उत्तर प्रदेश जिंकण्याचा राहुल गांधींचा दावा

मतदानोत्तर चाचण्यांच्या नुसत्या अंदाजांनीच समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व मुख्यमंत्री अखिलेशसिंह यादव घायाळ झाल्याचे दिसत असतानाच काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मात्र अतिशय ठामपणाने उत्तर प्रदेश जिंकण्याचा दावा शुक्रवारी केला. बिहारप्रमाणेच यंदाही मतदानोत्तर चाचण्या खोटय़ा ठरतील, अशी भविष्यवाणीही त्यांनी केली.

संसदेच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, जनमत चाचण्यांबद्दल मी माझे मत व्यक्त करणार नाही. पण मतदानोत्तर चाचण्या बिहारमध्ये खोटय़ा ठरल्या होत्या. आताही तसेच होईल. उत्तर प्रदेशात आम्हीच जिंकू. मला त्याचा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आता ११ मार्चलाच बोलू.

राहुल गांधींच्या पुढे एक पाऊल जाऊन काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवालांनी तर उत्तर प्रदेशासह पाचही राज्ये जिंकण्याचा दावा केला. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनीही मतदानोत्तर चाचण्या फोल ठरण्याचा दावा केला. किंबहुना सर्व विरोधी पक्षांनी चाचण्यांच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

गुरुवारी रात्री प्रसिद्ध झालेल्या बहुतेक चाचण्यांनी उत्तर प्रदेशात भाजपला आघाडी दाखविली आहे. पण बहुमत गाठण्याबाबत टोकाची मते व्यक्त केली आहेत. ‘न्यूज २४ टुडेज चाणक्य’ने भाजपला थेट दोनतृतीयांश बहुमत (२८५) देऊ  केले. तसेच समाजवादी पक्षाला ८८, तर मायावतींना फक्त १५ ते ३९ जागा मिळण्याचे भाकीत त्यांनी केले. असाच अंदाज ‘इंडिया टुडे- माय अक्सिस’ने केला. त्यांच्या मते, भाजपला २५१-२७९ जागा मिळतील. याउलट ‘एबीपी न्यूज’ व ‘सीएसडीएस’ने केलेल्या चाचणीनुसार, भाजपला (१६४-१७६) बहुमतासाठी किमान पंचवीस जागा कमी पडू शकतात. या पाश्र्वभूमीवर राहुल यांनी मतदानोत्तर चाचण्या खोटय़ा ठरण्याचा दावा केला.