उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप नेत्यांच्या बेताल विधानांमुळे पक्षाची नाचक्की झाली आहे. ‘सत्तेत आलो तर कैराना, देवबंद आणि मुरादाबाद यासारख्या मुस्लिमबहुल संचारबंदी लागू करु’ असे विधान त्यांनी केले आहे. मात्र यावरुन वाद सुरु होताच असे वादग्रस्त विधान केलेच नाही असे घूमजाव राणा यांनी केले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सध्या जोमात प्रचार सुरु आहे. भाजपचे नेते राज्याच्या कानाकोप-यात प्रचारसभा घेत आहेत. मात्र या प्रचारसभा नेत्यांच्या बेताल विधानांमुळे चर्चेचा विषय ठरल्या आहेत. भाजपचे आमदार सुरेश राणा यांनी एका प्रचारसभेत प्रक्षोभक विधान केले. माझा पराभव झाला तर देवबंदसारख्या मुस्लिमबहुल भागात जल्लोष केला जाईल. त्यामुळे विजयासाठी मलाच मतदान करा. मी निवडून आल्यास देवबंद, मुरादाबाद या मुस्लिमबहुल भागात संचारबंदी लागू करणार असे राणा यांनी म्हटले आहे. या मुस्लिमबहुल भागातून हिंदूंना घर सोडण्यासाठी भाग पाडले जाते असा आरोप त्यांनी यापूर्वी केला होता.

सुरेश राणाला यंदाच्या निवडणुकीत भाजपने ठानाभवन (शामली) येथून उमेदवारी दिली आहे. राणा हे भाजपचे उत्तर प्रदेशमधील उपाध्यक्षही आहेत. या सभेत राणा यांच्यासोबत मुजफ्फरनगरमधील भाजप खासदार संजीव बालियानदेखील उपस्थित होते. राणा आणि बालियान हे दोघेही मुझफ्फरनगर दंगलीमधील आरोपी आहेत.

विधानावरुन वाद होताच सुरेश राणा यांनी स्पष्टीकरण दिले आहे. गुंड आणि खंडणीखोरांमुळे पश्चिम उत्तर प्रदेशमधून अनेकांना स्थलांतर करावे लागले. भाजप सत्तेवर येताच उत्तर प्रदेशमधून गुंड आणि खंडणीखोरांना हद्दपार करु असे मला म्हणायचे होते असे त्यांनी सांगितले.
भाजप खासदार संजीव बालियान यांनीदेखील मुलायमसिंह यादव यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले. मुलायमसिंह यादव यांच्या मृत्यूची वेळ आली आहे. मुलायमसिंह यांनी नेहमीच जातीयवादी राजकारण केले असेही त्यांनी म्हटले होते. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या महाआघाडीवरुनही त्यांनी टीका केली. या दोघांनी आधी केंद्रात लूटमार केली आणि आता त्यांना उत्तरप्रदेशमध्ये लूटमार करायची आहे अशी टीका त्यांनी केली.