उत्तर प्रदेश निवडणुकीच्या आखाड्यात पहिल्यांदाच उतरलेल्या काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. मला उत्तर प्रदेशने दत्तक घेतले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात. पण स्वतःच्या विकासासाठी बाहेरच्या व्यक्तीला दत्तक घेण्याची उत्तर प्रदेशला गरजच नाही, असे प्रियांका गांधी यांनी स्पष्ट शब्दांत ठणकावले आहे.

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची आज शुक्रवारी रायबरेली येथे प्रचार सभा झाली. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचार रिंगणात पहिल्यांदाच उतरलेल्या प्रियांका गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला. या राज्यातील प्रत्येक तरुण नेता बनू शकतो. कारण त्यांच्यात तितकी योग्यता आहे. नेता बनून आपल्या राज्याचा विकास करण्याची धमक येथील तरुणामध्ये आहे, असे प्रियांका म्हणाल्या. नोटाबंदीच्या मुद्द्यावरूनही प्रियांका यांनी नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. पंतप्रधानांनी एका झटक्यात नोटाबंदी केली. प्रत्येक घरातील महिलेने पै न पै जमवून केलेली बचत क्षणात त्यांनी बाहेर फेकायला लावली. हा महिलांवरील अन्याय नव्हे का, असा सवालही त्यांनी केला. पंतप्रधान मोदींनी अनेक पोकळ आश्वासने दिली आहेत. केंद्रात मोदींचे सरकार आले. आता तीन वर्षे झाली. पण अद्यापही वाराणसीसाठी काहीही केलेले नाही, असेही त्या म्हणाल्या. राजीव गांधी पंतप्रधान होते, त्यावेळी अमेठीचा खूप विकास झाला. विकास काय असतो ते पंतप्रधान मोदींनी अमेठीच्या जनतेला विचारावे, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.

या सभेत राहुल गांधींनीही उपस्थित जनतेला संबोधित केले. काही महिन्यांपूर्वी काँग्रेसने शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर उत्तर प्रदेशात यात्रा काढली होती. उत्तर प्रदेशातील दोन कोटी शेतकरी कर्जमाफी करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे करत आहेत. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे, यासाठी मी सुद्धा पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. मात्र, त्यावर मोदी यांनी चकार शब्दही काढला नाही, असे राहुल यांनी सांगितले. उत्तर प्रदेश निवडणुका आल्यानंतर भाजपची सत्ता आली तर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन मोदींनी दिले. काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांचे ७० हजार कोटींचे कर्जमाफ केले होते. त्यावेळी आमची उत्तर प्रदेशमध्ये सत्ता नव्हती. पंतप्रधान मोदींनी मनात आणले तर १५ मिनिटांतच ते शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू शकतात, असे राहुल म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार निवडणुकांवेळीही लाखो-कोट्यवधी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. पण बिहारमध्ये पराभव झाल्यानंतर त्यांनी राज्यासाठी कोणतेही खास पॅकेज दिले नाही, असेही राहुल यांनी सांगितले.