उत्तरप्रदेशमधील प्रचाराच्या रणधुमाळीत नेत्यांमध्ये आरोपप्रत्यारोप सुरु असतानाच आता यामध्ये महानायक अमिताभ बच्चन यांचे नावही आले आहे. अमिताभ बच्चन यांनी गुजरातच्या गाढवांचा प्रचार करु नये असे वादग्रस्त विधान समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तरप्रदेशमधील मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केले आहे.
सोमवारी उत्तरप्रदेशमध्ये अखिलेश यादव यांनी प्रचारसभा घेतली. या प्रचारसभेत अखिलेश यादव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्मशान आणि कब्रस्तानवरील विधानाचा समाचार घेतला. अखिलेश यादव म्हणाले, सध्या टीव्हीवर एक जाहिरात येते ज्यामध्ये गाढव येतो. मी महानायक अमिताभ बच्चन यांना आवाहन करतो की त्यांनी या गाढवांचा प्रचार बंद करावा. गुजरातमधील लोक गाढवांचा प्रचार करतात आणि उत्तरप्रदेशमध्ये येऊन स्मशान आणि कब्रस्तानवर भाष्य करतात असे टोलाही त्यांनी मोदींना लगावला.
काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणा-या रायबरेलीमध्ये सोमवारी अखिलेश यादव यांनी सभा घेतली. या सभेत ते बोलत होते. मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये आम्ही २४ तास वीज दिली. आता मोदींनी देशाला सत्य सांगितले पाहिजे असे यादव यांनी सांगितले. मोदी म्हणतात आम्ही रमजानमध्ये वीज देतो आणि दिवाळीत नाही. पण आता मोदींनी त्यांच्या मतदारसंघातील सत्यस्थिती जनतेला सांगावी असे आव्हानच त्यांनी मोदींना दिले. रायबरेलीमध्ये झालेल्या प्रचारसभेत समाजवादी पक्षाचे उमेदवार गायत्री प्रजापती यांना सभेत अश्रू अनावर झाले. बलात्कारप्रकरणामुळे गायत्री प्रजापती अडचणीत आले आहेत. न्यायालय माझे म्हणणे ऐकून घेईल आणि मला न्याय देईल अशी आशा त्यांनी सभेत व्यक्त केली.
Ek gadhe ka vigyapan aata hai, main iss sadi ke sabse bade mahanayak se kahunge ke ab aap Gujarat ke gadhon ka prachar mat kariye: UP CM pic.twitter.com/Rv4HiiV7Ic
— ANI UP (@ANINewsUP) February 20, 2017
SP leader Gayatri Prajapati breaks down during a rally in Amethi, Uttar Pradesh says the court will listen to me and will do justice pic.twitter.com/RQqxxYwWsO
— ANI UP (@ANINewsUP) February 20, 2017
दरम्यान, रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फतेहपूरमध्ये प्रचारसभा घेतली होती. या प्रचारसभेत अखिलेश यादव यांच्यावर दुजाभाव केल्याचा आरोप मोदींनी केला होता. उत्तरप्रदेशमधील सरकार रमजानमध्ये वीज पुरवठा करते पण दिवाळीला देत नाही. कब्रस्तानमध्ये वीजपुरवठा केला जात असेल तर स्मशानातही वीज दिली पाहिजे. आता हा भेदभाव संपुष्टात आला पाहिजे असे मोदींनी म्हटले होते. काँग्रेसनेही मोदींच्या या विधानाला आक्षेप घेतला आहे. मोदींचे विधान धार्मिक तेढ निर्माण करणारे असून याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली जाईल असे काँग्रेसने म्हटले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 20, 2017 2:53 pm