उत्तर प्रदेश पादाक्रांत करण्याएवढी पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता अजूनही टिकून आहे का? पंजाबसारखे पूर्ण राज्य जिंकून आम आदमी पक्ष सर्वांना आश्र्च्र्यचकित करेल का? मोदींच्या नाकावर टिच्चून हरीश रावत पुन्हा उत्तराखंड टिकवतील का? मनोहर पर्रिकर पुन्हा भाजपला गोवा जिंकून देतील का? आणि मणिपूरच्या रूपाने भाजप ईशान्य भारतातीत स्थान पक्के करेल का?

यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरे मिळविण्याची उत्कंठा शिगेला पोचली असेल. पण त्यासाठी आज (शनिवार) सायंकाळपर्यंत थांबावे लागेल. पाच राज्यांची मतमोजणी सकाळ आठ वाजता चालू होईल आणि सायंकाळपर्यंत सर्व चित्र स्पष्ट झालेले असेल.

उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आण मणिपूर या पाच राज्यांतील निवडणुकीला २०१९मधील लोकसभा निवडणुकीची उपांत्यफेरी मानली जात आहे. त्यामुळे एकीकडे ही निवडणूक अखिलेशसिंह यादव, प्रकाशसिंह बादल, हरीश रावत, लक्ष्मीकांत पार्सेकर आणि काँग्रेसचे ओकराम इबोबीसिंह या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्याबरोबर मोदींच्या सुमारे तीन वर्षांंच्या कामगिरीबद्दलचे प्राथमिक मत व्यक्त करणारी असेल.

मतदानोत्तर चाचण्यांनुसार उत्तर प्रदेशात भाजपला सर्वाधिक मोठा पक्ष होण्याचा अंदाज वर्तविला आहे. तीन चाचण्यांमध्ये तर भाजपला स्पष्ट बहुमताचा व्होरा आहे. पण इतरांच्या मते भाजपला बहुमतासाठी सुमारे पंचवीस जागा कमी पडतील. तशा त्रिशंकू स्थितीमधील घडामोडींनी वातावरण तापू लागलेले आहे.

सर्वांचे लक्ष मायावती यांच्या हालचालींकडे असेल. उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्येही भाजपला चांगली संधी असल्याचे म्हटले आहे. खरोखरच या चाचण्या खरया ठरल्या तर ४-१ने भाजप एकतर्फी विजय मिळवू शकतो. त्यामुळे भाजपच्या गोटात उत्साहवर्धक वातावरण आहे. सट्टा बाजाराचाही कल भाजपकडे असल्याची माहिती आहे.

पण विरोधकांनी या चाचण्यांवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. राहुल गांधींनी तर चाचण्या खोटय़ा ठरण्याचा ठाम दावा केला. त्यासाठी त्यांनी बिहारचा दाखला दिला. बिहारवेळी सातपैकी तीन चाचण्यांनी भाजप जिंकण्याचा अंदाज वर्तविला होता. पण प्रत्यक्षात नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्या महाआघाडीला २२४पैकी तब्बल १७८ जागा मिळाल्या होत्या.

कौल कोणाला..?

  • ’२०१९मधील लोकसभा निवडणुकीची उपांत्य फेरी मानल्या गेलेल्या या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये मोदी, शहा, राहुल गांधी, अखिलेशसिंह यादव, मायावती, अरविंद केजरीवाल, मनोहर पर्रिकर आदी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
  • ’मतदानोत्तर चाचण्यांनी भाजपच्या गोठात उत्साह. तरीही मनात मोठी धाकधूक. विशेषत: उत्तर प्रदेशाबद्दल अजूनही तितकीशी खात्री वाटत नाही. याउलट चाचण्या खोटय़ा ठरण्यासाठी विरोधकांकडून देव पाण्यात
  • ’या निवडणुकांकडे मोदी सरकारच्या कामगिरीचे मूल्यमापनाबरोबरच नोटाबंदीच्या वादग्रस्त निर्णयमवरील निर्णायक कौल म्हणून पाहिले जात आहे.