News Flash

मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात मुक्काम पोस्ट वाराणसी..

‘चलो काशी’चा नारा देत अखिलेश-राहुल यांचेही भाजपच्या प्रचाराला चोख उत्तर

स्वाद कचोरी, जिलेबीचा.. वाराणसीच्या गल्लीबोळात प्रचार करून दमल्यानंतर गावातील सुप्रसिद्ध श्री राम भंडार दुकानामधील कचोरी आणि जिलेबीवर ताव मारताना तीन केंद्रीय मंत्री. (डावीकडून) संतोष गंगवार, रविशंकर प्रसाद आणि जे.पी. नड्डा. उजवीकडे भाजपचे राष्ट्रीय सचिव श्रीकांत शर्मा.   (साभार : श्रीकांत शर्माचे ट्विटर हँडल)

दस्तुरखुद्द मोदींसह मंत्रिमंडळाचा तीन दिवस डेरा, ‘चलो काशी’चा नारा देत अखिलेश-राहुल यांचेही भाजपच्या प्रचाराला चोख उत्तर

वाराणसीमध्ये सध्या जणू काही दिल्लीच अवतरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाच्या मंत्र्यांनी या काशी विश्वेश्वराच्या नगरीत डेरा टाकल्याने वाराणसी जवळपास अघोषित देशाची राजधानीच बनली आहे. स्वत: पंतप्रधानांचा आजपासून (शनिवार) जवळपास तीन दिवस मुक्काम असेल.

मोदींच्या मतदारसंघात कोणताही धोका न स्वीकारण्याचा चंगच भाजपने बांधला आहे. पण दुसरीकडे वाराणसीमध्ये पराभव चाखायला लावून मोदींचे नाक कापण्यासाठी काँग्रेस व समाजवादी पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांनीही वाराणसीत तळ ठोकला आहे. मोदींच्या झगमगाटाला तोडीचे प्रत्युत्तर देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

सहाव्या टप्प्यातील मतदान चालू असताना आज (शनिवार) पंतप्रधान वाराणसीच्या रस्त्यांवर उतरलेले असतील. पण त्याचबरोबर मोदींना टक्कर देण्यासाठी अखिलेश आणि राहुल यांचाही संयुक्त रोड शो शहराच्या दुसऱ्या भागात निघेल. ‘चलो काशी’चा नारा या दोन युवा नेत्यांनी दिला आहे. या दोन्ही रोड शोजने वाराणसी  ढवळून निघेल. २०१४च्या लोकसभा निवडणुकीसारखेच चित्र आताही निर्माण झाले आहे. तेव्हा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व ‘आप’चे अरविंद केजरीवाल यांनी वाराणसीत झंझावाताचा प्रयत्न केला होता.

वाराणसी हा खरे तर भाजपचा बालेकिल्ला. १९९१पासून इथे भाजपचा खासदार आहे. या लोकसभा मतदारसंघात पाच विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी शहरात तीन आहेत आणि तिघेही भाजपचे आमदार आहेत. पण उमेदवारीवरून नाराजीचे पडसाद भाजपमध्ये उमटले आहेत. सात वेळा आमदार झालेले ज्येष्ठ नेते श्यामदेव रॉय चौधरी यांचे तिकीट कापल्याने तर बंडखोरी आहे. म्हणून कोणताही धोका स्वीकारण्याच्या मन:स्थितीत भाजप नाही. त्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना कामाला जुंपण्यात आले आहे.

पक्षाध्यक्ष अमित शहांचा शहरातील ‘अमेठी कोठी’मध्ये डेरा आहे. राजनाथसिंह भिंगरी लावल्यासारखे फिरत आहेत. अरुण जेटलींची प्रचार यंत्रणेवर नजर आहे. जे.पी. नड्डा, पीयूष गोयल, रविशंकर प्रसाद, स्मृती इराणी, मनोज सिन्हा, रामकृपाल यादव, संतोष गंगवार, थावरचंद गेहलोत, राधामोहन सिंग आदी मंत्री वाराणसीच्या गल्लीबोळात फिरताना दिसत आहेत.

आठ मार्चला मतदान 

वाराणसीसह सातव्या टप्प्यात ८ मार्च रोजी मतदान आहे. जौनपूर, सोनभद्र, मिर्झापूर, चंदौली आदी जिल्ह्यांतील ४० मतदारसंघांचा समावेश आहे.

आज काशीनगरीत राजकीय होळी

  • ’मोदी आज (शनिवार) सकाळी दहाच्या सुमारास बनारस हिंदू विद्यापीठातील पं. मदनमोहन मालवीय यांच्या पुतळ्यास हार घालून रोड शो सुरू करतील आणि तो बाबा विश्वनाथ मंदिराजवळ संपेल. त्यानंतर ते कालभैरव मंदिरात दर्शनाला जातील. काशी विद्यापीठाच्या मैदानावर त्यांची जंगी सभा होईल. त्यानंतरही ते रविवारी वाराणसीतील टाऊनहॉल मैदानावर दोन हजार विशेष निमंत्रितांशी चर्चा करतील. सोमवारी म्हणजे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी वाराणसीतील रोहानियामध्ये सभा घेऊन प्रचाराची समाप्ती करतील.
  • ’अखिलेशसिंह व राहुल गांधी यांचाही रोड शो शनिवारीच असेल. पण तो दुपारी दीडच्या सुमारास चालू होईल. शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघांतून जाणारे सुमारे बारा किलोमीटरचे अंतर ते दोघे कापतील. त्यानंतर दोघांची संयुक्त सभा होईल.
  • ’मायावती मात्र शनिवारी वाराणसीत फिरकणार नाहीत. त्याऐवजी त्यांची सभा रोहानियामध्ये आयोजित करण्यात आली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2017 2:21 am

Web Title: up assembly elections 2017
Next Stories
1 अमरसिंह दिसताच टीव्ही बंद करते- डिंपल यादव
2 Uttar Pradesh Elections 2017: मतदानावेळी बुरखाधारी महिलांची तपासणी करा: भाजप
3 Uttar Pradesh Elections 2017: सप-काँग्रेस, बसपला ११ मार्चला जोरदार ‘करंट’: मोदी
Just Now!
X