अखिलेश यांनी मायावतींशी हातमिळवणीचे संकेत दिल्याने नव्या समीकरणांची नांदी

त्रिशंकू विधानसभेची शक्यता मतदानोत्तर चाचण्यांनी (एक्झिट पोल्स) वर्तविल्यानंतर उत्तर प्रदेशात राजकीय समीकरणांनी कूस बदलण्यास प्रारंभ केल्याचे दिसते आहे. भाजपला रोखण्यासाठी थेट मायावती यांच्याबरोबर आघाडी करण्यास तयार असल्याची घोषणाच मुख्यमंत्री व समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेशसिंह यादव यांनी केली. त्यास रात्री उशिरापर्यंत मायावतींकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसला तरी त्या आपले पत्ते सहजासहजी उघड करणार नसल्याचे उघडच आहे. मोदींच्या भीतीने पहिल्यांदा नितीशकुमार व लालूप्रसाद एक झाले होते. आता एकमेकांना ‘बुवा’ आणि ‘बबुवा’ म्हणणारे अखिलेश व मायावती एकत्र येतील का, याबद्दल लाखमोलाची उत्सुकता निर्माण झाली आहे.

काँग्रेसच्या मदतीने पुन्हा सत्ता मिळविण्याचा आत्मविश्वासपूर्वक दावा अखिलेशांनी वारंवार केला होता. पण मतदानोत्तर चाचण्यांनी त्यावर पाणी ओतल्याचे दिसताच अखिलेशांनी एकदम ‘यू टर्न’ घेतला आणि प्रत्यक्ष निकालांची वाट न पाहताच मायावतींबरोबरील हातमिळवणीची शक्यताही उघडपणे बोलून दाखविली. ‘कोणालाही राष्ट्रपती राजवट नको आहे. राज्य सरकार रिमोट कंट्रोलद्वारे चालविले जाणे कोणालाही आवडणार नाही. आम्हाला बहुमत मिळेल. पण ते मिळाले नाही तर सर्व पर्याय खुले आहेत. भाजपला रोखणे गरजेचे आहे,’ असे ते लखनौमध्ये म्हणाले.

एवढेच नव्हे, तर मायावतींबरोबर चांगले संबंध असल्याचा दाखलाही त्यांनी आवर्जून दिला. ‘मी त्यांना आदराने बुवाजी म्हणतो. त्यामुळे मी त्यांची मदत घेईन किंवा त्यांना मदत करेन, असे जनतेला वाटू शकते.. पण त्याबद्दल आत्ताच स्पष्ट बोलणे धाडसाचे ठरेल,’ असे ते म्हणाले. यावरून त्रिशंकू स्थितीमध्ये समाजवादी, काँग्रेस आणि बहुजन समाज पक्ष असे त्रिकूट एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसे झाल्यास ही निवडणुकोत्तर महाआघाडी असेल. बिहारमध्ये निवडणूकपूर्व महाआघाडी झाली होती आणि तिने २२४ पकी १७८ जागा आरामात खिशात घातल्या होत्या.

विशेष उल्लेखनीय म्हणजे संपूर्ण निवडणूक प्रचारामध्ये काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि मायावती यांनी एकमेकांवर टीका करण्याचे टाळले होते. किंबहुना अखिलेशसिंह शेजारी बसले असतानाच राहुल यांनी मायावतींची स्तुती केली होती. मायावतींकडून काही चुका झाल्या असतील. पण भाजपविरोधातील त्यांच्या लढय़ाचे मला कौतुक वाटते, अशी टिप्पणी राहुल यांनी केली होती.