मला जितके शक्य असेल तितका मी राजकारणापासून दूर राहील असे उद्गार मुलायम सिंह यादव यांचे कनिष्ट चिरंजीव प्रतीक सिंह यादव यांनी म्हटले आहे. मला राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा नाही असे प्रतीक यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे. माझा रिअल इस्टेट आणि जीमचा व्यवसाय आहे. मी माझे सर्व लक्ष त्यावर केंद्रित केले आहे असे प्रतीक यांनी म्हटले. उत्तर प्रदेश निवडणुकीबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की समाजवादी पक्षाला २५० च्या वर जागा मिळतील आणि अखिलेश यादव हे पुन्हा मुख्यमंत्री होतील.

प्रतीक यांची पत्नी अपर्णा यादव लखनौ छावणी या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या तयारीबाबत विचारले असता प्रतीक यांनी म्हटले की अपर्णाचा विजय निश्चित असून तिचे राजकारणात पदार्पण धडाकेबाज होईल. पाच कोटी रुपयांच्या लॅंबोर्गिनी गाडीबाबतही प्रतीक यांनी खुलासा केला. ही गाडी मी सर्व कर भरून घेतली आहे तसेच ही कार कर्जावर घेण्यात आली आहे. माझ्याजवळ या कारची सर्व कागदपत्रे आहेत तेव्हा नेमका वाद कशाबद्दल आहे हेच आपल्याला कळत नसल्याचे प्रतीक यांनी म्हटले.

दरम्यान, प्रतीक यांची पत्नी अपर्णा यादव ही उत्तर प्रदेशातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवारांपैकी एक असल्याचे म्हटले गेले आहे. अपर्णा यादव यांच्या नावे २३ कोटींची मालमत्ता आहे. त्यांचे पती प्रतीक यांच्या नावावर पाच कोटींची लॅंबोर्गिनी असली तरी त्यांच्या नावे कार नसल्याचे शपथपत्रामध्ये लिहिले आहे. अपर्णा यांच्याकडे १.८८ कोटींचे दागिने आहेत. त्यांच्या पतीचे नावे ८ लाख रुपयांची पोस्टल गुंतवणूक आहे.

प्रतीक यांचे वार्षिक उत्पन्न १ कोटी ४७ लाख तर अपर्णा यांचे उत्पन्न ५०.१८ लाख रुपयांचे आहे. अपर्णा यांच्याकडे ३.२७ कोटींचे चल संपत्ती आणि १२.५ लाखांची अचल संपत्ती आहे. प्रतीक यांच्या नावे २० कोटींची संपत्ती आहे.
काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या रीटा बहुगुणा जोशी यांच्याविरोधात लखनौ छावणी मतदार संघातून त्या निवडणूक लढवत आहेत.