दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअरनिवडीची दिशा सुस्पष्ट व्हावी, याकरिता ‘लोकसत्ता’च्या मुख्य अंकात गुरुवार, १४ एप्रिलपासून ‘मार्ग यशाचा’ ही लेखमालिका सुरू होत आहे. दोन महिने सुरू राहणाऱ्या या दैनंदिन लेखमालिकेत दहावी आणि बारावीनंतरच्या कला, विज्ञान, वाणिज्य, तंत्रज्ञान विद्याशाखांमधील विविध अभ्यासक्रमांची माहिती देण्यात येईल. यात पदवी, पदविका, पदव्युत्तर, एकात्मिक अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या लेखमालिकेत अभ्यासक्रमांच्या माहितीसोबतच उपलब्ध असलेल्या आघाडीच्या शिक्षणसंस्था, प्रवेशप्रक्रिया, प्रवेशपरीक्षेचे (असल्यास) स्वरूप, शुल्करचना, संस्थेतील सोयीसुविधा, संबंधित अभ्यासक्रमाशी निगडित करिअर संधी अशी भरगच्च माहिती देण्याचा आमचा प्रयत्न राहील. त्याचबरोबर देशी-परदेशी संस्थांच्या अथवा विद्यापीठांच्या पदवी-पदव्युत्तर स्तरावरील विविध शिष्यवृत्त्या तसेच मुलखावेगळ्या अद्ययावत अभ्यासक्रमांची ओळखही विद्यार्थ्यांना या सदरामार्फत होईल. विद्यार्थी व पालकांच्या सोयीकरिता ज्या संस्थांमध्ये अथवा विद्यापीठांत हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत, त्या प्रत्येक संस्थेचा पत्ता, वेबसाइट व ई-मेलही दिला जाणार आहे. दहावी आणि बारावी या करिअर निवडीच्या- पर्यायाने अभ्यासक्रम निवडीच्या महत्त्वाच्या टप्प्यांवर विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांचे आणि संस्थांचे पर्याय कळावेत आणि त्यांना प्रवेशाचा निर्णय घेणे सुकर व्हावे, याकरिता ‘मार्ग यशाचा’ ही दैनंदिन लेखमालिका निश्चितच उपयुक्त ठरेल.