उत्तरप्रदेशमधील जनतेला एक्सप्रेस वे न आवडल्याने मतदारांनी बुलेट ट्रेनला मतदान केले. पण आम्हाला उत्तरप्रदेशमधील जनतेचा कौल मान्य आहे. लोकशाहीत कधीकधी समजावून नाही तर भूलथापा देऊन मते मिळवता येतात असा टोला समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी भाजपला लगावला आहे. मायावती यांनी मतदान यंत्रातील घोटाळ्याविषयी तक्रार केली असेल तर सरकारने या आरोपांची चौकशी केली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

उत्तरप्रदेशमधील निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता मिळाली असून भाजपच्या विजयाने सत्ताधारी समाजवादी पक्षाला मोठा हादरा बसला आहे. पराभवानंतर अखिलेश यादव यांनी पत्रकार परिषद घेतली. आम्ही शेतक-यांचे १६०० कोटीचे कर्ज माफ केले होते. आता भाजप सत्तेवर येताच शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. दरोडे, चोरी यात कोणते राज्य आघाडीवर हे भाजपने जाहीर केले पाहिजे. आता नोटाबंदीतून बाहेर आलेला किती पैसा गरीबांपर्यंत पोहोचतो याकडे माझे लक्ष असल्याचे यादव म्हणालेत.

समाजवादी पक्षाच्या सभेला गर्दी झाली. लोक आले पण ते फक्त ऐकण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी आले होते का ? हेच मला समजत नाही असे त्यांनी नमूद केले. समाजवादी पक्षाने राज्यात चांगले काम केले. आता राज्यातील नवीन सरकार आमच्यापेक्षा चांगले काम करणार का हेच मला बघायचे आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले. २०१९ मधील निवडणूक अजून लांब आहे. मी पराभवाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार असून या पराभवावर विचारमंथन करु असे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेससोबत आघाडी केल्याने सपला फटका बसला अशी चर्चा रंगली आहे. यावर प्रतिक्रिया देताना अखिलेश यादव म्हणाले, काँग्रेससोबत आघाडी केल्याचा आम्हाला फायदा झाला. पत्रकार परिषदेनंतर अखिलेश यादव यांनी राजभवनमध्ये जाऊन राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्त केला.