बीएसपी म्हणजे बहनजी संपत्ती पार्टी असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. नरेंद्र मोदी यांच्या नावाचे संक्षिप्त रुप एनडीएम आहे. एनडीएमचा खरा अर्थ आज मी तुम्हाला सांगते असे मायावतींनी म्हटले. एनडीएम म्हणजे निगेटिव्ह दलित मॅन. नरेंद्र मोदी हे दलित विरोधी आहे, असे त्यांनी म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हे लक्षात येत नाही की मी समाजाची सेवा करण्यासाठी अविवाहित राहिले आहे. बहुजन समाज पक्ष ही चळवळ आहे. त्या चळवळीमुळेच मी अविवाहित राहून जनतेची सेवा केली. असे मायावतींनी म्हटले. मोदींनी बसपची व्याख्या चुकीची करुन लोकांचा अपमान केला आहे असे त्या म्हणाल्या.

मोदींना वाटले की नोटाबंदी करुन आपण बसपला पूर्णपणे संपवून टाकू. परंतु हे अशक्य आहे असे त्या म्हणाल्या. केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय हा पूर्ण तयारनिशी घेतला नव्हता, अशी टीका मायावती यांनी केली होती.  या टीकेवर उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले, की हा निर्णय घेतल्यामुळे मायावतींनी पैशांची व्यवस्था लावण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी नोटाबंदीवर टीका केली. त्यामुळे मायावतींच्या पक्षाचे खरे नाव बहनजी संपत्ती पार्टी असे ठेवणेच योग्य राहील.

याआधी, पंतप्रधान मोदी यांनी उत्तर प्रदेशात इतर पक्ष सत्तेमध्ये आले तर परिस्थिती कशी वाईट होईल हे सांगितले होते. उत्तर प्रदेशात बुंदेलखंडची परिस्थिती सर्वात वाईट आहे. उत्तर प्रदेशातील सत्ता मुठभर लोकांच्या हाती एकटवली आहे. येथील पोलीस ठाणी म्हणजे राजकीय पक्षाची कार्यालये असल्यासारखी आहेत. ही पोलीस ठाणी समाजवादी पक्ष सत्तेत आला की त्यांचे किंवा बसपा सत्तेत आली तर त्यांचे पक्ष कार्यालय होऊन जाते. पोलीस ठाण्यात गुन्हेगारांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, स्त्रियांचे रक्षण झाले पाहिजे. मात्र, ते होताना दिसत नाही. त्यामुळे ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे. बुंदेलखंडातील अनेक भागांमध्ये बाहुबलींकडून गरीबांच्या जमिनी बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्या जातात. परंतु, उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार आल्यास बुंदेलखंडात बेकायदेशीरपणे जमिनी हडप करण्यांविरुद्ध विशेष मोहीम उघडण्यात येईल. जमिनी हडप करणाऱ्यांना शिक्षा करण्यासाठी विशेष सेलची स्थापना करण्यात येईल, असे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी दिले.