News Flash

दरवळला सुगंध..

करियरच्या सुरुवातीचे दिवस. एक दिवस संगीत दिग्दर्शक आनंद मोडक यांचा पुण्याहून फोन येतो.

आशाताई मला स्टेजवर बोलावतात. श्रोत्यांना सांगतात की, ‘विसरशील खास मला’ हे यशवंत देवांचं प्रसिद्ध भावगीत मी खूप वर्षांपूर्वी गायलय. शब्द नीटसे आठवत नाहीत. तेव्हा हे गाणं मी आणि उत्तरा दोघी मिळून गातो. आम्ही दोन अंतऱ्यापर्यंत ते गाणं गातो. तुडुंब भरलेलं मैदान उत्स्फूर्ततेनं दाद देतं. हा अचानक आलेला क्षण, मला रोमांचित करतो.. ‘अत्तरकुपी’ लेखाचा हा उर्वरित भाग.

दृष्य ६- हळूहळू माझ्या नवऱ्याचं, विश्रामचं स्वप्न पूर्ण होतय. चित्रपटांची, कॅसेटची रेकॉर्डिग्ज, वेगवेगळ्या कार्यक्रमात मी व्यग्र होत चाललेय. बाहेरगावी कार्यक्रम करून, मी लवकर सकाळी स्टेशनवरून टॅक्सी करून घरी परततेय. सोसायटीपाशी टॅक्सी थांबते. अजून पुरतं उजाडलंही नाहीए. सहजच माझं लक्ष माझ्या फ्लॅटच्या खिडकीकडे जातं. नवरा खिडकीपाशी माझी वाट बघत उभा असतो. जगातल्या एका माणसाला माझी किती काळजी आहे, हे बघून जीव सुखावतो. घराचे दार त्याने उघडलेलंच असतं, माझ्या हातातली बॅग घेऊन पाण्याचा ग्लास हाती ठेवतो. पाठोपाठ स्वत: बनवलेला, वाफाळलेला चहा हातात देतो. अशा वेळी वाटतं, सुख त्यापेक्षा वेगळं काय असतं?

दृष्य ७ – करियरच्या सुरुवातीचे दिवस. एक दिवस संगीत दिग्दर्शक आनंद मोडक यांचा पुण्याहून फोन येतो. दिवस असतो ९ ऑक्टोबर. त्यांना एप्रिलमध्ये पुणे आकाशवाणीवर एक सांगीतिका रेकॉर्ड करायची आहे. त्यांनी सांगितलं, ‘रामसीतेच्या कथेवर आधारित ‘सरली न कूजिते’ ही सांगीतिका आपण करतोय. सीतेच्या भूमिकेसाठी तू आणि रामाच्या भूमिकेसाठी बाबूजी म्हणजे सुधीर फडके गाणार आहेत.’ माझ्या आनंदाला पारावार राहात नाही. मराठी चित्रपटगीतांचा सुवर्णकाळ ज्यांनी रसिकांना दिला, त्या बाबूजींबरोबर मी गाणार? पुण्यातले ते तीन दिवस अक्षरश: मंतरल्यासारखे जातात. साक्षात बाबूजींचा सहवास मला लाभतो. अत्यंत साधेपणाने ते आम्हा नवीन लोकांत वावरतात. आम्हाला सांभाळून घेतात आणि त्यांच्या स्वर्गीय गाण्याचा आनंद आम्ही घेतो..

दृष्य ८ – सुरेश वाडकर, म्हणजे आमच्या पिढीच्या गायकांचा गायक! गाण्यात माधुर्य, सहजता, ओतप्रोत भाव आणि लयीशी खेळत खेळत गाण्याची त्याची हातोटी. सर्वच अतिशय मनमोहक! नाव झाल्यावर मला बऱ्याच वेळा त्याच्या कार्यक्रमात गाण्याचा योग आला. बऱ्याच वेळा त्यांच्याबरोबर आम्ही तिघं म्हणजे मी, कविता कृष्णमूर्ती आणि विनय मांडके गायचो. या कार्यक्रमातले सुंदर क्षण अनेक वेळा माझ्या मनात रुंजी घालतात. कुठल्याशा शहरात सुरेशचा कार्यक्रम आहे. स्टेजवर तो येतो. आपल्या प्रसन्न व्यक्तिमत्त्वाने तो पहिला आलाप सुरू करतो. बहुदा ‘ओंकार स्वरूपा’ किंवा ‘राम तेरी गंगा मैली’ यापैकी गाणं असतं. पहिल्या आलापालाच टाळ्यांचा कडकडाट  होतो. आम्ही तिघंही आतून विंगमधून जिवाचा कान करून त्याचे स्वर ऐकायला लागतो. मग पुढच्या एक तासात, स्वरांच्या वर्षांवात श्रोते आणि आम्ही चिंब भिजून जातो. एकेक स्वर गोलाकार आणि तेजस्वी! दरवेळी तेच गाणं सादर करूनही, थोडं थोडं वेगळं वाटत राहतं. आम्ही तिघेही या अलौकिक क्षणांचे साक्षीदार आहोत..

दृष्य ९- भप्पी लाहिरींबरोबर मी जवळजवळ चौदा र्वष कार्यक्रम करते आहे. सगळे कार्यक्रम भव्य, एखाद्या मैदानावर किंवा स्टेडियममध्ये. असाच एक कोलकात्यातल्या स्टेडियममधला कार्यक्रम. या कार्यक्रमात चित्रपट कलावंत तर आहेतच पण साक्षात किशोरकुमारही आहेत. भप्पीजींनी मला दोन गाणी त्यांच्याबरोबर गायला सांगितली आहेत. मी खूप खूश आहे. एवढय़ा मोठय़ा गायकाबरोबर आपण गायचं? आनंदाबरोबर टेन्शनही आहे. किशोरकुमार स्टेजवर जातात. काही काळ स्वत:ची गाणी गातात. मग स्टेडियममधल्या लोकांना विचारतात ‘‘श्रोतेहो! तुम्ही उत्तरा हे नाव कुठे ऐकलय? श्रोते मोठय़ांदा म्हणतात, ‘महाभारतात’! मग किशोरदा विचारतात, ‘उत्तरा ही कुणाची बायको?’ लोक लगेच प्रतिसाद देतात, ‘अभिमन्यूची’. त्यावर किशोरदा म्हणतात, ‘बरोबर! मी ही एक उत्तरा मुंबईहून आणल्येय. तिला आता माझ्याबरोबर गाण्यासाठी, मी स्टेजवर बोलावतो.’’ आणि माझी अशी मजेशीर ओळख करून देत मला ‘कम्फर्टेबल’ करत, ते मला स्टेजवर बोलावतात. दोन्ही गाणी होतात. आणि मी समाधानाने स्टेजवरून खाली उतरते. आणखी एक स्वप्न साकार होतं..

दृष्य १०- आशाताई भोसले, माझ्या मनातील गुरू! एक कलाकार आणि एक सहृदय व्यक्ती म्हणून मला अत्यंत भावलेल्या! पाल्र्यात एका मैदानावर माझे गुरू यशवंत देव यांच्या त्यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त आशाताईंच्या हस्ते सत्कार आहे. त्याआधी मध्यंतरापर्यंत, देव यांच्या गाण्यांचा कार्यक्रम! त्यात मी, रवींद्र साठे, श्रीधर फडके आदी गाणार आहोत. मध्यांतरानंतर देवांचा सत्कार आहे. मान्यवर लोक स्टेजवर बसलेले आहेत. आम्ही गायक स्टेज समोरच पहिल्या रांगेत बसलो आहोत. टाळ्यांच्या कडकडाटात आशाताईंचं आगमन होतं, सगळे श्रोते, त्यांचे शब्द ऐकायला उत्सुक आहेत. त्या जेव्हा बोलायला उभ्या राहतात, त्या वेळी श्रोत्यांकडून त्यांना गाण्याच्या फर्माईशी येतात. पण इतर संगीतकारांच्या. आशाबाई सांगतात, ‘‘आज देवसाहेबांचा वाढदिवस आहे. त्यांनी स्वरबद्ध केलेली गाणी सुचवा.’’  मला काही गाणी पटकन आठवतात. मी श्रीधर फडकेंना सुचवते तर ते म्हणतात, ‘‘अगं, आशाताई विचारताएत, तर सांग ना त्यांना ही गाणी!’’ मी स्टेजजवळ जाऊन त्यांना तीन/चार गाणी सुचवते. आशाताई हसून पटकन मला पुन्हा स्टेजवर बोलावतात. कडकडून मिठी मारतात. माझं कौतुक करतात. मग श्रोत्यांना सांगतात की, ‘विसरशील खास मला’ हे देवांचं प्रसिद्ध भावगीत मी खूप वर्षांपूर्वी गायलंय. आता त्याचे शब्द मला नीटसे आठवत नाहीत. तेव्हा हे गाणं मी आणि उत्तरा दोघी मिळून गातो. जिथे जिथे मी विसरेन, तिथे तिथे उत्तरा गाईल. असं करत करत आम्ही दोन अंतऱ्यापर्यंत ते गाणं गातो. तुडुंब भरलेलं मैदान उत्स्फूर्ततेनं दाद देतं! क्षणात असंख्य कॅमेरे फोटो आणि शूटिंगसाठी सरसावतात! हा अचानक आलेला क्षण, मला रोमांचित तर करतोच. पण एका अतिशय मोठय़ा आणि लाडक्या गायिकेबरोबर आपण गायलो, या कल्पनेनं, माझं मन रोमांचित होतं..

दृष्य ११- लता मंगेशकर! १९९८ चं वर्ष. माझ्या बहिणीच्या मुलाचं किडनी ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन ठरलंय. ऑपरेशन आणि त्यानंतरचा खर्च काही लाख रुपयांत आहे. इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये काम करत असलेल्या आणि विशेष म्हणजे आयुष्यात एकही पैसा न खाल्लेल्या माझ्या बहिणीवर मोठंच संकट कोसळलंय! हा खर्च तिच्या आवाक्याबाहेरचा आहे. मी आणि माझ्या भावाने तिला आर्थिक मदत केलीय, पण ती पुरेशी नाही. देणग्यांसाठी आम्ही विविध संस्थांना गाठतोय, तेवढय़ात कानावर येतं, की लताबाई अशा गरजवंतांना मदत करतात. पण मला काही त्यांच्याकडे जाण्याचं धैर्य होत नाहीए. दरम्यान, माझी भेट शिरीषताईंशी (प्रसिद्ध कवयित्री शिरीष पै) होते. मी त्यांना भाचाच्या आजाराविषयी सांगते. आणि काय आश्चर्य! लगेचच मला पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा आपणहून फोन येतो. ‘‘मला शिरीषताईंनी सांगितलंय, पण तुमच्याकडे नक्की कोण आणि कशाने आजारी आहे? आम्ही लता मंगेशकर मेडिकल फाऊंडेशनतर्फे मदत करतो.’’  एवढय़ा मोठय़ा व्यक्तीने मला स्वत: फोन करावा? खरोखरच मोठेपणा होता त्यांचा! आणि आठ-दहा दिवसांतच लतादीदीतर्फे एक चेक येतो. मी अवाक् ! कसलाही गाजावाजा नाही की प्रसिद्धी. आज माझ्या भाच्याचे प्राण वाचण्यात लताजींचाही मोलाचा वाटा आहे.
हे सर्व अपूर्व, अलौकिक, हेलावून टाकणारे क्षण, प्रसंग! हा अमूल्य ठेवा, माझ्यासोबत आयुष्यभर राहील.. त्यांचा सुगंध दरवळत राहील..
संपर्क – ९८२१०७४१७३
uttarakelkar63@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2016 1:07 am

Web Title: moments with great singers
टॅग : Asha Bhosle,Chaturang
Next Stories
1 अत्तरकुपी
Just Now!
X