उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात पूर्ण ताकदीने उतरलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी-अखिलेश यादव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात जोरदार घमासान सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरदोई येथील प्रचार सभेत काँग्रेस-समाजवादी पक्षावर हल्ला चढवला असतानाच, राहुल गांधी यांनीही सीतापूरमध्ये सभा घेऊन पंतप्रधान मोदींवर प्रश्नांची सरबत्तीच केली आहे. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उत्तर प्रदेशमध्ये सरकार बनवण्याची वाट कशाला पाहत आहात, असा खडा सवाल राहुल गांधी यांनी मोदींना केला आहे. आपण पंतप्रधानपदावर असून, आताही तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेऊ शकता, असेही गांधी म्हणाले.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हरदोई येथे प्रचारसभा झाल्यानंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही सीतापूरमध्ये प्रचारसभा घेतली. या सभेत राहुल यांनी मोदींवर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेत राहणेच आवडते. त्यांना सत्तेतच राहायचे आहे. मात्र, मोदींना सत्य सांगण्याची इच्छा अजिबात नाही, असे राहुल म्हणाले. यावेळी राहुल यांनी तरुणांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्यासाठी योजना जाहीर केल्या. तरुणांसाठी अनेक योजनांचा जाहीरनाम्यात उल्लेख केलेला आहे, असे सांगून त्यांनी तरुणांसाठी उच्च दर्जाचे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यास अखिलेश यादव यांना सांगितले आहे, असे राहुल यांनी सांगितले.

यावेळी राहुल यांनी नोटाबंदीच्या निर्णयावरून पंतप्रधान मोदींवर तोफ डागली. पंतप्रधानांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर सर्वसामान्य जनता बँका आणि एटीएमसमोर रांगेत उभी राहिल्याचे सर्वांनी पाहिले. मात्र, कोणताही सूट-बूटवाला या रांगांमध्ये दिसला नाही, असे राहुल यांनी सांगितले. मेक इन इंडियाचा नारा मोदी सरकारकडून दिला जात आहे. पण या माध्यमातून कुणाची मदत करत आहात, असा सवालही त्यांनी मोदी यांना केला. सर्वसामान्यांच्या पैशांच्या मागे मोदी धावले. मात्र, ९४ टक्के काळ्या पैशांच्या मागे मोदी का गेले नाहीत, असा प्रश्नही राहुल यांनी उपस्थित केला. हरदोई येथील सभेत उत्तर प्रदेशच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन, असे सांगणाऱ्या मोदींवर राहुल यांनी निशाणा साधला. थोडीशी मदत केली तरी उत्तर प्रदेशचा विकास होईल, असा टोला त्यांनी मोदींना लगावला.