पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मायावती यांच्यातील आरोप-प्रत्यारोप थांबत नसल्याचे दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधी भारतीय जनता पक्षाची ज्या राज्यात सत्ता आहे त्या राज्यातील प्रत्येक गावांमध्ये स्मशान उभारावे आणि मग उत्तर प्रदेशामध्ये स्मशान आहे की नाही याची चिंता करावी असे मायावतींनी म्हटले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका प्रचारसभेमध्ये वक्तव्य केले होते.

ज्या गावात दफनभूमी आहे त्या गावामध्ये स्मशानही असावे, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. पुढे ते म्हणाले होते की जर रमजानला वीज उपलब्ध होऊ शकते तर दिवाळीला का होत नाही. त्यांच्या या वक्तव्याचा संदर्भ घेऊन मायावतींनी पंतप्रधानांवर निशाणा साधला.

उत्तर प्रदेशामध्ये भारतीय जनता पक्ष प्रभाव टाकण्यास असमर्थ ठरला आहे. त्यामुळे ते घाबरुन गेले आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी निवडणुकीमध्ये जात-पात, धर्माचा उल्लेख केल्याचे मायवतींनी म्हटले. गेल्या तीन चार दिवसांमध्ये पंतप्रधानांनी अनेक चुकीची वक्तव्ये केली आहेत असे मायावती म्हणाल्या. ज्या वेळी बहुजन समाज पार्टी सत्तेमध्ये होती त्या वेळी आम्ही कधीही कुणावर भेदभाव केला नाही असे त्या म्हणाल्या. आमच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था देखील चांगली होती.  आम्ही हिंदू आणि मुस्लीम असा भेदभाव केला नसल्याचे त्या म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा उल्लेख करुन धार्मिक भेदभावास सुरुवात केल्याचे मायावतींनी म्हटले.

याआधी, मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाचे (बीएसपी) मोदी यांनी ‘बहनजी संपत्ती पार्टी’ असे वर्णन केले. मायावती यांनी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून प्रचंड संपत्ती गोळा केल्याच्या आरोपाचा संदर्भ त्यांच्या या विधानाला होता. राज्याच्या माजी मुख्यमंत्री असलेल्या मायावती यांनी मोदी यांच्या नावाच्या आद्याक्षरांवर कोटी करत या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले. (नरेंद्र दामोदरदास) मोदी हे ‘मिस्टर निगेटिव्ह दलित मॅन’ असल्याचे सांगून, ते आपल्या पक्षाचा आधार असलेल्या दलितांच्या विरोधात आहेत असे मायावतींनी सुचवले.