उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाचा दिवस जसजसा जवळ येतोय तसतशी प्रचारात रंगत येत आहे. बहुजन समाज पक्षाच्या सुप्रिमो व माजी मुख्यमंत्री मायावती यांनी बुलंदशहर येथील आपल्या प्रचारसभेत भाजपवर निशाणा साधला. उत्तर प्रदेशमध्ये भाजप सत्तेवर आल्यास आरक्षण बंद होईल, अल्पसंख्याकांना पुरवण्यात येणाऱ्या सुविधा बंद केल्या जातील. भाजप राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा अजेंडा राबवणार असल्याची टीका त्यांनी केली.

विरोधी पक्ष बोगस ओपनियन पोल, सर्व्हे करून विनाकारण हवा निर्माण करत आहेत. लोकांची ते दिशाभूल करत आहेत. निवडणुकीनंतर या सर्वांची पोलखोल होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजप सत्तेवर आल्यापासून मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, तिहेरी तलाक आणि समान नागरी कायद्यातच जास्त रस दाखवत आहेत. ही सर्वांसाठी अत्यंत चिंतेची गोष्ट आहे. हातरस येथेही झालेल्या सभेत त्यांनी भाजपवर टीका केली. या सरकारने अर्थसंकल्पातही नोटाबंदीनंतर किती काळा पैसा जमा झाला हे सांगितले नाही, असे त्या म्हणाल्या.
यापूर्वीही झालेल्या सभांमधून मायावती यांनी भाजप सत्तेवर आल्यास आरक्षणाला धोका निर्माण होईल असे म्हटले होते. संघ आणि भाजप यांनी आरक्षण रद्द करण्याच्या ‘धमक्या’ देऊ नयेत, असा इशारा देतानाच, आरक्षणविरोधी वक्तव्यामुळे हिंदुत्ववादी संघटना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुखवटा उघड झाला असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. समाजवादी पक्षाला पाठिंबा देऊन तुमचे मत ‘वाया घालवू नका’, असे आवाहन करत केवळ बसपच भाजपचा वारू रोखू शकते, असा दावाही त्यांनी केला.