उत्तरप्रदेशमधील निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत सत्तास्थापनेच्या दिशेने आगेकूच सुरु केली आहे. आता उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार कोण असणार यावर चर्चा सुरु झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, भाजपचे उत्तरप्रदेशमधील प्रदेशाध्यक्ष केशवप्रसाद मौर्य, बरेलीतील खासदार संतोष गंगवार, खासदार योगी आदित्यनाथ ते भाजपाध्यक्ष अमित शहा यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहेत.

उत्तरप्रदेशमधील निवडणुकीवर भाजपची मदार होती ती नरेंद्र मोदींवर. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच राज्यसभेतील बहुमताच्या दृष्टीने भाजपसाठी उत्तरप्रदेशमधील निवडणूक महत्त्वाची होती. एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात भाजपने एकहाती विजय मिळवत सत्ताधारी समाजवादी पक्षासोबतच काँग्रेस, बसपचा सूपडा साफ केला. भाजपने ४०३ पैकी ३०० हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. यावरुन उत्तरप्रदेशमध्ये भाजपची सत्ता येणार हे आता स्पष्ट झाले आहे,

वनवाल संपवून भाजप उत्तरप्रदेशमध्ये सत्तेवर येणार असून या महत्त्वाच्या राज्यात भाजप मुख्यमंत्रीपदी कोणाला संधी देणार यावर चर्चा सुरु झाली आहे. दिल्ली निवडणुकीतून धडा घेत भाजपने उत्तरप्रदेशमध्ये निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदासाठीचा उमेदवार जाहीर केला नव्हता. भाजपकडून सध्या दोन नाव आघाडीवर आहेत. यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष केशव मौर्य आणि अर्थ राज्यमंत्री संतोष गंगवार ही नावं आघाडीवर आहेत. मौर्य हे हिंदूत्ववादी संघटनेतून आले आहेत. तसे झाल्यास पूर्वांचलमधून उत्तरप्रदेशला ब-याच वर्षांनी मुख्यमंत्री मिळू शकेल. दुसरीकडे गंगवार हे १९८९ पासून भाजप खासदार आहेत. आत्तापर्यंत त्यांनी फक्त २००९ मध्येच पराभवाचा सामना केला होता. गंगवार हे कुर्मी समाजातील असून या समाजाने भाजपला नेहमीच साथ दिली आहे.

केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा हेदेखील मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असू शकतील. याशिवाय लखनऊमधील भाजप नेते दिनेश शर्मा यांनादेखील मुख्यमंत्रीपदी संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे. दिनेश शर्मा हे अमित शहा यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जाते. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे नावदेखील आघाडीवर असून ते पुन्हा उत्तरप्रदेशमध्ये परतू शकतात असा अंदाजही वर्तवला जात आहे. याशिवाय योगी आदित्यनाथ, कलराज मिश्रा यांचे नावही चर्चेत आहेत.