वादग्रस्त विधानांनी नेहमीच वादाच्या केंद्रस्थानी राहिलेले समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी पुन्हा वादग्रस्त विधान करून खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) स्वयंसेवक लग्न का करत नाहीत, त्यांच्यात काही ‘कमजोरी’ तर नाही ना?, असे आझम खान यांनी म्हटले आहे. यावेळी आझम खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही शाब्दिक हल्ला चढवला.

उत्तर प्रदेशातील रामनगर विधानसभा मतदारसंघातील रामपूरमध्ये आझम खान यांची प्रचारसभा झाली. या सभेत त्यांनी आरएसएस, भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. आरएसएसच्या स्वयंसेवकांचे मला काही समजतच नाही. हे आरएसएसवाले लग्न का करत नाहीत? त्यांच्यात काही ‘कमजोरी’ असल्याने ते आरएसएसमध्ये जातात का?, असे वादग्रस्त सवाल त्यांनी केले. यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही बरसले. पंतप्रधान मोदी हे ‘बादशहा’ आहेत. या बादशहावर बहुतेक लोकांची नाराजी आहे. याच बादशहाने भिकारी असल्याचे सांगितले आहे. भिकारी थैली घेऊनच जाईन, असे मोदींनी सांगितले आहे. पण इतक्या सहजतेने त्यांना थैली घेऊन जाऊ देणार नाही, असे आव्हान आझम खान यांनी दिले.

उत्तर प्रदेशात एकत्र येऊन भाजप आणि बहुजन समाज पक्षाचा सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न आहे. मायावती यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात मायावती यांनी मुस्लिमांना कट्टरपंथीय संबोधले असून भाजपला मते देण्याबाबत बोलत आहेत, असा दावा आझम खान यांनी केला आहे. दिल्लीतील जामा मशिदीचे शाही इमाम अहमद बुखारी यांच्यावरही आझम खान यांनी टीका केली. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यावरही तोफ डागली. ओवैसी हे हैदराबादमधील सडलेली बिर्याणी आहे. तर भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांच्या डोक्यात मेंदू ठेवण्याची जागाही ठेवलेली नाही, अशा तिखट शब्दांत आझम खान यांनी टीका केली. आझम खान यांनी यापूर्वीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली होती. भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांच्यावरही टीकास्त्र सोडले होते. आदित्यनाथ यांना मानसिक आजार आहे. त्यांनी माझ्या रुग्णालयात उपचारासाठी यावे, असे खान म्हणाले होते.