भाजप नेते विनय कटियार यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा राम मंदिर राग आळवला आहे. ‘ज्याप्रकारे बाबरी मशिदीचा ढाचा पाडला, त्याचप्रकारे मंदिराची निर्मिती करु,’ असे वक्तव्य कटियार यांनी फैजाबादमधील रॅलीला संबोधित करताना केले आहे. राम मंदिराला विरोध करणाऱ्या व्यक्तींची तुलना कटियार यांनी अराजकाशी केली आहे.

‘ज्याप्रकारे बाबरीचा ढाचा पाडला, त्याचप्रकारे अयोध्येत राम मंदिर उभारले जाईल. अयोध्यामध्ये राम मंदिर नको म्हणणारे लोक हे अराजक आहेत आणि असे लोक देशाला पूर्णपणे उद्ध्वस्त करतील,’ असे कटियार यांनी म्हटले आहे. ‘उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार आल्यास भाजपचे राज्यसभेतील संख्याबळ वाढेल. त्यामुळे भाजपला पूर्ण ताकदीने राम मंदिराची निर्मिती करता येईल. राम मंदिराची निर्मिती करण्यासाठी राज्यात भाजपची सत्ता येणे महत्त्वाचे आहे,’ असे विनय कटियार पुढे बोलताना म्हणाले.

भाजप नेते विनय कटियार यांना त्यांच्या रॅलीदरम्यान बोलताना वारंवार राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला. ‘राम मंदिराची उभारणी तीन मार्गांनी केली जाऊ शकते. न्यायालय, संवाद आणि संसदेत कायदा करुन, अशा तीन मार्गांनी राम मंदिराची निर्मिती केली जाऊ शकते,’ असे कटियार यांनी म्हटले. राम मंदिराची उभारणी मोदी सरकारच्या काळातच होईल, असा विश्वास कटियार यांनी व्यक्त केला.

फैजाबादमधील सभेत बोलताना कटियार यांनी समाजवादी पक्ष आणि काँग्रेसवरदेखील जोरदार हल्लाबोल केला. ‘राहुल गांधी हा विझलेला दिवा आहे. समाजवादी पक्षाने त्यांच्यासोबत युती करुन चूक केली आहे. समाजवादी पक्षाने जितक्या जागा काँग्रेसला सोडल्या आहेत, तितक्या जागा त्यांना जिंकता आल्या असत्या.’ भाजप नेते विनय कटियार त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असतात. कटियार यांनी रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी घेतला होता. भाजपचा हिंदू कट्टरवादी चेहरा म्हणून कटियार ओळखले जातात.

काही दिवसांपूर्वी प्रियांका गांधी यांच्यावर केलेल्या विधानामुळे कटियार वादात सापडले होते. प्रियांका गांधी यांचा समावेश काँग्रेसकडून स्टार प्रचारकांच्या यादीत करण्यात आल्यावर, भाजपकडे प्रियांका यांच्यापेक्षा सुंदर महिला नेत्या असल्याचे विधान कटियार यांनी केले होते.