अखिलेश यादव यांचा अमिताभ बच्चन यांना सल्ला

गुजरातमधील गाढवांची जाहिरात न करण्याचा सल्ला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सोमवारी बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना कोणात्याही नेत्याचा नामोल्लेख न करताच  दिला.

गुजरातमधील कच्छच्या रणातील जंगली गाढवांच्या अभयारण्याला भेट देण्याचे आवाहन करणारी जाहिरात गुजरात पर्यटन विभागाने तयार केली असून त्या राज्याचे सदिच्छादूत या नात्याने महानायक अमिताभ बच्चन या अभयारण्याला भेट देण्याचे आवाहन करीत असल्याची ही जाहिरात आहे.

गाढवांबाबतची एक जाहिरात सध्या दाखविली जात आहे, या पर्वाचे महानायक असलेल्या अमिताभ बच्चन यांना आपण आवाहन करतो की, आता आपण गुजरातमधील गाढवांचा प्रचार करू नये, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ट्विट केले आहे. गाढवांनाही जाहिरातीत झळकण्याची संधी मिळाली तर काय होईल, असा सवालही अखिलेश यादव यांनी केला आहे. भारतातील निवडणूक प्रक्रियेत एखादा क्षण असा येतो की नेत्याचे भवितव्य उज्ज्वल होते किंवा अंधकारमय होते. बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी पंतपरधान नरेंद्र मोदी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या डीएनएबद्दल वक्तव्य केले होते. मात्र हे वक्तव्य मोदींवरच उलटले होते. बिहारमधील महाआघाडीच्या नेत्यांनी, मोदी यांनी बिहारच्या अभिमानाची अप्रतिष्ठा केल्याचा आरोप मोदींवर केला. आता २०१७च्या उत्तर प्रदेशातील निवडणुकीत अखिलेश यादव यांनीही मोदी यांच्यासारखीच चूक केली आहे, मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा गुजरातचे गाढव असा अप्रत्यक्ष उल्लेख यादव यांनी केला आहे. त्यामुळे यादव यांचे हे वक्तव्य त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे कारण उत्तर प्रदेशात मोदी हा लोकप्रिय चेहरा आहे. त्यांच्या वैयक्तिक करिष्म्यावरच भाजपने ८० पैकी ७१ जागा जिंकल्या आहेत. केवळ गाढव या वक्तव्यावरूनच नव्हे तर अखिलेश यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केल्याने सत्तारूढ सपामध्ये झालेली बंडखोरी आणि शिवपाल यादव यांच्यासमवेतचा संघर्ष ही अखिलेश यांच्यासाठी चिंतेची बाब आहे.

मोदी- शहा दहशतवादी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे दोघे दहशतवादी असल्याचे मत व्यक्त करून उत्तर प्रदेशात ते भीतीचे वातावरण निर्माण करीत असल्याचा आरोप सपाचे नेते राजेंद्र चौधरी यांनी सोमवारी केला.

मतदारांना घाबरविण्याची भाजपची इच्छा आहे, मोदी आणि शहा हे दहशतवादी आहेत, ते लोकशाहीत दहशतवाद निर्माण करीत आहेत, असे चौधरी म्हणाले. अमित शहा यांची पक्षीय राजकारणात कोणतीही भूमिका नाही, ते केवळ मोदी यांच्या सूचनांचे पालन करतात, ते जनतेला घाबरवतात, त्यांच्या पक्षाचे कार्यकर्तेही त्यांना घाबरतात, असेही चौधरी म्हणाले. मोदी आणि शहा यांनी उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण गढूळ केले आहे, असे ते म्हणाले.