उत्तरप्रदेशमधील सहाव्या टप्प्यातील मतदानाला शनिवारी सकाळी कडेकोट बंदोबस्तात सुरुवात झाली. सहाव्या टप्प्यात उत्तरप्रदेशमधील ४९ जागांसाठी मतदान झाले. उत्तर प्रदेशात आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५७ टक्के मतदान झाले. समाजवादी पक्षाचे मुख्तार अन्सारी, त्यांचा मुलगा अब्बास, दुर्गा प्रसाद यादव आणि राम गोविंद चौधरी अशा दिग्गज नेत्यांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले आहे.

उत्तरप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून आज सहाव्या टप्प्यातील मतदानाला झाले. उत्तरप्रदेशमधील ४०३ जागांपैकी ४९ जागांसाठी शनिवारी मतदान झाले. ४९ विधानसभा मतदारसंघांमध्ये १७, ९२६ मतदान केंद्र असून या ठिकाणी एकूण १ कोटी ७२ लाख मतदार होते . यामध्ये ९४ लाख ६० हजार पुरुष आणि ७७ लाख ८४ हजार महिला मतदारांचा समावेश आहे. ६३५ मतदारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले आहे.

सहाव्या टप्प्यात समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांच्या आझमगड लोकसभा मतदारसंघांसह भाजप खासदार योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर मतदारसंघातही मतदान झाले. त्यामुळे सहाव्या टप्प्यात या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. याशिवाय महूमध्ये गुन्हेगारी क्षेत्रातून राजकारणात आलेले आमदार मुख्तार अन्सारी आणि त्यांच्या मुलाचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले आहे.

सहाव्या टप्प्यातील मतदानात महू, गोरखपूर, महाराजगंज, कुशीनगर, देवरिया, आझमगड, बलिया या जिल्ह्यांचा समावेश आहे. आझमगड हा मुलायमसिंह यांचा मतदारसंघ आहे. २०१२ च्या निवडणुकीत समाजवादी पक्षाने या मतदार संघातील विधानसभेच्या १० जागांवर विजय मिळवला होता. मात्र यंदा मुलायमसिंह यादव यांनी स्वतःच्याच मतदारसंघात एकही प्रचारसभा घेतली नव्हती. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात समाजवादी पक्षाची कामगिरी कशी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मतदानाचा सहावा आणि सातवा टप्पा भाजपसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. पूर्वाचलमधील सहाव्या व सातव्या टप्प्यामध्ये कुर्मी, मौर्य, मल्लाह, निशाद, राजभर आदी महत्त्वपूर्ण जातींना स्वत:कडे वळविण्यासाठी अहमहमिका लागली आहे. या जातींच्या पाठिंब्यावरच भाजपची मदार असल्याचे मानले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भागातील सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले होते.

महूमधील नसीरपूर गावात बूथ क्रमांक २७२ मध्ये मतदान यंत्रात बिघाड झाल्याची तक्रार, मतदान प्रक्रिया थांबवली. आदित्यनाथ यांनी देखील सकाळी मतदानाचा हक्क बजावला.  आपला भर विकासावरच, पण विकास करताना होणा-या भेदभावाला आमचा विरोध असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले.