18 September 2020

News Flash

Uttar Pradesh Assembly Election Results 2017: मोदींची जादू; सप- काँग्रेस ‘छू मंतर’

उत्तर प्रदेशात कमळ बहरले, अखिलेश यांच्या सायकलला लागला ब्रेक

उत्तरप्रदेशमध्ये भाजपच्या त्सुनामीत विरोधी पक्ष अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहेत. भाजपचा  ३१२ जागांवर विजय झाला आहे.  तर सत्ताधारी समाजवादी पक्षाला मतदारांनी मोठा हादरा दिला आहे. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसचा साथ मतदारांनी नाकारला असून समाजवादी पक्षाला ४७ तर काँग्रेसला फक्त ७ जागा मिळाल्या आहेत. बहुजन समाज पक्षाची अवस्था आणखी बिकट झाली असून लोकसभेत भोपळा फोडू न शकणा-या बसपला विधानसभेत फक्त १९ जागा मिळाल्या आहेत.

राज्यसभेतील बहुमत आणि २०१९ मधील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशमधील निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले होते. उत्तर प्रदेश निवडणुकीची सुरुवात झाली ती समाजवादी पक्षातील अंतर्गत कलहाने. समाजवादी पक्षातील ‘यादवी’वरून संभ्रम संपत नव्हता. अखिलेश आणि मुलायमसिंह या पितापुत्रांमधील वादाने पक्षाची नाचक्की झाली. पण शेवटी पितापुत्रांमध्ये समेट झाली आणि समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला. समाजवादी पक्षासमोर आव्हान आहे ते भाजपचे. नरेंद्र मोदी यांच्यावर भिस्त ठेवून भाजपने उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी कंबर कसली.

सुमारे वीस टक्के मुस्लीम, वीस टक्के दलित, उच्चवर्णीय सोळा टक्के आणि ओबीसींमधील यादव नऊ टक्के अशा उत्तर प्रदेशातील ६५ टक्के मतांचा कल जवळपास निश्चित आहे. म्हणून उरलेली ३५ टक्के मते कळीची बनली होती. ही मते प्रामुख्याने बिगर यादव ओबीसींची आहेत. यादवांचे वर्चस्व डाचत असलेल्या या जातींची अस्मिता गोंजारण्याच्या भाजपच्या राजकारणाला भाजप बऱ्यापैकी यश आले. कुर्मी समाजाचा पक्ष असलेल्या ‘अपना दला’शी भाजपने लोकसभेपासूनच युती केली आणि ‘अपना दल’चे संस्थापक कै. सोनेलाल पटेल यांची कन्या अनुप्रिया पटेल यांना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री केले आहे. याचा फायदा भाजपला झाला आहे.

मायावती यांचा बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेससाठी उत्तरप्रदेशमधील निवडणूक ही अस्तित्वाची लढाई होती. मोदींना रोखण्यासाठी काँग्रेसने समाजवादी पक्षाशी हातमिळवणी केली. तर दलित – मुस्लिम मतांच्या आधारे सत्ता काबीज करण्याचे मनसुबे मायावतींने रचले होते. मायावती यंदाच्या निवडणुकीत जायंट किलर ठरतील असे जाणकारांचे मत होते. पण भाजपच्या तडाख्यात हे तिन्ही पक्ष उद्ध्वस्त झाले आहेत.

उत्तरप्रदेशमध्ये ४०३ जागा असून बहुमतासाठी २०२ जागांवर विजय मिळवणे गरजेचे होते. भाजपने ३२५ जागा मिळवून एकहाती सत्ता काबीज केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात २३ प्रचारसभा घेतल्या. मोदी यांच्या सभा ज्या ठिकाणी झाल्या त्या भागांमध्ये भाजपला चांगले यश मिळाले असे दिसते. योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूरमध्येही भाजपने सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळवला आहे.

उत्तरप्रदेश निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवला होता. तर सत्ताधारी समाजवादी पक्ष आणि काँग्रेसला दुस-या स्थानावर समाधान मानावे लागेल असे म्हटले होते.

LIVE UPDATES:

०४:२९: अलाहाबाद दक्षिणमध्ये भाजपचे नंदगोपाल गुप्ता विजयी.

०४:२६: उत्तरप्रदेशमधील विजयाचे श्रेय मोदी, भाजप कार्यकर्ते आणि जनतेलाच – केशवप्रसाद मौर्य, भाजप प्रदेशाध्यक्ष

०४:२०: अलाहाबाद पूर्वमध्ये भाजपचे हर्षवर्धन वाजपेयी विजयी, अनुरागसिंह यांचा केला पराभव

०४:१०: अलीपूरमध्ये भाजपचे सत्यपाल राठौड यांना ८८ हजार ६९५ मते, सप उमेदवाराचा केला १२ हजार मतांनी पराभव

०४:०१: आलापूर मतदार संघात भाजपच्या अनिता यांच्या विजय.

०३:४४: अखिलेश यादव संध्याकाळी सहा वाजता राज्यपाल राम नाईक यांना भेटणार

०३:२५: मुलायमसिंह यादव यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचे कमळ फुलले, आझमगडमध्ये भाजपने खाता उघडला, फूलपूरमध्ये भाजपचे अरुणकांत यादव विजयी.

मला भरभरुन मतदान करणा-या जसवंतनगरमधील मतदारांचे आभार, राज्यातील जनतेचा कौल आम्हाला मान्य – शिवपाल यादव

०२:५२: मतदान यंत्राविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे – मायावती

०२:४६: हिंमत असेल तर भाजपने व्होटींग मशिनऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यावे: मायावतींचे खुले आव्हान

०१:४०: मतदान यंत्रात फेरफार झाल्याचा बसपच्या प्रमुख मायावती यांचा आरोप

०१:३८: आग्रा दक्षिण मतदारसंघातून भाजपचे योगेंद्र उपाध्याय आघाडीवर.

०१:३३: आग्रा ग्रामीणमध्ये भाजपचे हेमलता दिवाकर आघाडीवर.

०१:२९: आग्रा उत्तरमधून भाजपचे जगनप्रसाद गर्ग आघाडीवर.

०१:२३: आग्रा कँटोनमेंटमध्ये भाजपचे डॉ.गिरीराज सिंह ५८ हजार मतांसह आघाडीवर.

०१:१६: मोदींच्या नेतृत्वाचा आणि अमित शहा यांच्या अथक मेहनतीचा विजय – स्मृती इराणी

०१:०८: नारायणीमधून बसपचे गयाचरण दिनकर पिछाडीवर.

१२:५७: आम्ही पराभवातून धडा घेणार – काँग्रेस नेते आर सुरजेवाला

१२:४६: उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव संध्याकाळी पत्रकार परिषद घेणार.

१२:३०: समाजवादी पक्षाने उत्तरप्रदेशमध्ये समस्यांचा डोंगर उभा केला आहे – पंकज सिंह, भाजप नेते

१२:०२: बहुजन समाज पक्षाला २० जागांवर आघाडी.

११:५४: भाजप ३०६ जागांवर आघाडीवर, सप- काँग्रेस आघाडीला फक्त ६२ जागांवर आघाडी.

११:३६ लखनऊ उत्तरमधून समाजवादी पक्षाचे अभिषेक मिश्र आघाडीवर.

११:३१: मेरठ दक्षिणमधून बसपचे हाजी याकूब आघाडीवर.

११:२०: आम्हाला जनतेचा कौल मान्य आहे, पण विकासाचा पराभव झाला असून व्होटबँकेच्या राजकारणाचा विजय झाला: राजीव शुक्ला, काँग्रेस

११:०४: काँग्रेसचे हात पापामुळे काळे झाले आहेत, आता जनता त्याच्या हातला कधीच साथ देणार नाही – केंद्रीय राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड

१०:५९: बहुजन समाज पक्षाला उत्तरप्रदेशमध्ये फक्त २० जागांवर आघाडीवर.

१०:५२: उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्ष- काँग्रेसचा सूपडा साफ, अवघ्या ६७ जागांवर आघाडीवर.

१०:४६: उत्तरप्रदेशमधील गोरखपूरमध्ये भाजपला दिमाखदार यश, योगी आदित्यनाथ यांच्या बालेकिल्ल्यात भाजपला ९ पैकी ९ जागांवर विजय

१०:४३: उत्तरप्रदेशमध्ये नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या ठिकाणी भाजपला घवघवीत यश

१०:३८: जौनपूरमधील काँग्रेसचे नदीम जावेद आघाडीवर.

१०:३२: रायबरेलीमधून काँग्रेसच्या आदिती सिंह या आघाडीवर.

१०:२६: जनतेने सप- काँग्रेस आघाडीला नाकारले, जनतेने विकासाच्या मुद्द्यावरच मतदान केले – योगी आदित्यनाथ

१०:२०: सरधानामधून भाजपचे संगीत सिंह सोम आघाडीवर

१०:१८: उत्तरप्रदेशमधील जनतेने घराणेशाही नाकारली- केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह

१०:१४: स्वारमधून आझम खान यांचे पूत्र पिछाडीवर

१०:०९: बरेलीमध्ये काँग्रेसला मोठा हादरा, ९ पैकी सात जागांवर भाजप आघाडीवर.

१०:०४: भाजप २७५ जागांवर आघाडीवर, सत्ताधारी समाजवादी पक्षाला मोठा हादरा.

१०:००: मुस्लिमबहूल भागात भाजप १०० पैकी ४० जागांवर आघाडीवर.

०९:५६: भाजप २७४, सप+काँग्रेस आघाडी – ७९, बसप- २५ आणि अन्य पक्ष १२ जागांवर आघाडीवर

०९:५०: अलीगडमधून भाजपचे उमेदवार संजीव राजा आघाडीवर.

०९:४४: नोएडामधून राजनाथ सिंह यांचे पूत्र पंकज सिंह आघाडीवर

०९:३५: अखिलेश यादव यांनी मायावतींसोबत जाण्याचा विचार करणे हाच त्यांचा पराभव: साक्षी महाराज

०९:३२: जयवंतनगरमधून शिवपाल यादव आघाडीवर

०९:२९: आत्तापर्यंत झालेल्या मतमोजणीत २२ टक्के मत घेत बसप दुस-या स्थानी

०९:२४: निवडणुकीचे कल हाती येताच लखनऊमधील समाजवादी पक्षाच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी ओसरली.

०९:१९: मतमोजणीचा कल हाती येताच उत्तरप्रदेशमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

०९:१७: आत्तापर्यंत झालेल्या मतमोजणीत भाजपला ४० टक्के मत मिळाली.

०९:१४: भाजप १७२ जागांवर आघाडीवर, उत्तरप्रदेशमध्ये कमळ बहरणार ?

०९:०९: बहुजन समाज पक्ष २१ जागांवर आघाडीवर.

०९:०५: १२३ जागांवर आघाडी घेत भाजप पहिल्या स्थानी. सप- काँग्रेसला मोठा हादरा, आत्तापर्यंत फक्त २७ जागांवरच आघाडीवर.

०९:०१: रामपूरमधून समाजवादी पक्षाचे आझम खान आणि अमेठीमधून गायत्री प्रजापती आघाडीवर

०८:५९: मुलायम सिंह यादव यांची सून अपर्णा यादव लखनऊ कँटोनमेंटमधून पिछाडीवर, या मतदार संघात भाजपने रिटा बहुगूणा जोशी यांना उमेदवारी दिली होती.

०८:५३: भाजप ६२ जागांवर आघाडीवर, सप- काँग्रेस आघाडी ४५ जागांवर पुढे

०८:४८: रामपूरमध्ये सपला झटका, आझम खान यांचे पूत्र अब्दुल्ला पिछाडीवर

०८:४३: भाजप ४७, समाजवादी पक्ष १५, बहुजन समाज पक्ष ९ तर अन्य पक्ष ४ जागांवर आघाडीवर

०८:४०: लखनऊमधील पाचही विधानसभा मतदारसंघात भाजप आघाडीवर.

०८:३७: भाजप २३, समाजवादी पक्ष – काँग्रेस आघाडी १०, तर बसप ५ जागांवर आघाडीवर, अन्य पक्ष ३ जागांवर आघाडीवर

०८:३६ मतमोजणी सुरू झाली आहे, आम्हाला मोठा विजय मिळेल: समाजवादी पक्षाचे नेते शिवपाल यादव

०८:२८: बसपा १६ तर अन्य पक्ष २ जागांवर आघाडीवर.

०८:२७: भाजप २०, समाजवादी पक्ष ९, काँग्रेस ३ जागांवर आघाडीवर.

०८:२४: उत्तरप्रदेशमधील पहिल्या फेरीत भाजप १२ जागांवर आघाडीवर.

०८:१५: सत्तेचा दावा करण्यासाठी हव्यात २०२ जागा

०८:१०: एक्झिट पोलमध्ये भाजप उत्तर प्रदेशात सत्तेच्या जवळ जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती 

०८:०७:  मतमोजणीला सुरुवात, थोड्याच वेळात पहिला कल हाती येणार

०७:५२: उत्तरप्रदेशमध्ये चार कोटी मतदार असून भाजपने या निवडणुकीत एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाही.

०७:४८: उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाने सर्वाधिक म्हणजे ९७ मुस्लिम उमेदवार दिले.

०७:४७: हिंदु- मुस्लिमांमधील तणावाने तापलेल्या पश्चिम उत्तर प्रदेशात पोळी भाजण्याचा भाजपचा इरादा

०७:३४: उत्तरप्रदेशमध्ये भाजप बहुमताने सत्ता स्थापन करणार – केशव प्रसाद मौर्य, भाजपचे प्रदेशाध्यक्ष

०७:३३: समाजवादी पक्ष – काँग्रेस आघाडी विजय मिळणार, मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याविरोधात कट रचणा-यांचे पितळ आज उघडे पडणार – राजेंद्र चौधरी, समाजवादी पक्ष

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 11, 2017 7:31 am

Web Title: uttar pradesh assembly election results 2017 live updates winning party narendra modi mayawati akhilesh yadav
Next Stories
1 मतदानोत्तर चाचण्या खोटय़ा ठरतील
2 निकालाची उत्कंठा शिगेला
3 Exit Polls: उत्तर प्रदेशात भाजपने फोडले फटाके, समाजवादी पक्ष-काँग्रेसने केला यज्ञ
Just Now!
X