अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या घरात ‘मेड इन उत्तरप्रदेश’ बेडशीट बघायची आहे असे सांगत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या विकासाची ग्वाही दिली आहे.

उत्तरप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याला दोन दिवसांचा अवधी आहे. त्यामुळे बुधवारी सर्वच पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी राज्यात प्रचारसभांचा धडाका लावला होता. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील प्रचारसभा घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना राहुल गांधी म्हणाले, मोदींच्या काळात देशातील धनाढ्य उद्योजकांना ‘अच्छे दिन’ आले. पण देशातील शेतक-यांना बुरे दिने आले. देशातील शेतक-यांवर आर्थिक संकट ओढावले असेही त्यांनी नमूद केले. सत्तेत आल्यावर उत्तरप्रदेशचा विकास करु अशी ग्वाही देताना राहुल गांधी यांनी मेड इन उत्तरप्रदेशचा नाराही दिला. ओबामा यांच्या घरात उत्तरप्रदेशमध्ये तयार झालेली बेडशीट बघायला आवडेल असे त्यांनी सांगितले.

देशातील ६० टक्के पैसा हा फक्त ५० कुटुंबाच्या हाती आहे. मुंबईतील मोठमोठ्या घरांमध्ये ही लोक राहतात, मोठ्या गाड्यांमधून फिरतात असे त्यांनी म्हटले आहे. मोदी सरकारने देशातील श्रीमंत लोकांचे १ लाख १० हजार कोटींचे कर्ज माफ केले. या लोकांवर ६ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. तेदेखील माफ व्हावे यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला.  मी शेतक-यांचे कर्ज माफ करा अशी मागणी मोदींकडे केली होती असे त्यांनी नमूद केले. मोदींनी संपूर्ण देशाला रांगेत उभे केले. पण एकही श्रीमंत रांगेत नव्हता. मोदीजी म्हणाले काळा पैसा देशात आहे. पण विदेशातील काळा पैशावर त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही अशी टीकाही त्यांनी केली.