News Flash

Uttar Pradesh Election 2017: मुस्लिम मतांच्या विभाजनासाठी ओवेसींनी अमित शहांकडून घेतले ४०० कोटी- दिग्विजयसिंह

अखिलेश यादव यांना मुसलमानांना भाजपची भिती दाखवून मत मिळवायची आहेत.

खासदार असदुद्दीन ओवैसी

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी आता भाजप आणि एमआयएमवर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशमध्ये मुस्लिम मतांच्या विभाजनासाठी असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याकडून पैसे घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे. बिहार निवडणुकीदरम्यान अमित शहा आणि ओवेसी यांच्यात गुप्त बैठक झाली होती. या बैठकीत ओवेसी यांनी ४०० कोटी रूपये घेतले होते. असाच प्रकार उत्तर प्रदेश निवडणुकीत झाल्याचेही त्यांनी म्हटले.

एमआयएम भाजपला फायदा मिळवण्यासाठी प्रत्येक निवडणुकीत उतरते. मुसलमानांनी ओवेसी यांच्यावर विश्वास न ठेवता काँग्रेसला मतदान करावे, असे अपील दिग्विजयसिंह यांनी केले. दिग्विजयसिंह यांच्यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलामनबी आझाद यांनीही ओवेसी यांच्यावर टीका केली होती. असदुद्दीन ओवेसी हे भाजपचे एजंट असल्याचा आरोप करत त्यांचे मुसलमानांच्या प्रगतीचे काहीच देणे-घेणे नसून ते भाजपकडून पैसे घेऊन मुस्लिम मतांचे विभाजन करतात, अशी टीका केली होती. मुसलमानांच्या हक्कासाठी मोठमोठ्या गोष्टी करणाऱ्या ओवेसींनी हैदराबादमध्ये मुसलमानांसाठी काहीच केले नसल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, ओवेसी यांनी आपल्या पक्षाचे उत्तर प्रदेशमध्ये उमेदवार उभे केले आहेत. नुकताच झालेल्या एका सभेत त्यांनी अखिलेश यादव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. मोदी आणि अखिलेश हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे म्हटले होते. एकीकडे मोदी मुख्यमंत्रीपदी असताना दंगल रोखू शकले नाहीत. तर दुसरीकडे मुजफ्फरनगर येथील दंगल अखिलेश यांना थांबवता आली नाही. या दोघांमध्ये काहीच फरक नसल्याचे ते म्हणाले. अखिलेश यादव यांना मुसलमानांना भाजपची भिती दाखवून मत मिळवायची आहेत, असा आरोपही केला.
उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीचे तीन टप्पे झाले आहेत. पहिल्या टप्प्यात ६३ टक्के, दुसऱ्या टप्प्यात ६५ टक्के तर रविवारी झालेल्या तिसऱ्या टप्प्यात ६१.१६ टक्के मतदान नोंदवले गेले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2017 3:11 pm

Web Title: uttar pradesh assembly election 2017 mim asaduddin owaisi congress leader digvijaysingh criticize bjp president amit shah bribes of rs 400
Next Stories
1 Uttar pradesh election 2017: अमिताभ बच्चन यांनी गुजरातमधील गाढवांचा प्रचार करु नये: अखिलेश यादव
2 बसपा म्हणजे ‘बहनजी संपत्ती पार्टी’; मोदींचे मायावतींवर टीकास्त्र- मोदी
3 ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा दोघेही दहशतवादी’
Just Now!
X