एकेकाळी मायावतींच्या अत्यंत निकटचे असलेले स्वामीप्रसाद मौर्य सध्या भाजपमध्ये आहेत. परंतु त्यांना विजयी करणे भाजपसमोर आव्हानात्मक बनले आहे. संघ परिवारातील दुहीमुळे भाजप आणि मौर्य यांच्यासमोर अडचणीत वाढ झाली आहे. कुशीनगर जिल्ह्यातील पदरौना मतदारसंघात हिंदू जागरण मंचाच्या वतीने मौर्य यांच्याविरोधात पत्रके वाटण्यात येत आहेत. मौर्य यांनी बसपमध्ये असताना हिंदू देवदेवतांबद्दल काढलेल्या अनुद्गाराचा निषेध करण्यात आला आहे. ब्राह्मण हे मनुवादी विचारसरणी मानतात. हिंदू धर्मात मनुष्याला काहीच स्थान नाही, अशी टीका मौर्य यांनी केली होती. त्यांच्या याच वक्तव्याचा आधार घेत हिंदू जागरण मंच त्यांना विरोध करत आहे. त्यामुळे भाजपसमोर नवे संकट निर्माण झाले आहे.
हिंदू जागरण मंचाच्या या भूमिकेवरून काँग्रेस-सप आघाडीत सध्या आनंदाचे वातावरण आहे. हिंदू जागरण मंचाच्या प्रचारामुळे मौर्य हे हिंदू विरोधी असल्याचा प्रसार होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हिंदू युवा वाहिनीचा हा छोटा गट गोरखपूर आणि आजूबाजूच्या सुमारे डझनभर ठिकाणी निवडणूक लढवत आहे. या संघटनेचे प्रमूख योगी आदित्यनाथ यांचा येथे दबदबा आहे. परंतु हिंदू जागरण संघटनेचा हा पवित्रा भाजपच्या हायकंमाडची नाराजी ओढवणारी ठरत आहे. आदित्यनाथ यांनी यापूर्वीच युवा वाहिनीचा प्रदेशाध्यक्ष सुनील सिंहला निलंबित केले आहे.

मौर्य यांच्याविरोधात काही बंडखोरही उभे आहेत. यामध्ये पदरौना येथून सहा वेळा खासदार राहिलेले राम नगीना मिश्रा यांचा मुलगा परशुराम मिश्रांचा समावेश आहे. हिंदू जागरण मंचचे गोरखपूर प्रांतचे संयोजक राजा त्रिपाठी यांनी ही पत्रके वाटण्यात काही असंतुष्ट लोकांचा हात असल्याचे म्हटले आहे. आमच्या संस्थेची बदनामी केल्याप्रकरणी आम्ही काही लोकांविरोधात एफआयआर दाखल केला, असल्याची त्यांनी सांगितले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा प्रभारी आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघटनेशी निगडीत संजय जयस्वाल पदरौनामधून लढण्यास इच्छूक होते. परंतु, मौर्य भाजपमध्ये आल्यानंतर त्यांना उमेदवारी देण्यात आली.
इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना त्रिपाटी म्हणाले, कोणीतरी जायस्वाल आणि आमचे जिल्हाध्यक्ष आशुतोष ऋषि श्रीवास्तव यांच्याविरोधात पत्रके वाटत आहे. ऋषि आणि जायस्वाल यांना बदनाम करण्याचा हा संघटित प्रकार आहे. ‘डॅमेज कंट्रोल’ साठी भाजपने आपल्या अनेक मोठ्या नेत्यांना पाठवले आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पदरौना दौरा केला होता. मौर्यने हिंदू धर्माबाबत चुकीचे वक्तव्य केले होते. हे सर्व मुद्दे निवडणुकीशी संबंधित होते, असे युवा वाहिनी सेनेतून निलंबित करण्यात आलेल्या सुनील सिंहने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले.