उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी रविवारी (दि. १९) सत्तारूढ समाजवादी पक्षाचे गड समजले जाणाऱ्या भागांत मतदान झाले. तिसऱ्या टप्प्यात १२ जिल्ह्यातील ६९ जागांवर मतदान होत आहेत. यासाठी सुमारे ८२६ उमदेवार निवडणूक रिंगणात आहेत. यात १०६ महिलांचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यात ६१.६ टक्के मतदान झाले

राजधानी लखनौमधील नऊ मतदारसंघांसह एकूण ६९ मतदारसंघात होणाऱया लढतींसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. या टप्प्यात २ कोटी ४१ लाख मतदार ८२६ उमेदवारांचे भवितव्य ठरविणार आहेत. मतदानासाठी १६ हजार ६७१ केंद्र सज्ज झाली आहेत.

या टप्प्यात औरया, बाराबंकी, इटावा, फरुखाबाद, हरदोई, कनौज, कानपूर देहात, कानपूर नगर, लखनौ, मैनपुरी, सितापूर, उन्नाव या जिल्हय़ात मतदान होत आहे. ज्या ठिकाणी तिसऱया टप्प्यातील ही लढत होणार आहे, ते राज्याचे केंद्रस्थान मानले जाते. मैनपुरी ते बाराबंकी असा हा बारा जिल्हय़ांचा विस्तृत टप्पा असून ६९ मतदारसंघांचा त्यात समावेश आहे.

तिसऱ्या टप्प्यात समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांचे लहान भाऊ शिवपालसिंह यादव इटावातील जसवंतनगरमधून रिंगणात आहेत. या मतदारसंघातून पूर्वीचे बसप नेते मनिष यादव पटराय हे भाजपतर्फे तर बसपतर्फे दुर्वेशकुमार शाक्य हे त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत. मुलायमसिंह यादव यांची धाकटी सून अपर्णा यादव लखनौ कॅनॉटमधून रिंगणात आहे. त्यांच्यासमोर भाजपच्या रिटा बहुगुणा जोशी यांचे आव्हान आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे चुलत भाऊ अनुराग यादव लखनौमधील सरोजिनी नगरमधून निवडणूक लढवत आहेत.

पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर या मतदारसंघांमध्ये सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, बसपाच्या सर्वेसर्वा मायावती आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी अशा सर्व बड्या नेत्यांनी याठिकाणी सभा घेतल्या आहेत. गेल्या अडीच वर्षातील केंद्र सरकारचा कारभार, नोटाबंदी, जातीय हिंसाचार, भाजप नेत्यांची प्रक्षोभक वक्तव्ये या पार्श्वभूमीवर याठिकाणचे मतदार काय कौल देणार, याची सगळ्यांना उत्सुकता आहे. या भागातील मतदानाचा पॅटर्न उत्तर प्रदेशमधील आगामी निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकू शकतो. तत्पूर्वी ११ फेब्रुवारीला पार पडलेल्या पहिल्या टप्प्यात ६३ टक्के मतदान झाले होते.

Live Updates
15:05 (IST) 19 Feb 2017
दुपारी एक वाजेपर्यंत ३९ टक्के मतदान
11:53 (IST) 19 Feb 2017
सकाळी ११ वाजेपर्यंत २४.१९ टक्के मतदान
10:37 (IST) 19 Feb 2017
शिवपाल यादव यांच्या कारवर इटवा जसवंतनगर येथे दगडफेक
09:56 (IST) 19 Feb 2017
सकाळी नऊपर्यंत १२ टक्के मतदानाची नोंद