उत्तरप्रदेशमधील मुस्लिमबहूल भागात भाजपला जास्त मतं कशी मिळाली असा प्रश्न उपस्थित करत हिंमत असेल तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी व्होटींग मशिनऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यावे असे खुले आव्हान बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी दिले आहे. लोकशाहीला धोका निर्माण झाला असून याप्रकरणी आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली आहे असे त्यांनी नमूद केले.

उत्तरप्रदेशमधील निवडणुकीत भाजपच्या झंझावातासमोर सप, काँग्रेस आणि बसपची वाताहत झाली आहे. निवडणुकीच्या निकालावर मायावती यांनी दुपारी पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला आहे. निवडणुकीतील निकाल धक्कादायक असून हे निकाल कोणाच्याच पचनी पडलेले नाहीत. या निकालावरुन मतदान यंत्रात गडबड झाल्याचे दिसते असा आरोप त्यांनी केला आहे. मुस्लिमबहूल भागातही भाजपलाच सर्वाधिक मत मिळाल्याचे निदर्शनास आणून देत मतदान यंत्र मॅनेज केले गेले असा दावा त्यांनी केला. मुस्लिमांची मत भाजपला मिळावी हे कोणालाही पटणारे नाही असे मायावतींनी म्हटले आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही मतदान यंत्रात गडबड केल्याचा आरोप झाला होता. तर नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीतही मतदान यंत्रात फेरफार झाल्याचे समोर आले होते असे त्यांनी नमूद केले. ६ मार्च २०१७ रोजी माझ्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनीही हाच मुद्दा मांडला होता अशी आठवण त्यांनी करुन दिली. या सर्व प्रकारावर मौन बाळगणे हे लोकशाहीसाठी घातक ठरेल. भाजपने मतदान यंत्रात गडबड झाली नाही हे लिखित स्वरुपात द्यावे आणि हिंमत असेल तर व्होटींग मशिनऐवजी जुन्या पद्धतीद्वारे म्हणजेच मतपत्रिकेनुसार मतदान घ्यावे असे आव्हानच त्यांनी दिले. अन्य पक्षांनीही मतदान यंत्रातील गोंधळाविषयी गंभीरपणे दखल घ्यायला हवी. मतदारांचा मतदान यंत्रावरील विश्वास उडाला आहे. याप्रकरणी आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे असे त्यांनी सांगितले.