विषयात उत्तीर्ण होणे आवश्यक. अनुसूचित जाती/जमाती आणि नॉन क्रिमिलेअर इतर मागास संवर्ग- बारावी विज्ञान परीक्षेत गणित आणि भौतिकशास्त्र या विषयात किमान ५० टक्के गुण आणि इंग्रजी विषयात उत्तीर्ण होणे आवश्यक. हा अभ्यासक्रम करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचे वय १७ वष्रे असावे.
मुलाखती/ कलचाचणीच्या दिवशीपर्यंत सर्व उमेदवारांकडे आवश्यक शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांना वर्ग एक वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागते. अशा डॉक्टरांची यादी संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
प्रशिक्षण शुल्क – ३२,५०० लाख रुपये. ही रक्कम चार हप्त्यांत भरता येते. यामध्ये सेवा कराचा समावेश नाही. याबाबतचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून त्याचा निकाल लागल्यास उमेदवारांना सेवा कराची रक्कम भरावी लागू शकते. गणवेश, अभ्यास साहित्य, हेड फोन्स, परीक्षा, परवाना शुल्क व प्रशिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या इतर सामग्रीसाठी अतिरिक्त दीड लाख रुपयांचा खर्च उमदेवारांना करावा लागतो. सर्व संवर्गासाठी हा खर्च समान स्वरूपाचा आहे. मुला-मुलींसाठी स्वतंत्र भोजनव्यवस्था असणारे वसतीगृह आहे. याचा दरमहा अपेक्षित खर्च दहा हजार रुपये आहे.
निवड प्रक्रिया – यामध्ये तीन टप्पे आहेत- ऑनलाइन चाळणी परीक्षा. ही परीक्षा २८ मे २०१६ रोजी होणार आहे. मुलाखत वैमानिक कल चाचणी/ सायकोमेट्रिक टेस्ट (ही चाळणी उत्तीर्ण झाल्यास उमेदवारांची नावे अंतिम निवड यादीत येऊ शकतात. कोणत्याही संवर्गातील उमेदवारांना या चाळणी परीक्षेतून कोणत्याही प्रकारची सवलत दिली जात नाही.)
परीक्षा केंद्रे- मुंबई, पुणे, नागपूर.
परीक्षेचा अभ्यासक्रम- सामान्य इंग्रजी, गणित, भौतिकशास्त्र, कार्यकारण भाव, चालू घडामोडी. प्रश्नपत्रिका बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असून वस्तुनिष्ठ पद्धतीची व बहुपर्यायी आहे. अर्ज ऑनलाइन भरावा लागतो. संपर्क- इंदिरा गांधी, राष्ट्रीय उडाण अ‍ॅकॅडेमी, फुरसतगंज एअरफिल्ड रायबरेली- २२९३०२. ई-मेल- igrua.exam@gmail.com
संकेतस्थळ – http://www.igrua.gov.in

* बॉम्बे फ्लाईंग क्लब- देशातील या सर्वात जुन्या फ्लाईंग क्लबने कमíशअल पायलट ट्रेनिंग सुरू केले आहे. गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांसह बारावी उत्तीर्ण उमेदवार या अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकतात. किमान वयोमर्यादा –
१८ वष्रे पूर्ण. महाराष्ट्र शासनाने धुळे येथील विमानतळ या क्लबच्या शैक्षणिक उपयोगासाठी दिलेला आहे. प्रशिक्षणाचा कालावधी- ८ ते १० महिने. या प्रशिक्षणात २०० तासांच्या हवाई उड्डाणाचा समावेश आहे. दुहेरी, एकेरी, भूपृष्ठावरील उड्डाण, नियमित स्वरूपाचे उड्डाण, सुरक्षितरीत्या विमान धावपट्टीवर उतरवणे, हवाई मार्ग, रात्रीचे उड्डाण आदी प्रशिक्षण दिले जाते.
या संस्थेंतर्गत कार्यरत कॉलेज ऑफ एविएशनने, बी.एस्सी इन एविएशन हा तीन वष्रे कालावधीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे.
अर्हता – भौतिकशास्त्र आणि गणित याविषयासह बारावी उत्तीर्ण. हा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहे.

या अभ्यासक्रमात पुढील बाबींचा समावेश आहे –
हवाई प्रशिक्षण – हे प्रशिक्षण जुहू-मुंबई आणि धुळे येथे दिले जाते. साधारणत: २०० तासांचे हे प्रशिक्षण आहे.
जमिनीवरील प्रशिक्षण – हवाई वाहतुकीचे नियमन, हवाई कायदे, भारतीय एअरक्राफ्ट कायदा १९३४, इंडियन एअरक्राफ्ट रुल्स १९३७, मुख्य वैमानिकाच्या जबाबदाऱ्या, परवान्याचे नूतनीकरण, सुरक्षा प्रक्रिया व उपाययोजना, उड्डाणाची मूलभूत तत्त्वे, एरोनॉटिकल नकाशे आणि आराखडे, उड्डाणाचे नियोजन, वैश्विक वेळ कार्यप्रणाली, उपग्रहीय दळणवळण, हवाई व्यवस्थापन कार्यप्रणाली, भविष्यवेधी हवाई कार्यप्रणाली आणि विमानाची कामगिरी आदी बाबींचा परामर्श घेतला जातो.
हवामानशास्त्राचे प्रशिक्षण- हवामान आणि हवामानातील बदल, पृथ्वीच्या पृष्ठभागावर आणि त्यावरील थरावर वाऱ्याचे भ्रमण, त्याचा विमानाचा वेग आणि वाहतुकीवर होणारा परिणाम, हवाई वाहतुकीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हवामानाचा अंदाज आदी विषयांची माहिती दिली जाते.
प्रकल्प- पदवीच्या तिसऱ्या वर्षांत उमेदवारांना अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकल्प पूर्ण करावे लागतात. त्यामुळे उमेदवारांना हवाई वाहतूक उद्योगाची सद्य:स्थिती, या उद्योगाच्या गरजा आणि आवश्यकता याची सविस्तर माहिती मिळते. हवाई वाहतुकीच्या सध्याच्या काळातील गरजा लक्षात घेऊन या प्रकल्पांमध्ये सतत नावीन्य आणले जाते आणि बदल केले जातात. संपर्क- द बॉम्बे फ्लाइंग क्लब, विलेपाल्रे- पश्चिम, मुंबई-४०००५६.
ई-मेल- piolotinfo@bfcaviation.com
संकेतस्थळ- http://www.thebombayflyingclub.com

* सीएई ऑक्सफोर्ड एविएशन अ‍ॅकॅडेमी – गोंदियास्थित ही संस्था एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या संयुक्त विद्यमाने स्थापन करण्यात आली आहे. या संस्थेने कमíशअल पायलट ट्रेनिंग अभ्यासक्रम सुरू केला आहे.
अर्हता – भौतिकशास्त्र, गणित आणि इंग्रजी या विषयासह बारावी उत्तीर्ण. या अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी सीएई एअरक्रू सिलेक्शन सिस्टीम अंतर्गत घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागते. ही चाळणी परीक्षा गोंदिया, बेंगळुरू आणि दिल्ली येथे घेतली जाते.
संपर्क – सीएई ऑक्सफर्ड एव्हिएशन अ‍ॅकॅडेमी, नॅशनल फ्लाइंग इन्स्टिटय़ूट, द्वारा- एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया, बिर्सी विमानतळ, पोस्ट ऑफिस परसवाडा, गोंदिया- ४४१६१४. संकेतस्थळ – http://www.caeoaa.com/gondia gondiaacademy@cae.com

मराठीतील सर्व way to success ( Way-to-success ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Be an airline pilot