उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी टाकलेल्या तारेमुळे ११ मार्चला समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि बसपला जोरदार करंट लागणार आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही पक्षांवर हल्ला चढवला. मोदी यांनी आज, शुक्रवारी मिर्झापूरमध्ये सभा झाली. या सभेत ते बोलत होते. तुम्ही लोकांनी जनतेला लुटले आहे. त्याचे उत्तर तुम्हाला ११ मार्चलाच मिळेल, असेही ते म्हणाले.

उत्तर प्रदेशातील निवडणूक सप-बसप आणि काँग्रेसमुक्तीचे पर्व आहे. उत्तर प्रदेश वेगळा देश झाल्यास तर जगातील पाचवा सर्वात मोठा देश झाला असता. राज्यातून बेरोजगारी, रोगराई, गरिबी हटवली तर देशात गरिबीसाठी काहीच करायची आवश्यकता नाही. देश आपोआपच पुढे जाईल. एकट्या उत्तर प्रदेशात तितकी ताकद आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले. यावेळी मोदी यांनी मुलायमसिंह यादव आणि अखिलेश यादव यांच्यावर हल्लाबोल केला. १३ वर्षांपूर्वी मुलायमसिंह यांनी बरेली-मिर्झापूरदरम्यान गंगा नदीवरील एका पुलाच्या कोनशिलेचे अनावरण केले होते. मात्र, अजूनही त्याचे काम पूर्ण झालेले नाही. आपल्या पित्याचे अपूर्ण काम गरीब मुलगाही पूर्ण करतो. प्रसंगी त्यासाठी कर्ज काढतो. पण हा मुलगा तर कामाच्या केवळ गप्पाच करतो. आपल्या पित्याचे अपूर्ण काम पूर्ण करत नाही. जो मुलगा पित्याचे काम पूर्ण करत नाही, तो जनतेचे भले काय करेन, अशा शब्दांत मोदींनी अखिलेश यांच्यावर टीकास्त्र सोडले.

अखिलेश हल्ली मला कामे सांगून देतात. त्यांचा तो अधिकारच आहे. मी येथील खासदार आहे. कामे करणे माझे कर्तव्यच आहे, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी वीजेच्या समस्येवरून अखिलेश यादव सरकार आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. तुमचे मित्र (राहुल गांधी) खाट सभा घेत होते. पण लोकांनी सभेतील खाटाच पळवून नेल्या, अशी खिल्ली त्यांनी उडवली. यावेळी त्यांनी राज्यातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरूनही तोफ डागली. येथे प्रत्येक गोष्टीचा दर ठरलेला आहे. पेन्शन, सरकारी योजनेचा लाभ देणे, रेशनवरील धान्य मिळवण्यासाठीचा दर ठरला आहे. येथील भ्रष्टाचाराबाबत ऐकतो त्या-त्या वेळी मला कवी अशोक चक्रधर यांची कविता आठवते. त्यांनी भ्रष्टाचाराचे चार प्रकार सांगितले आहेत. ‘नजराना, शुकराना, हकराना आणि जबराना’…त्याची येथील लोकांना सवय झालेली आहे. यापासून मुक्ती हवी असेल तर त्यांचा पराभव हा एकमेव मार्ग आहे. सप-काँग्रेस, बसपचा पराभव करणे हाच एकमेव मार्ग उरला आहे, असे मोदी म्हणाले.